‘व्हॉटस् अॅप’

>> शिरीष कणेकर

काही वर्षांपूर्वी ‘व्हॉटस् अॅप’ नावाचा अक्राळविक्राळ राक्षस जन्माला येईल आणि तो आपलं आयुष्य व्यापून टाकेल (तो बायकोची जागा घेईल हा त्यातला चांगला भाग झाला. ‘व्हॉटस् अॅप’च काय, दुसरं काहीही – अगदी सासूदेखील बायकोपेक्षा सुसह्य असते) असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. सचिन तेंडुलकरची जागा घेणारा, किंबहुना त्याला मागे टाकणारा फलंदाजोत्तम याच देशात निर्माण होईल असं तरी कधी वाटलं होतं? जवळजवळ घरटी एक मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाईल असं कोणाला वाटलं होतं? (‘लव्ह इन टोकियो’मध्ये निरुपा रॉयला हातपाय बांधून व मुसक्या आवळून टोकियोला घेऊन जातात. म्हणजे या अवस्थेत मुंबई विमानतळावर व त्याच अवस्थेत टोकियो विमानतळावर. स्वतःच्या अज्ञानाबरोबरच प्रेक्षकांचं अज्ञान जपणाऱ्या दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्तीचे आपण ऋणी राहूया).

तर ‘व्हॉटस् अॅप’! त्यावर न हसवणाऱ्या विनोदाची रेलचेल असते. सगळे मंगला गोडबोलेच लिहितात? त्यांचा विनोद वाचून कधीतरी हसण्याची महत्त्वाकांक्षा आहे. स्त्रीदाक्षिण्यातून त्यांना आधी लेखिका न् मग विनोदी लेखिका म्हटले गेले असावे. आता त्यांना लता मंगेशकर तेवढं म्हणू नका. त्यापेक्षा त्यांना स्त्रियांतली मुकुंद टाकसाळे म्हणूया आणि मुकुंद टाकसाळेला पुरुषातली मंगला गोडबोले म्हणायचं का? चिं. वि. जोशी, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे, वि. वि. बोकिल, श्यामराव नीळकंठ ओक या विनोदवृक्षांच्या गावात गोडबोले व टाकसाळे या झुडपांना विनोदी लेखक म्हणतात? कठीण आहे रे बाबा! पुण्यात प्रत्येक क्षेत्रात त्यांना आपला एक गाववाला मोठा माणूस लागतो. तसा तो नसला तर कोणालाही शेंदूर फासून ते देव बनवतात. पुढल्या वेळेला गोडबोले व टाकसाळे यांना पाहाल तेव्हा शेंदूर दिसतोय का बारकाईने बघा.

एकेकाळी मला गर्व होता की, मला कधीही मान खाली घालावी लागणार नाही. पण गर्वाचं घर खाली झालं. माझा अभिमान रसातळाला गेला. माझी मान अशी काही आणि इतका काळ खाली गेली की मला मानदुखीचा विकार जडला. मी खालमुंड्या पाताळधुंड्या झालो. या सगळ्याला कारण म्हणजे तुमचं ते शिंचं ‘व्हॉटस्अॅप’. काय काय ‘मेसेजेस’ येत असतात विचारू नका. अगदीच वाचायचं नाही असं कसं करता येईल? आपण न वाचता डिलीट करावा अन् तो सनी लिऑनचा मेसेज निघायचा. आम्हा भजनी मंडळाचा एक ग्रुप आहे. ती अध्यक्ष मी सेक्रेटरी. फोनवरूनही आम्ही भजन गातो. मात्र मी अनुप जलोटाला दूर ठेवतो. तो भजन गाता गाता (स्वतःचं) लग्न जमवतो. चुकून तो आधीच्याच एखाद्या जुन्या बायकोशी लग्नं करील अशी मला भीती वाटते. याच कारणानं मी व सनीनं कबीर बेदीला मंडळाचं सदस्य होऊ दिलेलं नाही. सनीच्या नवऱ्याला लग्नबिग्न असला चावटपणा चालत नाही. देवाब्राह्मणांना साक्षीला ठेवून त्यानं सनीचं पाणीग्रहण केलंय. मग सनी कॅमेऱयासमोर काही का करेना. पण लग्न? व्हॉट नॉनसेन्स!’ ‘व्हॉटस् अॅप’वर काही का येईना…

