>> शरद शां. जोशी
सध्या पेपर अथवा टीव्हीवर पर्यावरणावर अनेकजण बोलताना-लिहिताना वाचतो. मानवाने स्वार्थासाठी निसर्ग ओरबाडून पर्यावरणाची प्रचंड हानी केली आहे. पृथ्वीचे तापमान वर्षागणिक वाढत आहे. त्याचा पर्यावरणावर प्रचंड दुष्परिणाम होत आहे. औद्योगिकीकरणाने व जंगलतोडीमुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढून धोक्याची पातळी ओलांडली आहे. हिमालय व हिमनद्या वितळतायत… वगैरे वगैरे.
औद्योगिक प्रगती झालीच पाहिजे, पण पर्यावरण रक्षण व जंगल संरक्षण व संवर्धन कसे होईल ते पाहिले पाहिजे.
साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने यावर काम करायचे ठरवले आहे. साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट ही सेवाभावी नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. ‘वळणेश्वर’, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे समाजोपयोगी अनेकविध उपक्रम राबवत आहे.
आम्ही कोकणात काम करत असताना आमच्या असे पाहण्यात आले की कोकणात अनेक एकर जमिनी ओसाड पडलेल्या आहेत. त्यावर कित्येक वर्षे कोणीही काहीही करत नाही. एक-दोन पिढय़ा त्या जमिनी अशाच ओसाड आहेत. मी अशा कित्येक लोकांच्या संपर्कात आलोय ज्यांच्या जमिनी कोकणात आहेत, पण नोकरी-व्यवसायात व्यस्त असल्याने कित्येक वर्षे कोणी गावाला जात नाही, तिथे कोणी राहात नाही. त्यामुळे त्या ओसाड पडलेल्या आहेत. लोकांनी अशा ओसाड पडलेल्या जमिनी कायदेशीर करार करून आमच्या ट्रस्टकडे 25 वर्षांसाठी द्याव्यात. जमिनी मूळ मालकाच्याच नावे राहतील. करार करून 25 वर्षासाठी ट्रस्टच्या ताब्यात दिल्यावर आम्ही देणगीदारांच्या व कंपन्यांच्या सीआरएस फंडाच्या माध्यमातून त्यावर जंगल लावू. तेथे पर्यावरणपूरक व स्थानिक झाडांची लागवड करू (उदा. वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, कडुलिंब, कोकम, बांबू, आंबा, रिंगे, हरडा, बेहडा इ.) कोणत्याही कमर्शिअल उत्पादनाच्या उद्देशाने झाडे लावणार नाही. थोडक्यात जमिनीचा कमर्शिअल उपयोग करणार नाही.
10/12 वर्षांत स्थानिक झाडे मोठी होतात व ती हवेतील कार्बन शोषून प्राणवायू बाहेर टाकतात. पक्षी, प्राणी यांना अन्न मिळते व निवासाची सोय होते. आमची 25 वर्षांची अट त्यासाठीच आहे की 10/12 वर्षात मोठय़ा झालेल्या झाडांचा (जंगलाचा) पुढील 12/15 वर्षे पर्यावरणाला खूप मोठा फायदा होईल व निसर्गचक्र सुरू राहण्यात हातभार लागेल.
फार मोठय़ा प्रमाणावर ओसाड जमिनींचे रूपांतर जंगलात झाल्यास निसर्गाची विस्कटलेली घडी नीट सुरळीत होण्यास हातभार लागेल. आम्हाला कल्पना आहे हे काम सोपे नाही. त्यात अनंत अडचणी, कटकटी व संकटे आहेत, पण पर्यावरणासाठी त्या सहन करायची आमची तयारी आहे. जमीन मूळ मालकाच्याच नावे राहील. फक्त 25 वर्षे त्यावर ट्रस्टला काम करण्यास परवानगी द्या व 25 वर्षे ती तुम्ही विकणार नाही याची हमी द्या. पर्यावरणाबद्दल आस्था असलेल्यांनी व मोठमोठय़ा आस्थापनांनी त्यांच्या सीआरएस फंडातून या पर्यावरण पूरक उपक्रमाला सढळ हस्ते मदत करावी.
(लेखक साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आहेत.)
– [email protected]
– Website : www.saathsaathct.org




























































