मोनेगिरी – हेमंतचे विनोद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संजय मोने

तसा तो माझ्याहून बराच आधीपासून नाटकातून काम करायचा. वरिष्ठ कलाकार हेमंत त्याचं नाव (नावात काय असतं? असं शेक्सपियर म्हणून गेले. त्यामुळे आडनावातही फार काही नसावं. म्हणून आडनाव सांगत नाहीये). माझ्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या एका नाटकात मी त्याचा सहकलाकार होतो. त्या काळी दादर हे मराठी रंगभूमीचं केंद्रस्थान होतं. कारण शिवाजी मंदिर नाटय़गृह, तिथे जवळच तो राहायचा. सगळय़ा मराठी नाटकांचं भविष्य, भवितव्य तिथे घडायचं, ठरायचं. मी प्रायोगिक नाटक किंवा राज्य नाटय़ स्पर्धेतून काम करत असताना (‘अभिनय’ हा शब्द वापरला नाहीये. कारण तो करणं हे खायचं काम नाही. अगदी मोठमोठय़ा कलाकारांनीसुद्धा काही मोजक्या नाटकांत अभिनय केला, बाकीच्या नाटकांत केली ती कामं) व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. हौशी किंवा प्रायोगिक नाटकात काम करणं आणि व्यावसायिक नाटकात काम करणं यात माझ्या मते बराच फरक असतो हे मला तेव्हा कळलं (माझ्या मते, अर्थात त्या मताला किंमत किती द्यायची हे मी वाचकांवर सोडून देतो). व्यावसायिक नाटकाचे ठिकठिकाणी आणि वारंवार प्रयोग होतात. हौशी किंवा प्रायोगिक नाटकांचे एखाददोन प्रयोग होतात आणि ओळखीचे लोक येऊन आपलं कौतुकच करतात बहुतेक वेळा. त्यामुळे तालमीत केलेलं काम तसंच करत राहणं महत्त्वाचं असतं. त्यात गावोगावचे प्रेक्षक नाटकानंतर आत येऊन हक्क असल्यासारखे चार शब्द सुनावून जातात. त्यातून बचावून काम करायचं असतं.

माझ्या पहिल्यावहिल्या नाटकात ते काही मला नीटसं जमत नव्हतं. तेव्हा हेमंत कायम मला शिकवत होता. अगदी उभं कसं राहावं किंवा आवाज कसा पोचवावा. पुढे मग मी त्याच्याबरोबर पाच नाटकं केली. त्याच्याकडे विलक्षण अशी विनोदबुद्धी होती. अगणित आणि अफाट किस्से होते. तसा तो फार लवकर गेला. आजही मी, त्याचे इतर सहकलाकार, तरुण दिग्दर्शक त्याच्या आठवणी काढून डोळय़ांत पाणी येईपर्यंत हसतो, हसताना आलेले अश्रू कधी हळवे होतात ते मात्र नाही कळत. आज इतकी माध्यमं आहेत मनोरंजनाची, असता तो आज तर खोऱयाने कामं मिळाली असती त्याला.

उत्तम अभिनय तो सहज करून जायचा, डाव्या हाताचा खेळ होता तो त्याच्या. गावोगावी हजारो प्रयोग केल्यामुळे अनेक ठिकाणचे किस्से त्याला सांगता यायचे. हे खास त्याचे किस्से, जे या लेखाचा मूळ विषय आहेत. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तो सांगायचा, हे सगळे घडलेले आहेत बघा!

एकदा एका गावात त्याला जेवायला बोलावलं होतं, मीही त्याच्या बरोबर होतो. घराच्या बाहेर उतरताक्षणी तो म्हणाला,
‘‘माफ करा! माझा आज कडक उपास असतो, निघून गेलं डोक्यातून. चल!चल!’’ असं म्हणून रिक्षा थांबवली.
‘‘कुठला उपास?’’
घरी कुत्रा आहे त्याचा. तो कुत्र्याला घाबरायचा, पण घरात आम्हाला कुत्रा दिसला नव्हता.
दिसला नसेल, पण मला त्याचा वास आला, कुत्र्यांना माणसाचा येतो ना तसा मला त्याचा आला.

