
>> संजय कुळकर्णी
14 जून रोजी महाराष्ट्रातील रंगकर्मी ज्याची वाट बघत होते ते नाटय़ परिषदेचं हक्काचं नाटय़गृह यशवंत नाटय़मंदिर नव्याने सुरू झालं. यानिमित्ताने दिवंगत ज्येष्ठ अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आज हयात असते तर त्यांच्या नेमक्या भावना काय असत्या हे शब्दातीत करणारा हा लेख.
आज आम्ही आनंदून गेलोत. जणू काही तुरुंगातून आमची सुटका झाली असं आम्हाला वाटतंय. कारण जवळ जवळ तीन वर्षे आम्ही सर्व म्हणजे राजा गोसावी, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, अरुण सरनाईक आणि बबन प्रभू आम्हा सर्वांना जन्मठेपेची शिक्षा भोगली की काय, असं वाटून गेलं. सगळीकडे धुळीचं साम्राज्य होतं. कबुतरांची ये-जा, त्यांचा ‘गुंटूरगुम’ आवाज कानावर आघात करीत होता. त्यांच्या विष्ठेने तर नाक दाबून बसावं लागत होतं. मोहन जोशी यांनी आम्हाला इथे मानाने बसवलं त्यावेळी आम्हाला धन्यता वाटली. नाटय़ मंदिरातली नाटकं आम्ही सर्वजण पाहत होतो. माझा विनोदी पिंड असल्यामुळे एखादं विनोदी नाटकाचा प्रयोग असेल तर मी डोळे लावून पाहायचो. त्यावेळी सर्वजण म्हणायचेही, ‘’बघा बघा, लक्ष्या कसा पाहतोय!” हे सर्व मी अनुभवलंय आणि अचानक कोरोना आला.
लॉकडाऊन लागलं. दोन वर्षे नाटय़गृह बंद होतं. नंतर असं ऐकीवात आलं की, यशवंत नाटय़ मंदिर नव्याने उभारणार आहेत? आमच्या पाच जणांच्या छातीत धस्स झालं. आम्ही निर्वासित होणार की काय, अशी भीती निर्माण झाली. पण नंतर कानावर बातमी आली की, यशवंत नाटय़ मंदिर गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाच्या दिवशी म्हणजे 14 जूनला सुरू होतंय. सध्या प्रशांत दामले हे अध्यक्ष झालेत. आमचा विनोदी अभिनेता अध्यक्ष झाल्यावर माझी कॉलर टाईट झाली. आमचे फोटोतले पंच महामंडळ त्या दिवसाची वाट पाहात होते.
14 दिवसांत काम पूर्ण होईल का, यावर आम्ही सर्वजण रात्री चर्चा करायचो. हळूहळू नाटय़गृहात मजूर उंच उंच परात बांधू लागले. त्यावर चढून सीलिंगची कामं करू लागले. काही जण नाटय़ मंदिराला रंगरंगोटी करू लागले.
चोवीस तास कामं चाललेली पाहताना मी त्यांच्या ऊर्जेला दाद देत होतो. त्यांचं लक्ष्य एकच होतं…
14 जून! जणू त्यांना झपाटलेलं होतं. त्याच वेळी मला महेशचा ’झपाटलेला’ चित्रपट आठवला. मीही त्या चित्रपटाच्या आठवणीत रमलो.
14 जून हा दिवस उजाडला. खरं तर त्याची आम्ही जशी वाट पाहत होतो तशीच महाराष्ट्रातील रंगकर्मी पाहात होते. कारण जसं ते नाटय़ परिषदेचं हक्काचं नाटय़गृह होतं तसंच रंगकर्मींचंसुद्धा होतं. निर्मात्यांनी ‘पै पै’ जमवून ते उभारलं. सकाळपासून काहीजण नाटय़ मंदिरातील आसनं आनंदाने स्वच्छ करताना दिसले तर काही रंगमंचावर देखणं नेपथ्य सजवताना दिसत होते. त्यांच्या कामाची ऊर्जा थक्क करणारी होती. तीन वर्षांत थंडगार हवा नाटय़ मंदिरात मिळालेली नव्हती. एसी यंत्रणा व्यवस्थित सुरू झालेली दिसली. संध्याकाळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसं नाटय़मंदिर रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेलं दिसलं. तीन वर्षांत हरवलेले सनई-चौघडय़ाचे स्वर कानावर पडल्यावर माझ्या शुभारंभाच्या आणि शतक महोत्सवाच्या नाटकांची प्रकर्षाने आठवण झाली. एक-एक नाटक डोळ्यासमोर येऊ लागलं. जशी माझी अवस्था होती तशीच आमच्या मंडळींची झाली होती. चाफ्यांच्या फुलांचा सुगंधी दरवळ नाटय़ मंदिरात पसरलेला होता. नाटय़ रसिक, रंगकर्मी आणि हितचिंतक नाटय़ मंदिरात येताना आमच्याकडे पाहताना दिसले. त्यांच्या चेहऱयावरचा आनंद आम्ही घेत होतो.
