
>> संजय मोने
मनोज रहाटे ऊर्फ डिटेक्टिव्ह खरं तर जन्माला यायचा कुठेतरी परदेशात. कारण एक वाचक म्हणून तो कायम परदेशी साहित्याशी संलग्न असायचा किंवा निगडित नाहीतर जुडलेला असायचा. त्यातही हेरकथा, गूढ कथा वगैरे त्याच्या विशेष आवडत्या होत्या.
“सटासट पाठलाग करत निघालो. एकदम सूममध्ये. चव्हाणकाका पुढे, मी मागोमाग. पाचदहा फुटांचं अंतर आमच्या दोघांच्यात, पण त्यांना माहीतच नव्हतं की मी पाठलाग करतोय. ज्याच्या मागावर असेन त्याचा बाजूला, अगदी चिकटून उभा राहिलो ना, तरी पत्ता लागणार नाही, उगाच का इतक्या रहस्यकथा वाचून तोंडपाठ केल्या? तर मी काकांच्या अगदी बाजूला. त्यांचं काय तरी प्रकरण आहे असा मला अंदाज आला होताच.”
“कसा? नेमकं काय करतोस रे? नोकरी की धंदा? असो. नाशिकला जातोस. आठवडय़ात तीन/चार दिवस तिथे असतोस. दोन दिवस सुट्टी असते तेव्हा अर्धा वेळ झोपलेला असतोस.”
“तिथेच तर तुम्ही गंडता. आकाश पांघरून जग शांत झोपलेले घेऊन एकतारी गातो कबीर दोहे. हे गाणं ऐकलंय ना? माझ्याकडे एकतारी नाही. शिवाय दोहे वगैरे काय आहे ते प्रकरण मला माहीत नाही. त्यामुळे ते गाता येणार नाहीत. पण तुमचं जग झोपलेलंच असतं आणि मी जागृतावस्थेत. रोज त्यामुळे मला काहीतरी करून दाखवायलाच पाहिजे, म्हणून मी माझ्या कामगिरीवर निघतो.”
“कुठली कामगिरी? आणि कोणी सोपवल्ये तुझ्यावर ही जबाबदारी?”
“केवळ आवड आणि समाजाचं आपल्यावर जे कर्ज आहे…”
“समाजाने तुला कधी कर्ज दिलंय का?”
“आर्थिक कर्ज नाही रे!”
“कर्ज, व्याज, नफा, तोटा आणि शेवटी दिवाळखोरी हे सगळं अर्थशास्त्रात येतं ना?”
“असेल, पण ते तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेसाठी.”
“तू आमच्यात मोडत नाहीस?”
“आहे रे! पण मी तुमच्यात असून माझी गणना तुमच्यात होत नाही. माझ्या अस्तित्वाचं प्रतल वेगळं आहे. काल रात्री नाक्यावरच्या दुकानातून सोडा मागवून घेतलास, तो पोट जडजड वाटत होतं म्हणूनच ना, तूच म्हणालास मगाशी. खरं आहे ना?”
“कर्जाचं काय म्हणत होतास?”
“अरे आपण जन्माला येतो, एका समाजात वावरतो. तो आपल्याला ओळख देतो. नाव देतो. हे एक प्रकारचं नैतिक कर्जच नाही का? आणि ते परत करायला नको?”
“मनोज! आमच्याकडून कॉलेजच्या दिवसात हातउसने पैसे घ्यायचास, ते आपल्या सगळ्यांना नोकऱया लागल्या तरी परत दिलेस कधी? समाजाचं कर्ज आणि तेही नैतिक का काय म्हणतोस ते, तू फेडणार? मला कळेल अशा भाषेत सांग ना? इथे या रेस्टॉरंटमध्ये बसून आपला हा दुसरा चहा संपतोय, त्याआधी बनमस्का आणि ऑम्लेट ठेचून झालंय. पैसे मीच देणार आहे. त्या बदल्यात निदान काहीतरी डोक्यात शिरेल ही अपेक्षा ठेवली तर काय चूक आहे का?”
“आपले ते बाजूच्या सोसायटीत दादा चव्हाण राहतात ना? गेले काही दिवस त्यांच्या हालचाली पाहिल्यावर मी जरा किंकर्तव्यमूढ झालोय. नको तेव्हा बाहेर पडतात घराच्या. कधी हातात छत्री असते तर कधी काठी असते.”
“पावसाळ्यात छत्री घेऊन नाही फिरणार का कोणी?”
“आणि काठी? त्याने पावसापासून बचाव कसा होईल? सगळंच चित्तचक्षूचमत्कारित आहे! किंवा विवाद्य”
“विवाद्य? किंकर्तव्यमूढ? चित्तचक्षूचमत्कारित? कुठले काय काय नवनवे शब्द काढतोस तू? छापखान्याच्या बाजूच्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला होता काय तुझा? बी.ए.ला मराठी भाषेत दोनदा नापास झाला होतास तेव्हा पेपर लिहिताना आता बोललास त्यातले कुठले शब्द का नाही वापरलेस?”
“माझी शैक्षणिक अब्रू काढायला बसलोय का इथे? एक कडक पाव मस्का लाना”
“आं! एकदम हिंदी?”
“वेटरला सांगितलं! तर विषयाला भिन्न मार्गिकेवर नेऊ नकोस.”