चौकशी केली तेव्हा कळलं, खरंच त्याच्या घरी एक अजस्र कुत्रा होता.
म्हणे तो एकदा रस्त्याने चालला होता. समोरून एका म्हाताऱया माणसाची प्रेतयात्रा चालली होती. त्यात ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’ हे गाणं वाजवत होते. त्यातलं ‘याहू…’ हे कुठल्या मुलाने म्हणायचं यावर वाद झाला. त्याला बघून ते म्हणाले,
‘‘आता हेमंत साहेब! तुम्हीच निवाडा करा’’ त्याने म्हणे काहीतरी सांगितलं. ते पटलं नाही, मारामारी सुरूच राहिली.
‘‘आता अजून किती थांबणार? तुम्हीच काय ते करा.’’ शेवटी सगळं क्रियाकर्म मला करायला लागलं. कोण होता देव जाणे!
‘मेहबूब मंगल कार्यालय’ असा फलक निपाणीला पाहिल्याचे तो शपथ घेऊन सांगायचा.
एकदा त्याने सांगितलं होतं,
‘‘असा विचित्र पाऊस पडत होता! बैलगाडी चालली होती. बरोबर मध्ये पाऊस. एक बाजू कोरडी, दुसरा बैल भिजतोय. मुक्कामाला पोचल्यावर काय झालं असेल?’’
‘‘काय?’’ असा प्रश्न विचारायला माणसं ठेवलेली असावीत तसं विचारलं आम्ही…
‘‘काय?’’
‘‘भयानक दुर्दैव! एक बैल उष्माघात होऊन गेला आणि भिजत होता तो न्यूमोनियाने.’’
असा पाऊस हिंदुस्थानात कुठे पडतो हे हसण्याच्या कल्लोळात आम्ही विसरून गेलो.
गावाचं नाव त्याने कधीच सांगितलं नाही, ते आता त्याच्या बरोबर गेलं, पण त्या गावात म्हणे घराची राखण करणारा एक कुत्रा होता. मालकाच्या हातून तो एकदा रात्रीचा चुकून घराबाहेर राहिला. भल्या पहाटे घरातले धावत धावत बाहेर आले. पाहतात तो काय?
आम्ही जुनी नोकरी किंवा दास्यत्व विसरलो नव्हतो. एकसुरात सगळ्यांनी विचारलं.
‘‘काय?’’
‘‘कुत्रा दातात वाघनखं चघळत बसला होता.’’
‘‘हे जरा अतिच होतं’’ आमच्यापैकी एकाने विचारलं
‘‘म्हणजे कुत्र्याने वाघाला मारलं?’’
‘‘ते माहीत नाही, कारण नेमकं रात्री काय घडलं ते कुत्रा कसं सांगणार?’’
आम्ही सगळे बाद !
…आणि हा किस्सा तर भन्नाट आहे. म्हणे एकदा तो एका लग्नाला गेला होता, तिथे बँड वाजत होता. एका गाजलेल्या गाण्यावर कुणीतरी मंगलाष्टकं रचली होती. ‘‘कुठलं गाणं?’’ आमच्यापैकी एक.
‘‘रूप सुहाना लगता हैं। चाँद पुराना लगता हैं।’’
‘‘…आणि मंगलाष्टकांचे शब्द?’’
‘‘काळय़ांच्या घरी सोन्याचा क्षण आला. चिरनेरकरांचा दिलबागसिंह जावई बनून त्यांच्या घरी आला. अरे, तो ट्रम्पेट वाजवणारा चिरनेरकरांचा दिलबागसिंह’ हे कोंबलेले शब्द वाजवताना कोसळून मांडवात पडले, या हातांनी त्याला दवाखान्यात नेला मी.’’
आम्ही सगळे आपल्याला दवाखान्यात जायला लागेल या भीतीने हसायचं विसरलो होतो.

…तर हे असे अनेक किस्से आम्ही ऐकत होतो. बरीच वर्षे होऊन गेली, त्याची पत्नीसुद्धा नाटकात कामं करायची. त्याने सांगितलं नाही तिला कधीच, पण आपणहून तिने काम करणं थांबवलं. खूप वर्षांनी एका नाटकात तिने ‘अभिनय’ केला. एक छोटीशी भूमिका दोन किंवा तीन दृष्यं असलेली, पण नाटक संपल्यानंतर सगळय़ांच्या लक्षात राहिलं ते तिचं पात्र.

आम्ही सगळय़ांनी त्याला त्याबद्दल छेडलं. ‘‘अरे, ती जर कामं करत राहिली तर मला घरी बसून स्वयंपाक करावा लागेल आणि तो मला नाही करता येत. घरचे उपाशीपोटी झोपण्यापेक्षा तिने काम न केलेलं बरं. शिवाय तुम्ही कायम भुकेले, उपाशीपोटी माझ्या घरी चरायला येता. तुमचं काय होईल? या काळजीपोटी तिने काम थांबवलं.’’

कदाचित हे कारण खरं असावं. कारण तृप्त होईपर्यंत त्याच्या घरी त्या काळात आमच्यासारख्या भुकेल्या लोकांसाठी जेवायला मिळायचं.
आता तो नाही. त्याची पत्नी दुसऱया शहरात कायमची राहायला गेली. आम्हाला आता घरी खायला मिळतं, पण नव्याने मुंबईत आलेल्या कलाकारांना माता-पित्याच्या आग्रहाने कोण खाऊ घालणार आणि अभिनयाचे धडे गिरवायला कोण मदत करणार आणि असे कदाचित घडलेले सत्य आणि असत्य या सीमारेषेवरले किस्से कोण सांगणार?
तो विनोद, ते किस्से, ती गंमत जंमत आणि प्रेम, माया, जिव्हाळा आमचा हरपला तो हरपला. तो खूप दूर गेला म्हणून आणि त्याची पत्नी आता इथे नाही म्हणून!

(लेखक ज्येष्ठ अभिनेता आहेत.)