विकेट एक खलस्त्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

ऑस्ट्रेलियाचा नवोदित डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुन्हेमन (‘जानेमन’सारखं वाचावं.) याने इंदूरला होळकर स्टेडियमवर कोहलीला लेग-स्टंपवर उंची दिलेला चेंडू टाकला. कोहली बचावात्मक पुढे खेळला. चेंडू बॅटसमोरून वळला व ऑफ-स्टंपच्या बाहेर गेला. पहिल्या दिवशी चेंडू इतका वळत नाही, पण खरी मजा पुढेच आहे. तो चेंडू बंपरप्रमाणे उसळला व चेंडूबरोबर उभ्या राहिलेल्या यष्टिरक्षकाच्या हेल्मेटवर आदळला.

हिला विकेट म्हणायचं का? ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’नं विकेट ‘निकृष्ट दर्जा’ची असल्याचा निःसंदिग्ध शेरा मारला. आपला कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतो माहित्येय का? तो म्हणतो, ‘प्रत्येक मालिकेपूर्वी कुठल्या प्रकारच्या खेळपट्टीवर खेळायचे हे आम्ही ठरवीत असतो. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळायचा निर्णय आमचा होता. फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ा ही हिंदुस्थानी संघाची ताकद आहे. घरच्या मैदानावर आम्ही सलग पंधरा मालिका जिंकल्या.’

म्हणजे फिरकी गोलंदाजांना कर्दनकाळ बनविणारी ही (व आधीच्या दोन) विकेट बनविण्यामागे रोहित शर्माची व अन्य धुरिणांची नुसतीच संमती नव्हती तर प्रोत्साहन, पाठिंबा व आदेश होते. जाडेजा व अश्विन भेदक ठरत होते, तर लायननं एका डावात आठ विकेट्स काढल्या. अशी विकेट बनवण्याच्या प्लॅनला लायन, कुन्हेमन व मर्फी यांचा पूर्ण पाठिंबा असावा. आपण माऱयाची सुरुवातच अश्विननं केली यातच विकेटमध्ये महंमद सिराजसाठी काय होतं ते कळलं.

थोडक्यात काय, अतिशय खराब खेळपट्टीवर दोघांतला जो संघ त्यातल्या त्यात बरा खेळतो तो जिंकतो. याला दोन संघांची निकोप स्पर्धा, तुल्यबळ लढत म्हणता येईल का? जिंकणे याला महत्त्व आहेच, पण त्यासाठी वाटेल तो गोंधळ घालणे समर्थनीय ठरते का?

विकेटच्या वर्तणुकीविषयी खुद्द रोहित शर्मा इतका गोंधळलेला होता, वेगवान स्टार्कच्या पहिल्याच षटकात तो चक्क दोनदा बाद होता. अंपायरनं दिला नाही. कर्णधार स्मिथनं तिसऱया अंपायरकडे काwल मागितला नाही. कारण बहुधा विकेट्स काढण्यासाठी तो फिरकी गोलंदाजांची वाट बघत होता व नवीन चेंडूची केवळ तकाकी जाण्यासाठी थांबला होता. सगळय़ांचाच एवढा बुद्धिभ्रंश करणारी विकेट ‘नॉर्मल’ कशी म्हणता येईल?

सगळेच देश त्यांच्या खेळाडूंना धार्जिण्या ठरणाऱया विकेट्स बनवतात ही वस्तुस्थिती असेलही, पण प्रत्येक देशात सामना अडीच दिवसांत संपतो का? या अडीच दिवसांच्या खेळखंडोबामुळे आपल्या विकेट्स एवढय़ा चर्चेत आल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं तर निर्णय देऊन टाकलाय. त्यांचा नियम धाब्यावर बसवून रोहित विकेट्स बनवून घेऊ इच्छितोय का?

हिंदुस्थानाला हिंदुस्थानात हरवणे कठीण असते असे परदेशी संघ म्हणतात, तेव्हा तो आपल्या संघाचा गौरव नसतो, तर विकेट्सविषयी काढलेले अनुदार उद्गार असतात. ‘अपनी गली में कुत्ता भी शेर’ ही म्हण भूषणास्पद नाही.

खिलाडू (स्पार्ंटग) खेळपट्टय़ा बनविण्यात गैर काय आहे? फार तर सलग पंधरा मालिका नाही जिंकणार. बरं मग? हरणं व जिंकणं एवढंच कळणाऱयांसाठी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतो की काय? जास्तीत जास्त पैसा मिळवणं याच्या पलीकडे जाऊनही काही विचार करणारे क्रिकेट धुरीण आपल्याला हवेत. ते कुठे मिळतात त्याचा शोध घेऊया. हे असंच चालू राहिलं तर कसोटी सामने तीन दिवसांचे करावे लागतील व फलंदाजीचे विक्रम ‘रेकॉर्ड बुक्स’मध्ये बघावे लागतील.

– [email protected]