
>> संजय शिंदे
मेजर कौस्तुभ राणे यांचा पहिला स्मृतिदिन उंबरठय़ावर असतानाच पतीवियोगाचं दुŠख पचवत त्यांची पत्नी कनिका राणे या लष्करात भरती होत आहेत. लष्कराच्या संबंधित परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. हा पुढचा प्रवास कर्तृत्ववान ठरणारा आहे हे नक्की.
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका 20-21 वर्षांच्या मुलीला अचानक एक मुलगा भेटतो. बघताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. नंतर दोघांच्याही गाठीभेटी वाढत जातात. नात्यात प्रेम फुलत जातं. नंतर एक दिवस तो तिला आपला सैन्यक्षेत्रात करीयर करण्याचा निर्णय सांगतो. सैन्यात भरती होतो. त्यासाठी जीवापाड मेहनत करतो. बॉर्डरवर अतुलनीय शौर्य गाजवत देशासाठी लढत राहतो. दरम्यान त्या दोघांचं लग्न होतं. त्यांना एक छानसा मुलगा होतो. त्याला व पत्नीला भेटायला तो अधूनमधून येत-जात असतो, पण एक दिवस अचानक त्यांच्याऐवजी येते ती – तो शहीद झाल्याची बातमी.

एखादं रचलेलं कथानक वाटावं अशी ही कथा घडलीय शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांच्या वास्तव आयुष्यात. कुठल्याही स्त्र्ााrच्या आयुष्यात असं काही घडलं तर त्या स्त्र्ााrचं कोसळणं अगदीच स्वाभाविक आहे. गेल्या वर्षी 7 ऑगस्ट 2018 रोजी मेजर कौस्तुभ राणे कश्मीरच्या गुरेज व्हॅलीमध्ये हिंदुस्थानात घुसू पाहणाऱया दहशतवाद्यांना ठार करून स्वतःही त्या चकमकीत शहीद झाले. त्या दिवशी ती बातमी कळताच कनिका राणे यासुद्धा अशाच कोसळल्या. अगदीच अकस्मात घडलेल्या या घटनेचं जेवढं दुःख पत्नी म्हणून कनिका राणे यांच्या वाटय़ाला आलं तेवढंच दुःख कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती राणे, बाबा प्रकाशकुमार राणे आणि कौस्तुभची छोटी बहीण काश्यपी राणे या सर्वांच्याच वाटय़ाला आलं.
मालाडमधल्या उत्कर्ष मंदिर नावाच्या एका शाळेत समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे, संस्काराचे, देशप्रेमाचे धडे देत ज्योती राणे यांनी अनेक वर्षे काम केलं. नव्या पिढीला देशप्रेमाचे धडे देणाऱया या शिक्षिकेने, मातेने आपल्या विचारांना कृतीची जोड असली पाहिजे या भावनेनं स्वतःचा मुलगा भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण केला. प्रकाशकुमार राणे हे मीरा रोडच्या शीतल नगर परिसरातले एक उत्साही व उपक्रमशील व्यक्तिमत्त्व! गणेशोत्सव मंडळ ते सोसायटीच्या अगदी छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमातही ते उत्साहाने धावपळ करतात. कौस्तुभ राणे गेले त्या दिवशीही ते अगदी शांतपणे भेटायला येणाऱया प्रत्येक माणसाशी बोलत होते. त्यावेळी त्यांच्या मनात पुत्रवियोगाचं दुःख नसेल का? असेलच. अगदी 100 टक्के असेल, पण त्याक्षणी त्या पुत्रवियोगाच्या दुःखाची जागा घेतली होती ती त्यांनी जन्म दिलेल्या पुत्राने गाजवलेल्या अतुलनीय कर्तृत्वाच्या, वीरतेच्या आणि शौर्याच्या अभिमानाने!
काश्यपी ही कौस्तुभ राणे यांची छोटी बहीण. दोघांमध्ये तब्बल आठ-नऊ वर्षांचं अंतर. त्यामुळे कौस्तुभ हा काश्यपीचा मित्र कमी आणि फिलॉसॉफर, गाईड अधिक होता. त्याच्यातल्या बेडरपणाचे, कणखरपणाचे संस्कार कळत-नकळतपणे काश्यपीवर झालेले असणार. म्हणूनच कौस्तुभ गेला त्या दिवशी डोळय़ातलं पाणी पापण्यांच्या काठाशी अडवून ती सगळय़ा नातेवाईकांना फोन करत होती. सर्व लष्करी अधिकाऱयांचे फोन घेत होती. अर्थात कौस्तुभला निरोप द्यायची वेळ आली तेव्हा तिचा बांध फुटलाच. कारण रक्षाबंधन केवळ 8-10 दिवसांवर आले होते. कौस्तुभला शेवटची राखी बांधून ते रक्षाबंधन कायमचं मनात साठवून तिने दादाचा निरोप घेतला.