मनोज रहाटे ऊर्फ डिटेक्टिव्ह खरं तर जन्माला यायचा कुठेतरी परदेशात. कारण एक वाचक म्हणून तो कायम परदेशी साहित्याशी संलग्न असायचा किंवा निगडीत नाहीतर जुडलेला असायचा. (हे तीनही त्याचेच शब्द. साधं वाचन, तेही चाळीतल्या कॉमन दिव्याच्या प्रकाशात करणाऱया माणसाला इतक्या जडजड शब्दांनी संबोधत असतील हे माहीत नव्हतं.) त्यातही हेरकथा, गूढ कथा वगैरे त्याच्या विशेष आवडत्या होत्या. त्यातूनच ही चव्हाणांच्या पाठलागाची गोष्ट सुरू झाली होती. जरा कुठे काही घडलं की त्याला लगेच संशय यायचा. काहीतरी पाणी मुरतंय असं त्याला वाटायचं. आजपर्यंत त्याला आलेल्या संशयाची खात्री कधीही पटली नाही. पण त्याची चिकाटी जबरदस्त होती. कॉलेजात असताना पदवी मिळवताना ती आमच्या लक्षात आली होती. त्याच्याबरोबर शिकणारी मुलगी त्याला शिकवायला वर्गात आली तेव्हा आम्ही सगळ्यांनी पदवीचा नाद सोड असं सांगितलं होतं, पण त्याची चिकाटी कायम होती आणि त्यामुळे तो अनेक वर्षांनी अखेर पदवीधर झाला, दरम्यान तीन तरी प्राचार्य निवृत्त होतांना त्याने पाहिले. प्राध्यापक तर तब्बल वीस-पंचवीस तरी त्याच्या हाताखालून गेले. चांगला व्यवसाय सुरू झाला होता किंवा नोकरी तरी होती त्याला. चार पैसे कायम खिशात असायचे आणि ते तसेच टिकायचे, कारण इतर जण त्याचा अवांतर खर्च नित्यनेमाने भागवायचे. मीही त्यातला माझा खारीचा वाटा उचलत होतो.
“वा! आज जरा मस्का पाव विशेष होता. आता चव्हाण! रस्त्यावर घुटमळत उभे. मी त्यांच्या मागावर. ते टुकुर टुकुर इकडे तिकडे बघताहेत.”
“कसे?” मी.
“टुकुर टुकुर. तो बघण्याचा एक प्रकार असतो.”
“बरं. आम्ही आपले एकदाच लग्नासाठी मुलगी बघायला गेलो होतो तेव्हा तिच्याकडे चोरून चोरून बघत होतो.”
“त्यालाच टुकुर टुकुर म्हणतात.”
“म्हणजे चव्हाणदादा आता या वयात लग्न?…एक बायको असताना?”
“मध्यमवर्गीय विचार करूनच संपून जा! अरे बायकोशिवाय म्हणून काहीतरी असतं ना काही लोकांच्या आयुष्यात.”
“नको रे बाबा! चव्हाणदादा असा असेल असं वाटलं नव्हतं!”
“अडवू नकोस रे! तर चव्हाण असे इकडे तिकडे बघत असतांना एक गाडी थांबली. त्यातून एक नाजूक हात बाहेर आला.”
“नुसता हात? त्याला शरीर जोडलेलं नव्हतं?”
“असणारच ना! मला फक्त स्त्राrचा नाजूक हात दिसला.”
“स्त्राrचाच कशावरून? आपल्या त्या खालच्या मजल्यावरच्या भाईसाहेब प्रधानांचे हात नाजूक नाहीयेत?”
“हातात बांगडय़ा होत्या. अचानक चव्हाणदादा गाडीत शिरले. मी बाजूचीच रिक्षा पकडली आणि त्यांच्या मागोमाग गेलो. गाडी थांबली. चव्हाणदादा आणि ती बाई उतरली. एका बिल्डिंगमध्ये शिरली.लिफ्टमध्ये गेले दोघे. मी कितव्या मजल्यावर ती थांबते ते बघितलं आणि घुसलो. आठव्या मजल्यावर गेलो. तीन घरं होती, त्यातल्या एका घराच्या दारातून रक्ताचा लालभडक ओहोळ वाहत होता.
“लालभडक?” मी.
“मग निळ्या रक्ताचा प्राणी असतो का?” रक्त बघून माझ्यातला गुप्तहेर जागा झाला. आता पुढचं तो सांगणार इतक्यात वेटर ओरडला, “कितना टाईम बैठेगा और? रेल्वे टेशन है क्या ये?”
आम्ही बाहेर पडलो. तितक्यात मोबाईलवर बायकोचा आवाज… “काय संसाराला कंटाळून निघून बिघून जाताय की काय?”
मी मनोज रहाटेचा निरोप घेऊन निघालो. पण चव्हाणदादाचं काय झालं ते मला हवं होतं. संध्याकाळी असाच म्हणून त्यांच्या घरी गेलो.
“काय हो! तो तुमचा मित्र मनोज रहाटे…महामूर्ख आहे हो.” असं म्हणत चव्हाणांच्या तोंडून न ऐकण्यासारख्या, न लिहिण्यासारख्या आणि न छापण्यायोग्य अशा असंख्य शिव्या निघून गेल्या. त्याचा मथितार्थ. मनोजने रक्ताचा ओहोळ बघून पोलिसांना फोन केला. पोलीस आले. त्यांनी दार वाजवलं. चव्हाणांचा घरं रंगवायचा धंदा होता, त्यातल्या एका घरात लाल रंगाचा डबा उपडा झाला म्हणून ती बाई त्यांना ते दाखवायला घेऊन गेली होती. पोलीस मनोजला तुडवणार होते. दादा मध्ये पडले म्हणून… हे सगळं मी मनोजला सांगितलं तर-
“ठीक आहे. यावेळेला झाली चूक, पण चव्हाणदादा वाटतो तितका सरळ नाही. एक दिवस त्याला नाही चार चौघात… असो. ह्या आमच्या अर्ध्या मुर्ध्या डिटेक्टिव्हला एखादी केस सोडवायला मिळो.. पूर्ण आणि मार-बीर न खाता.




























































