दीर्घायु भव – थोडातरी भात हवाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> वैद्य सत्यव्रत नानल

तांदूळ हे हिंदुस्थानी लोकांचे अविभाज्य अन्न आहे. भाताशिवाय जेवण नाही, असे म्हणणारे कोटय़वधी जनसामान्य हिंदुस्थानात आहेत. आपल्या देशात तांदळाच्या काही हजार जाती आहेत. स्थानिक पातळीवर गावांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचा भात आजही खाल्ला जातो. काही लोक देशी वाण असलेले बियाणे आजही पिकवून खातात. संकरित धान्यापेक्षा देशी नैसर्गिक वाण कधीही उत्तमच. तांदळापासून फक्त भातच नव्हे तर शेकडो पदार्थ करून मोठय़ा प्रमाणात खाल्ले जातात. जसे तांदळाची भाकरी, कुरडई, पापड, इडली, डोसे, उकड इत्यादी.

हिंदुस्थानींना होणाऱया रोगांची यादी पाहिली तर हिंदुस्थान म्हणजे मधुमेहाचे माहेरघर म्हटले जाते. मधुमेहाचे आणि तांदूळ खाण्याचेही मोठे प्रमाण, या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळी होत आहेत. बरं, तांदूळ खाणे आधीही सुरू होते, पण पूर्वी मधुमेह वाढण्याचे प्रमाण मात्र एवढे नव्हते. म्हणजे गेल्या काही दशकातले बदल घडले त्यात त्याची कारणे दडलेली आहेत. तसेच तांदूळ खाण्याबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. मधुमेह झाला की तांदूळ खाणे सोडणारा एक मोठा वर्ग आता आहे, पण कोणताही पदार्थ पूर्णतः टाळणे हे योग्य नव्हे. म्हणून आयुर्वेदाप्रमाणे स्वास्थ्याचे जतन करताना तांदळाबद्दलचे नियम समजून घेतले तर सर्व गैरसमज टाळता येतात हे मात्र नक्की.

आयुर्वेदाप्रमाणे कोणतेही नवीन धान्य खाणे म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण देणे. आपल्याकडे पूर्वी वर्षभराचे धान्य भरून ठेवले जायचे. आजही काही ठिकाणा ही प्रथा सुरू आहे. हळूहळू वर्षभरात ते वापरून खाल्ले जायचे. त्यामुळे ते आपोआप जुनेही व्हायचे. आता परिस्थिती बदलली. घरे छोटी झाली. एकदम धान्य भरून ठेवणे परवडत नाही. त्यातच संकरित जाती वर्षभर टिकत नाहीत. वगैरे वगैरे… आधी नवीन धान्य आणि जुने धान्य यातील मुख्य फरक समजून घेणे गरजेचे आहे. नवीन धान्यात नैसर्गिक ओलावा तर जुन्या धान्यात कोरडेपणा अधिक असतो. धान्य जुने केल्याने त्यातील अतिरिक्त पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धान्य पचनास हलके होते. धान्यावर हाच काळाचा होणारा परिणाम आयुर्वेदाला अपेक्षित आहे. आयुर्वेदाप्रमाणे नवीन धान्य प्रकार खाल्ल्याने शरीरात अनेक स्तरांवर लवकर आणि सहज बिघाड होतात. यात प्रामुख्याने मुत्रवह संस्थेचे वेगवेगळे रोग होतात, जे शरीराला वेगवेगळय़ा 20 प्रमेह प्रकारांकडे घेऊन जातात. यातील विसाव्वा म्हणजे मधुमेह. हिंदुस्थानात फक्त मधुमेह नव्हे तर किडणी निकामी होणे, लघवीचे विविध रोग, त्वचेचे रोग, यकृताचे रोग, विविध होर्मोनल इम्बॅलन्सेस, विविध इंडोक्रायनल अवयवांचे आजार, प्रोस्टेट, प्रजनन संस्थेचे विविध रोग यांचे प्रमाण मोठे आहे. आयुर्वेदानुसार नवीन धान्य हे या सर्वांचे एक प्रमुख कारण म्हणून आम्ही वैद्य पाहतो. या कारणाचा नेमका उपाय होणे गरजेचे आहे. म्हणून तांदूळ कसा खावा ते आता आज आपण पाहूया.

