दीर्घायू भव : लोणी – केशवाचे प्राण, फायदे अमृतासमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैद्य सत्यव्रत नानल

दहीहंडी, गोपाळकाला म्हटले की आठवतो तो खोडकर भगवान श्रीकृष्ण. त्याच्या लीला न संपणाऱ्या. कृष्ण म्हटले की गोकुळातील दूध, दही आणि लोणी यांच्या नद्या असे वर्णन डोळ्यासमोर आपोआप येते. माखनचोर म्हटले की आठवतात फक्त दोघेच, एक तो यशोदालाल कन्हैया आणि दुसरे त्याचे आवडते लोणी म्हणजेच मख्खन. हे लोणी म्हणजे नेमके काय, त्याचे आयुर्वेदानुसार फायदे काय, वापर कसा करावा इत्यादी सर्व गोष्टी गोपाळकाल्यानिमित्त आज आपण पाहुयात.

दही तोडून ताक बनवताना जो पदार्थ अमृतमंथनाप्रमाणे मिळत जातो तो म्हणजे लोणी. आयुर्वेदाप्रमाणे दही सहा वेगवेगळ्या प्रकारे बनते आणि त्या प्रत्येक प्रकाराचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. लोणी मिळवण्यासाठी कसे दही लावतात ते आता पाहुयात. ताजे निरसे दूध काढल्यावर एकदा उकळतात. उकळल्यावर संपूर्ण थंड झाल्यावर, त्यावर जाड सायीचा थर मिळतो, ती साय वेगळी केली जाते. या साईला विरजण लावून त्याचे दही बनते. या दह्यात शेवटी पाणी मिसळून, घुसळून पातळ ताक आणि घट्ट लोणी काढले जाते. दह्याला घुसळून त्यातून पूर्ण लोणी काढल्याशिवाय ताक बनत नाही, हे सर्वांनी कायम लक्षात ठेवावे. आजकाल दह्यात पाणी घालून तोडून पातळ पाण्यासारखे बनवून प्यायले जाते ते ताक नव्हे, ते पातळ पाणी जास्त असलेले दहीच असते. दही आणि ताक दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोणी वेगळे केल्याशिवाय दह्याचे ताक बनतच नाही. असो.

लोणी प्राकृत रंग कसा– पांढरा. गायीच्या दुधापासून मोत्यासारखे पांढरे लोणी मिळते तर म्हशीच्या दुधापासून पांढरे शुभ्र लोणी मिळते. लोणी म्हणजे तुपाचे आधीचे रूप. लोणी मंद आचेवर कढवले की तूप मिळते.

लोणी म्हणजे इंग्लिशमधे ‘फ्रेश व्हाईट बटर’ होय. (अनेक कंपन्या बटर नावाने जे विकतात ते लोणी नव्हे. तो डालडय़ापासून बनलेला पदार्थ आहे. त्याला लोणी समजण्याचे पाप करू नये.)

लोण्याचे फायदे

– फुप्फुसांची ताकद वाढवणे – लहान मुलांपासून ते जख्खड म्हाताऱया माणसांपर्यंत कुणाच्याही फुप्फुसांची ताकत वाढवायची असेल तर लोण्यासारखा दुसरा आहारिय पदार्थ नाही. एक चमचा ताजे लोणी, एक चिमुट काळी मिरी आणि एक चमचा मध एकत्र घोटून तयार झालेले मिश्रण रोज सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी चघळून खावे. आठ दिवसात फायदा दिसू लागतो. फुप्फुसांच्या जीर्ण रोगांसाठी काही औषधे घेत असाल तर त्यांचे गुणही वाढलेले दिसू लागतात. सुकलेल्या, औषधांचा मारा सहन करून कोमेजलेल्या फुप्फुसांमधे प्राण फुंकण्याचे काम लोणी करते.

– डांग्या खोकला, क्षयरोगी किंवा जीर्ण रोगाने खंगलेला रोगी (टीबी, एड्स, कॅन्सरसारखे अनेक रोग, ज्यात रोगी वजन कमी झाल्याने दगावतो) अशांनी पचेल तेवढे लोणी नियमित खाण्याची सवय निर्माण करावी, संपूर्ण शरीराचे पुनरुज्जीवन होऊ लागते.

– फिशरच्या त्रासात व्यक्ती वेदनेच्या भीतीने शौचास जायलासुद्धा घाबरतात. अशा लोकांसाठी एक कप कोमट दुधात किंवा गरम पाण्यात एक टेबलस्पून ताजे लोणी मिसळून प्यायला दिले तर शौचास सहज होते आणि जखमही भरु लागते.

– दूध, तूप, लोणी नियमित खाण्याची सवय केली तर बद्धकोष्ठ कायमचे नष्ट होते.

– त्वचेचा कोरडेपणा हा बहुतेक वेळा उपेक्षित विषय असतो. त्याकडे दुर्लक्ष करू नये. जेवणात नियमितपणे लोणी खाल्ले की शरीरात आणि त्वचेवरही कोरडेपणा कमी होतो. त्वचा कोरडी पडल्याने जर खूप त्रास होत असेल तर लोणी घेऊन ते त्वचेवर चोळावे, लगेच जिरते आणि त्वचा बरेच काळपर्यंत मऊ राहते. थंडीत त्वचा स्निग्ध ठेवण्यासाठी लोण्याने मालिश करणे सर्वात उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

[email protected]