हा ‘व्हॉटस् अॅप’ काय प्रकार आहे तेच मला कळत नाही. (काय कळतं तर ते कळत नाही?) टोपली भरभरून मजकूर, फोटो यावर कोण टाकतं? त्यांचं उगमस्थान गुलदस्त्यात ठेवण्यामागची भूमिका काय आहे? अख्खं ‘व्हॉटस् अॅप’ फुकटात देणं देणाऱ्याला कसं परवडतं? वाजपेयी हयात असतानाच त्यांचं निधन झाल्याची बातमी पसरवण्यात आली. त्यामागे कोण होतं हे कळूच शकत नसेल तर दोषी व्यक्तीला अद्दल तरी कशी घडविणार? ‘व्हॉटस् अॅप’मुळे त्यांची कमाई कशी व किती होते? ‘व्हॉटस् अॅप’वर आपली उघडी व उत्तान छायाचित्रे टाकणाऱया सुडौल नवयौवना कोण? नका गडे इतकं अंधारात ठेवू. या अनावृत ललनादेखील उजेडात (कॅमेऱयासमोर) येतात तर पूर्ण वस्त्रांकित आम्ही अंधारात का? तरुण पोरं जो रात्रंदिवस ‘व्हॉटस् अॅप’ बघतात ते हेच बघत असतात. कसं थांबवणार आहात त्यांना? अख्खा बंधाराच फुटलाय, तिथं कुठे म्हणून विटेचं ठिगळ लावणार? गर्दीत एखादा माणूस म्हणाला की, मी ‘व्हॉटस् अॅप’वर नाही तर लगेच सगळी डोकी त्याच्याकडे वळतात. ‘व्हॉटस् अॅप’वर नसलेला माणूस दिसतो तरी कसा, हे त्यांना बघायचं असतं. अन् ‘व्हॉटस् अॅप’वर नसतो तर दिवसभर करतो तरी काय?
‘व्हॉटस् अॅप’वर कोणीतरी कोणाचे तरी मागे प्रसिद्ध झालेले लेख टाकतात (की स्वतःच टाकतात?) मला असे कोणाकोणाचे लेख येतात. कोणी सांगितलं मला ते वाचायला आवडतील म्हणून? मला तुम्ही गृहीत कसं धरता? कुठलं तरी भरताड माझ्या माथी का मारता? मी ते न वाचताच ‘डिलीट’ करतो, पण मुळात ते मला यावंच का? माझा गरीबाचा मोबाईल का विटाळता? तुम्हाला ते आवडत असतील तर खुशाल घ्यान नं आवडून, माझ्या घशात का कोंबता? तुम्हाला दुधी, सुरण, फरसबी आवडत असतील तर खुशाल बोकाणे भरा, पण मलाही या भाज्या आवडत असणारच असं वाटून घेऊन तुम्ही मलाही बळे बळे भरवाल की काय? मी हाताचा चावा घेईन हं, मग म्हणू नका की भरवणाऱया हातालाच चावतो मेला. मला वालपापडी अगदी ऐश्वर्या रायनं भरवली तरी मी तिच्या भरवणाऱया हाताला चावीन. अभिषेक हेच करतो म्हणूनच ऐश्वर्या अलीकडे क्षेत्ररक्षकांप्रमाणे हाताला पट्ट्या लावून असते.

असो, आता थांबूया. माझी ‘व्हॉटस् अॅप’ बघण्याची वेळ झालीय. तुमचीही झाली असेल ना?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या