शिरीषायन – गॉडमदर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

‘गानकोकिळा, भारतरत्न, सूरसम्राज्ञी लता मंगेशकर बोलताहेत का?’

‘हो.’

‘मी वाचस्पती, गुरुवर्य, माहीम शिरोमणी शिरीष कणेकर बोलतोय.’

‘बोला बोला. खरं म्हणजे तुम्ही इंद्राचे रत्नजडित ऐरावत, गंधर्व, ब्रह्मकमळ आहात.’

लता गाऊन आपली तोंडं बंद करते हे आपण जाणत होतो, पण बोलूनही ती आपल्या तोंडाला पलिस्तर लावते हे मी अनेकदा अनुभवलंय.
फोनवर बोलता बोलता ती मध्येच ब्रेक लागल्यासारखी थबकायची आणि म्हणायची, ‘तुम्ही हे लिहिणार नाही नं?’
‘लिहिण्यासारखं नाही ते नाही लिहिणार. लिहिण्यासारखं आहे ते लिहिणार.’

‘उदाहरणार्थ?’

‘उदाहरणार्थ, आयुष्यात एकाच माणसाच्या तुम्ही थोबाडीत मारली होतीत हे लिहीन, पण कोणाच्या मारली होतीत ते लिहिणार नाही. कोण दिवसभर छोटय़ा ऑस्टीन गाडीतून तुमचा पाठलाग करीत फिरायचा ते लिहिणार नाही. तुमच्याशी लघळपणा केल्याबद्दल ज्या पार्श्वगायकाबरोबर गाणं तुम्ही कायमचं सोडलंत त्याचं नाव लिहिणार नाही. ‘घरी ये, मी तुला दारातच उभा चिरीन..’ ही धमकी तुम्ही कोणाला दिली होती हे मी लिहिणार नाही.’

लता ध्यानपूर्वक ऐकत होती. माझ्या सगळं लक्षात आहे व एकापाठोपाठ आठवतंय याची नव्वदीतही कुशाग्र मेंदू असलेल्या लतानं निश्चित नोंद घेतली असणार. मीही एका गोष्टीची नोंद घेतली होती. ती सहजासहजी कोणावर पटकन विश्वास ठेवायची नाही. त्याला नीट पारखून घ्यायची, आजमावायची. या कठोर परीक्षेतून तो तावून सुलाखून निघाला की मगच त्याच्यावर विश्वास ठेवायची. मीदेखील या प्रक्रियेतून गेले होतो आणि तिचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर कोणी कितीही कान भरले तरी ती बधत नसे. स्वतःच्या मूल्यमापनावर तिचा पूर्ण विश्वास होता.

तिची मुलाखत, तिच्यावर लेख छापून आले की त्यातल्या कशाबद्दलही ती शब्दाने हरकत घेत नसे. लिहिताना जी काय काळजी घ्यायची, जी काय पथ्ये सांभाळायची ते सगळं मी केलं असणार हे ती गृहीत धरायची. माझ्या प्रांतात ती चुकूनही ढवळाढवळ करायची नाही. हे असं आणखी कोणाबद्दल आपण म्हणू शकतो?

मध्यंतरी मी मला सर्वाधिक आवडणारी लताची माझ्या मते (हे महत्त्वाचे) दहा सर्वश्रेष्ठ गाणी निवडायला मांडी घालून बसलो. ते एवढं कठीण कर्म होतं की थोडय़ाच वेळात मी कर्माला बोल लावत बसलो. (त्यापेक्षा भिंतीला तुमडय़ा लावत बसायला हवं होतं का?) माझा एक लताप्रेमी मित्र दसऱयाच्या मुहूर्तावर लताची एक हजार सर्वश्रेष्ठ गाणी निवडायला बसला. तो बसला तो बसलाच. बरं, कुठं बसलाय हेही कळायला मार्ग नाही. लताची हजार गाणी सोबतीला असताना त्याला कोणाची गरज पडणार होती? ‘मेरे पास माँ है’ म्हणणाऱया शशी कपूरप्रमाणे माझा मित्र म्हणू शकला असता, ‘मेरे पास लता है.’ समोरचा खल्लास!

‘दीदी, मी तुम्हाला केव्हा भेटू शकेन?’ मी विचारलं.

‘मी डॉक्टरांना विचारून सांगते हं. मलाही तुम्हाला भेटायची घाई आहे.’ लताच्या या शब्दांनी मला धीर आला, ‘धर्मेंद्रलाही यायचंय मला भेटायला.’

हे आमचं शेवटचं बोलणं असेल. यानंतर तिचं बोलणं आपल्या कदापि कानी पडणार नाही, ती कधी दिसणारही नाही हे माझ्या ध्यानीमनी नव्हतं. आज मी लतावर प्रतिक्रिया देतोय, मुलाखती देतोय, लेख लिहितोय – सगळंच अभद्र.

ती कितीही आजारी असली, तिचं कितीही वय असलं तरी ती मला जाणाऱयातली कधीच वाटली नाही. तिचा मेंदू ठणठणीत होता. त्याला किंचितही वृद्धत्व आलं नव्हतं. गळा अजूनही गाता होता. बोलता बोलता फोनवर ती ‘अलिफ लैला’मधलं ‘बहार आयी खिली कलियाँ’ गायला लागली आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळय़ांच्या कडा भिजल्या. लता एकटय़ा माझ्यासाठी गात्येय या विचारानं मी कसनुसा झालो.

कुठला हा ऋणानुबंध? काय पाहिलं तिने माझ्यात? मी तिला जवळचा वाटतो हे तिनं स्वतःच्या तोंडानं मला सांगावं? मी गुदमरलो, घुसमटलो, भरून पावलो. ती माझी ‘गॉडमदर’ होती. न राहवून मी हे शब्दातीत नातं तिला सांगितलं. ती काहीच बोलली नाही. ‘आई नसणाऱयाला काय वाटतं ते तुम्हाला कळणार नाही व मला सांगता येणार नाही.’ मी लतापाशी बोलून गेलो. लता चूप राहिली. मला वाटलं ती ‘जहाँआरा’मधील मदन मोहनचं अप्रतिम गाणं म्हणेल, ‘मैं चूप रहू तो मेरे दिल के दाग जलते है।’

मी तिचं एखादं जुनं गाणं ऐकायचो व काळवेळ न पाहता तिला फोन करायचो आणि म्हणायचो, ‘अहो दीदी, का गाता की काय करता तुम्ही?’

‘गाते हो फक्त..’ ती हसत हसत म्हणायची.

आता लता नसली तरी तिची गाणी आहेत, पण गाणी असली तरी ती गाणारी लता नाही. वाटतं मोठय़ानं म्हणावं-
तुम न जाने किस जहां में खो गए।
हम भरी महेफिल में तनहा हो गए।
मी दुसऱयांदा आई गमावली!

– [email protected]