यशवंत नाटय़ मंदिर ‘हाऊस़फुल्ल’ झालेलं मी तीन वर्षांनंतर पाहात होतो. नाटय़सृष्टीतील बऱयाच व्यक्ती येताना दिसल्या. इतक्यात तिसरी घंटा झाली. हे स्वर आम्ही तीन वर्षांत ऐकलेले नव्हते. विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रेक्षकगृहातून तिसरी घंटा वाजवली तेव्हा धन्य झालो. नाटय़ मंदिराचा मखमली पडदा दूर सरकला आणि रंगमंच प्रकाशाने उजळून निघाला. गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिन सोहळ्याला सुरुवात झाली. तरुण कलावंत मनोरंजनाचे कार्पाम सादर करताना दिसले. मोहन जोशी आणि वंदना गुप्ते हे जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना त्यांच्याबरोबरचे दिवस आठवले. मोहनने यशवंत नाटय़ मंदिर त्याच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत पूर्ण करून ते सुरू केलं आणि आज जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना तीन वर्षं बंद असलेलं यशवंत नाटय़ मंदिर पुन्हा त्याच्याच उपस्थितीत सुरू झालं. हा निव्वळ योगायोग असावा. आमच्या पंच महामंडळाने टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. त्यानेसुद्धा आमच्याकडे पाहिलं बरं का? कार्पाम पाहात असताना एक गोष्ट सांगायचीच राहिली, ज्या हौशी रंगभूमीवरून मी व्यावसायिक रंगभूमीवर आलो त्या हौशी आणि समांतर रंगभूमीसाठी एक छोटेखानी नाटय़गृह तयार होत आहे. जो आधी तालीम हॉल होता, तिथे ते होतंय. तेसुद्धा साऊंडप्रूफ. बहुधा एसी असेल हे मी नाटय़ परिषदेच्या मंडळींकडून चोरून ऐकलंय.
कार्पाम संपता संपता एक गोष्ट आणखी कळली! पारितोषिक वितरण सोहळा, जो दरवर्षी नाटय़ परिषद साजरा करते तो त्यांना यावेळी साजरा करता आलेला नाही. तो आता 5 नोव्हेंबर – रंगभूमी दिन या दिवशी साजरा होणार आहे. त्या सोहळ्यात प्रशांतला एक विनंती आहे की, आमच्या पंच महामंडळाच्या गाजलेल्या नाटकांचे प्रवेश सादर व्हावेत. उदा. माझ्या ’टूरटूर’ नाटकातील प्रवेश, दुभाषी मास्तरांच्या ’ती फुलरांणी’तील प्रवेश, अरुण सरनाईक यांच्या ’अपराध मीच केला’ नाटकातला प्रवेश, बाबाच्या ’नटसम्राट’ नाटकातील, राजा गोसावी यांच्या ’करायला गेलो एक’ आणि बबन प्रभू यांच्या ’दिनूच्या सासूबाई आणि राधाबाई’ अशा या नाटकातले प्रवेश व्हावेत ही भ्रामक आशा आहे. ती प्रशांत पूर्ण करेलच.
रसिक एका आनंदात कार्पाम संपल्यावर जाताना दिसले. नाटय़ मंदिरातील दिवे – एसी बंद झाले. तरीही आम्हाला काहीही वाटलं नाही. आता यशवंत नाटय़ मंदिर 1 जुलैपासून रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. आम्हाला नाटकं पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांचा सहवास लाभणार आहे. रंगदेवतेकडे एकच मागणं आहे, की नाटय़ परिषदेची अपूर्ण राहिलेली प्रोजेक्ट्स पूर्ण होवोत आणि नाटय़ परिषदेची दिवसेंदिवस भरभराट होवो.




























