भात कसा बनवावा?

भात नेहमी मऊ बनवून खावा. फडफडीत भात पचायला जड असतो. बिर्याणी, मसाले भात, पुलाव अशा पदार्थांमध्ये भाताची शिते कोरडी असतात. त्यामुळे हे पदार्थ पचनास जड होतात. म्हणून ते नियमित खाऊ नयेत.

दही-भात

जनमानसात पोटाला थंडावा येण्यासाठी दही-भात खावा असा गोड गैरसमज आहे, परंतु याच्या नियमित सेवनाने अनेक रोग होतात. ताक-भात चालतो, पण दही-भात नियमित खाऊ नये. दही-भात नियमित खाल्ल्याने आपण घेत असलेल्या औषधांचे पूर्ण फायदे होत नाहीत. रोग बळावतात हे कायम लक्षात ठेवावे.

किती खावा

एक मूद (मूठभर) भात एकावेळी खावा. फक्त भात जेवू नये.

कधी खावा

(अ) भात सकाळी किंवा दुपारी खावा. रात्री खाऊ नये. (आ) जेवताना भात आधी खावा. जेवणाच्या शेवटी भात कधीही खाऊ नये.

तांदूळ कुणी खावा?

तांदूळ म्हणजे उत्तम पोषण. म्हणजे जी व्यक्ती रोज नियमितपणे उत्तम प्रतीचा व्यायाम करते, ज्यांचे काम हे अंग मेहनतीचे असते त्यांनीच तांदूळ नियमित खावा. मधुमेही व्यक्तीने आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा दुपारी जेवणात थोडा भात खावा.

– सर्वप्रथम तांदूळ किमान सहा ते आठ महिने तरी जुना करून खावा हे सर्वात उत्तम.

– दर महिन्याला जेवढा तांदूळ लागतो तेवढा तांदूळ एकदाच मोठय़ा कढईमध्ये (रवा भाजतो त्याप्रमाणे) चांगला भाजावा. भाजल्यावर थंड करून डब्यात भरावा. रोज लागेल तेवढा काढून वापरावा. याने तांदळामधील नैसर्गिकरीत्या असलेले अतिरिक्त पाण्याचे प्रमाण कमी होते.

– भात बनवताना सोबत आल्याचा एक तुकडा चेचून घालावा आणि शिजवून भात करावा. आल्याऐवजी लसूण, काळी मिरी, दालचिनी, सुंठ यापैकी कोणताही प्रकार वापरता येतो. शिजवल्यावर हे पदार्थ काढून टाकावेत किंवा भातासोबत खाल्ले तरी चालतात. (पित्ताचा त्रास असलेल्यांनी हे करू नये. उन्हाळय़ातही हे करू नये.) शिजवल्यावर भाताचे पाणी आठवणीने काढून टाकावे. हातसडीचा तांदूळ वापरावा.

– भाजलेल्या तांदळाचाच पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करावा. भाजलेल्या तांदळाचेच पीठ वापरावे.

– ताप, सर्दी, खोकला असो किंवा इतर कोणताही दारुण रोग असो, तांदळाचा मऊ/गुरगुटय़ा भात करून खाणे हे पथ्यकर ठरते. तूप-मीठ-भात, तांदूळ-मुगाची ताजी मऊ खिचडी हे सर्वश्रेष्ठ पथ्य आहे. दूध-भात खाल्ल्याने आम्लपित्त आणि इतर पित्ताच्या रोगात आराम मिळतो. भाताची पेज सर्वश्रेष्ठ पथ्य आहे. हे झाले काही सामान्य नियम आयुर्वेदाने सांगितलेले. याचप्रमाणे गहू, ज्वारी, बाजरी अशा बाकीच्या धान्यांचेही काही नियम आहेत. ते पुढे कधीतरी पाहू. आज एवढेच.