शिरीषायन – दुपारी कोणी येणार येणार गं…

>> शिरीष कणेकर

दुपारी दोन वाजता दारावरची बेल वाजली.

पुण्यात वाजवून दाखवा. घरमालक तुमची पुण्यातील (चार पायांच्या) गाढवावरून धिंड काढेल व (तुमची पँट काढून) तुम्हाला डेक्कन जिमखान्यावर बदडून काढेल. त्यानंतर तो घरी जाऊन शांतपणे पुन्हा निद्राधीन होईल. तद्नंतर पुन्हा कोणी बेल वाजवली तर त्रस्त पुणेकर त्याला आत घेऊन शेजारी झोपवेल.

बेलने माझे डोके फिरवले. दुपारी दोन वाजता साक्षात परमेश्वरदेखील बाहेर उभा असला तरी मी दार उघडणार नाही. (नाहीतरी तो आत येऊन मला बरोबर घेऊनच जाणार ना?) हा काय छळवाद! नोकरीत असतानाही मी समोरच्या टेबलावर डोकं ठेवून दुपारी गाढ झोपायचो. तिथं चहाचा कप ठेवून मला डिस्टर्ब करण्याची चहावाल्याचीही शामत नव्हती. एकदा ऑफिसात मी साखरझोपेत असताना साहेबानं काही कामासाठी मला उठवलं. त्यानंतर मी त्याला जे काही फैलावर घेतलं की, पुढला आठवडाभर तो टेबलाखाली लपून बसला होता. जागा. भीतीनं त्याची तहानभूक हरवली होती व झोप उडाली होती.

मी विचारात पडलो की, कचकचीत दुपारी बेल दाबून माझी झोपमोड करायला कोण धजावला असेल? बेल दाबून मृत्यूला भेटायला कोण हा गधडा उत्सुक असेल? की ही साक्षात मृत्यूची बेल आहे हे न कळण्याइतका तो अज्ञ बालक असेल?…

मांजरानं उंदराला बघायला उत्सुक असावं तद्वत मी दाराबाहेरच्या आगंतुक भक्ष्याकडे बघायला उत्सुक होतो. (काय उपमा, सुगरण उडिप्यालादेखील करता येणार नाही.) मी दार उघडलं. बाहेर खरोखरच उंदरासारखा दिसणारा माणूस उभा होता. आतल्या बोक्यानं मिशा फेंदारल्या. आता उंदराचा फडशा पडणार तोच स्वयंपाकघरातील घूस पचकली, ‘तो कालही येऊन गेला. तुम्ही झोपलेले असल्याने तो निघून गेला. जाताना शिव्या पुटपुटत होता.’

मी कुतुहलाने उंदराकडे पाहिले व मंजूळ आवाजात विचारले, ‘काय शिव्या होत्या?’

‘खत्रुड, माजोरडा, निर्लज्ज!’ उंदीर सहजगत्या म्हणाला.

मरण तर अटळच होतं. तो कशाला घाबरेल? मृत्यू समोर उभा ठाकलेला असताना मूषक कसा बोलतो, कसा वागतो हे अभ्यासण्याची नामी संधी माझ्याकडे आपल्या पायानं चालत आली होती. त्याचं दारावरची बेल वाजवणे क्षम्यच ठरत नव्हतं का? दुपारी दोन वाजताही मृत्यू येऊ शकतो. अगदी पुण्यातही.

एकदा अशीच दुपारी एक वाचिका धडकली होती. तिनं टकलावर विग घातला होता. (वाचिका म्हणूनही कोणा सुस्वरूप युवतीनं माझ्याकडे का येऊ नये?) दात तिचे स्वत:चे होते की कवळी होती हे कळू शकले नाही. काही केल्या ती माझं पुस्तक वाचत बसल्येय हे चित्र मी डोळय़ांपुढे उभं करू शकत नव्हतो. ती नारायण धारपांच्या ‘हॉरर’ कथात शोभली असती.

‘माझ्या घरात माझ्याबरोबर भुतं राहतात.’ तिच्या पहिल्याच वाक्यानं माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी भेदरून माझ्या घरातील भुतांकडे पाहिले.

‘तुमची पुस्तके तीच मला वाचण्यासाठी काढून देतात.’ तिनं मला बहुमोल माहिती पुरवली.

‘कुठून काढून देतात?’ मी बावचळून काहीतरी विचारतात तसं विचारलं.
‘जिथं कुठे असतील तिथून.’

‘साधारण कुठे असतात?’

‘परवा चुलीतून काढून दिलं.’

‘चुलीत कोणी घातली?’ मी कापऱया आवाजात विचारलं. माझ्या पुस्तकांचा प्रवास यावर कधी लिहायचं नाही याची मी मनाशी खुणगाठ बांधली. चूल हे एकच माझ्या पुस्तकाचं कायम स्थान आहे असं वाचक म्हणाले तर?

‘तुम्ही भुतांना घरात कशासाठी ठेवलंयत?’

‘मी ठेवलेलं नाही. त्यांनीच मला त्यांच्या घरात राहू दिलंय. भुतं मोठय़ा मनाची आहेत.’

‘होय-होय. मोठय़ा मनाची असल्यामुळेच ती तुमच्या समवेत राहू शकतात’ मी म्हणालो.

‘मी तुमच्याकडे जात्येय म्हटल्यावर तीदेखील ‘आम्ही येतो’ म्हणून मागे लागली होती. एकी-दोघींनी तर विगदेखील घातले होते, पण मीच म्हणाले की पहिल्या वेळेला मीच एकटी जाऊन येते. पुढल्या वेळेला सगळे जाऊ. आपण सरांना या खोलीतून त्या खोलीत फेकून झेलाझेली खेळू या. ते पडले तर त्यांना बाल्कनीतून फेकू व खाली कोणीतरी झेलेल.’

मला दरदरून घाम फुटला. माझी वाचिका घरी जाऊन भुतात रमली असेल तरी माझी घाम-निर्मिती थांबली नव्हती.

दारावरची बेल काढून टाकावी का? ‘इथे भुतांना मज्जाव आहे’ अशी पाटी लावावी का? ‘झेल-झेल खेळल्यास पोलिसांना बोलावले जाईल’ अशी एखादी पाटी लावावी का? भुतांना मज्जाव म्हटल्यावर सासरची माणसं येणंही थांबेल का?…

[email protected]