
>> शिरीष कणेकर
‘तुम्हाला मुलं किती?’ बसमध्ये शेजारी बसलेल्या सर्वस्वी अनोळखी माणसानं मला अकस्मात विचारले.
त्यानंतर बसनं जो आचका दिला तो रस्त्यात खड्डा आल्यानं की माझ्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अपरिचिताच्या प्रश्नामुळे, मला कळू शकले नाही. मी कोण, माझं नाव काय, मी काय करतो, मी कुठं राहतो यातल्या कुठल्याही क्रमवार प्रश्नाआधी त्याला प्रश्न पडला होता – ‘तुम्हाला मुलं किती?’
त्याला लग्नाची मुलगी असेलही, पण मला एवढा मोठा लग्नाचा मुलगा असेल असे माझ्या तोंडावळय़ावरून वाटणं शक्य नव्हतं. बरं, तुम्ही मुलीसाठी स्थळ बघताय म्हणजे बसमध्ये शेजारी बसलेल्याला विचारून हवेत बाण सोडायचा?
‘दोन. एक मुलगा आणि एक मुलगी’ उत्तर देण्यात काही नुकसान नाही हे पटल्यामुळे मी उत्तरलो.
‘बायकोपासून?’ त्यानं निर्व्याजपणे विचारले. मी नखशिखांत हादरलो. पहिला प्रश्न निरुपद्रवी असेल, पण दुसरा उपद्रवीच उपद्रवी होता.
‘बायकोपासून म्हणजे?’ मी तडकून म्हणालो, ‘आणखी कोणापासून असतात?’
‘असू शकतात’ तो सॉव्रेटिससारख्ता तत्त्ववेत्त्याचा चेहरा करून म्हणाला.
एव्हाना माझं टाळपं सणकलं होतं. घरी जेवायला बोलावून ‘काय जावईबापू, जेवणार का?’ असं माझ्या सासऱयानं विचारलं होतं तेव्हाही माझं टाळपं एवढं सणकलं नव्हतं. फार काय सांगू, हनीमूनला चिंचवडला गेलेलो असताना नववधूनं मला ‘आपण मुलगा दत्तक घ्यायचा का?’ असं विचारलं तेव्हाही मी एवढा खचलो नव्हतो. हा शेजारचा माणूस माझ्या सासूरवाडीशी संबंधितच असावा.
मी तलवार परजली व हिंस्रपणे म्हणालो, ‘तुम्हाला स्वतःला अशी लग्नाबाहेरची मुलं आहेत वाटतं? की तुम्ही स्वतःच तसे आहात?’
‘बघा, तुम्ही रागावलात.’ तो जयप्रकाश नारायणांच्या शांतपणे म्हणाला, ‘रागानं प्रश्न सुटत नसतात.’
‘कुठले प्रश्न? मला कुठलेच प्रश्न पडलेले नाहीत. तुम्हाला पडलेत.’
‘हो, मला पडलेत. आपण ते शांतपणे सोडवू या का?’ तो मृदू भाषेत म्हणाला.
‘मला दोन मुले आहेत हा तुम्हाला पडलेला प्रश्न आहे?’ मी तडकून विचारले.
‘माझ्या शेजारी खेटून बसलेल्या माणसाला दोन मुलं आहेत हा प्रश्न नाही?’
‘आत्तापर्यंत तो कोणालाच पडलेला नव्हता.’ मी वैतागून म्हणालो.
‘नसेल, पण तेवढय़ावरून तो प्रश्न नाही हे सिद्ध होत नाही’ तो म्हणाला. बेटय़ानं सरकारी वकील उज्ज्वल निकम व्हायला पाहिजे होतं.
‘मला दोन मुलं आहेत, काय म्हणणं आहे तुमचं?’ माझ्या त्वेषापुढे ‘मैं मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणणाऱया झाशीच्या राणीचा त्वेष कमी पडला असता.
‘माझं कशाला काय म्हणणं असेल? तुमची मुलं पोसून तुम्हालाच मोठी करायचीत. मी यात येतो कुठं? व्हेअर डु आय कम इन द पिक्चर?’
‘मग मगाचपासून चाललंय काय?’ आता माझा माझ्यावरचा ताबा सुटत चालला होता.
‘कुठं काय चाललंय? मी फक्त विचारलं, तुम्हाला मुलं किती आहेत? बस्स!’
‘तुम्हाला किती आहेत?’ मी माझ्या आक्रमणाचा मार्ग बदलला.
‘सात.’
‘ओ माय गॉड! आणखी चार जणांचं जमवलंत तर हिंदुस्थानचा क्रिकेट संघ तुम्ही घरातल्या घरात बनवू शकाल. तुम्हाला स्वतःला सामना बघण्याचे एक सोडून सात पासेस मिळतील. ते ब्लॅकमध्ये विकून तुम्ही पैसेही मिळवू शकाल. सातही मुलांना आइसक्रीम खिलवा. स्वपत्नीला पुन्हा गरोदर करा. करत रहा.’ मी एका दमात वचपा काढला.
‘तुम्हाला ही दोन मुलं नसती तर तुम्ही काय केलं असतंत?’ तो सोडायला तयार नव्हता.
‘तुमच्या सातातली दोन मी दत्तक घेतली असती. नाहीतरी चिंचवडला आम्ही त्याबद्दल बोललोच होतो.’
मला ताडदेवला जायचं होतं, पण मानसिक छळ असह्य होऊन मी दादरलाच खाली उतरलो.
आता कधी बसमधून गेलो तर शेजारच्या माणसाला पहिला प्रश्न विचारतो, ‘तुम्हाला मुलं किती?’


























