या सगळय़ा प्रसंगांना आता जवळपास एक वर्ष होत आलं. 7 ऑगस्ट 2019 हा कौस्तुभ राणे यांचा पहिला स्मृतिदिन जवळ आला. या एका वर्षात एका पत्नीच्या, आईच्या, पित्याच्या, बहिणीच्या आणि संपूर्ण राणे कुटुंबीयांच्या घरात किती पोकळी निर्माण झाली असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. ज्योती राणे त्यानंतर जवळपास सहा-सात महिने कुणाच्याच फारशा संपर्कात नव्हत्या. काश्यपी पुढील शिक्षणासाठी दिल्लीला निघून गेली. कनिका राणे कुलाबा इथल्या नव्या सैनिकी घरात राहायला गेल्या.
7 ऑगस्ट 2019 जवळ येत होता तसतसे अनेक ठिकाणी कौस्तुभ राणेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रम आयोजित केल्याच्या बातम्या येत होत्या. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मीरा रोड येथे कौस्तुभ राणे यांचं भव्यदिव्य ‘वीरता स्मारक’ बांधण्याची तयारी सुरू केली आणि यातच 30 जुलै 2019 रोजी एक नवी बातमी आली. ‘शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे लष्करात भरती होणार…’
कौस्तुभ राणे यांचा पहिला स्मृतिदिन उंबरठय़ावर असताना त्याआधीच आलेली ही बातमी ऐकून सगळेच चकित झाले. कौस्तुभ राणे यांच्या बलिदानाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच तीन वर्षांच्या छोटय़ा मुलाचा सांभाळ करत, पतीवियोगाचं दुःख पचवत कनिका राणे अनेक महिने सैन्यभरतीच्या परीक्षेची तयारी करत होत्या. दिवसरात्र अभ्यास करत होत्या आणि शेवटी मोठय़ा जिद्दीने त्यांनी ती परीक्षा सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन कौस्तुभ राणेंच्या पावलावर पाऊल ठेवलंच!
कनिका राणे, ज्योती राणे आणि प्रकाशकुमार राणे यांच्याकडून कौस्तुभ राणे यांच्याविषयी काही ऐकणं हे नेहमीच खूप प्रेरणादायी असतं. राणेमॅडम म्हणतात, ‘लहानपणापासून मला कौस्तुभने शाळेतल्या एखाद्या परीक्षेत पहिलं यावं, एखाद्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवावा असं खूपदा वाटायचं. आज मला कळतंय की मी तेव्हा फार छोटी स्वप्नं पाहायचे. कौस्तुभची स्वप्नं माझ्यापेक्षा खूपच मोठी होती. तो गेल्यावर मला कायम एक प्रश्न पडायचा. ‘आता मी कुणाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारू? कनिका माझ्या या प्रश्नाचं उत्तर झाली. आता कौस्तुभची जागा कनिकाने घेतलीय. कौस्तुभनंतर आता तिच्या कर्तृत्वाचा प्रवास पाहताना आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतोय.’
कौस्तुभचे बाबा प्रकाश राणे म्हणतात, ‘कनिका अत्यंत कठीण अशी ही परीक्षा उत्तीर्ण झालीय. कौस्तुभच्या वेळी एकशे चाळीस मुलांमधून केवळ सहा जणांची निवड यासाठी केली होती. आताही अनेक जणींमधून केवळ एकटय़ा कनिकाची निवड झाली आहे आणि तिथे असं नाही की ती शहीद मेजर यांची पत्नी आहे म्हणून तिला भरतीसाठी काही सवलत वगैरे… तर तसं अजिबात नाही. कनिका स्वतःच्या क्षमतेवर या क्षेत्रात भरती झाली आहे.’
कनिका राणे यांना त्यांच्या या निर्णयाविषयी व पुढच्या प्रवासाविषयी विचारलं की त्या या साऱयाचं श्रेय कौस्तुभ राणे यांनाच देतात. ‘कौस्तुभचं नेहमी एकच म्हणणं असायचं की देश आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण देशासाठी काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी आधी माझं राष्ट्र, मग माझं युनिट आणि मग कुटुंब! सैन्यात असताना कौस्तुभची काही स्वप्न होती. त्यातली काही त्याने पूर्ण केली. काही अपूर्ण राहिली. त्याच्या पूर्ण झालेल्या स्वप्नांचा मला अभिमान आहे, पण त्याच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं काय? ती अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझ्या राष्ट्रासाठी काही करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यासाठी हवं असणारं बळ मला कौस्तुभच्या सहवासातल्या प्रत्येक क्षणाने दिलं आहे. मी कनिका कौस्तुभ राणे आहे. बस्स! हे नाव हेच माझं सर्वात मोठं बळ आहे!!






























































