
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
डोळ्य़ांच्या सौंदर्यात पापण्यांचे महत्त्व आहे. डोळ्य़ांच्या मेकअपमध्ये दाट आयलॅशेस खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात.
चेहऱयाच्या संपूर्ण मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप प्रथम नजरेत भरतो. लग्नसमारंभात, सणासमारंभात, एखाद्या कार्यक्रमामध्ये अशा कृत्रिम पापण्या लावून अनेक जणी आपल्या डोळ्यांचं सौंदर्य आकर्षक कसं दिसेल यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र या कृत्रिम पापण्या कशा प्रकारे खरेदी कराव्यात, कशा लावाव्यात व त्या लावताना काळजी कशी घ्यावी हे माहीत नसल्यामुळे अनेक वेळा काही समस्या निर्माण होत असतात. जेव्हा कृत्रिम पापण्या लावणं शक्य नसेल तेव्हा मस्काराचा वापर करूनही तुम्ही पापण्यांना दाटपणा आणू शकता. तसेच छोटय़ा सुटय़ा पापण्यादेखील उपलब्ध असतात. त्या लावूनही तुम्ही पापण्यांना नॅचरल दाटपणा आणू शकता.
आयलॅशेसमध्ये दोन प्रकार असतात, ग्लू आयलॅशेस व मॅग्नेटिक आयलॅशेस.
ग्लू अन् मॅग्नेटिक
ग्लू आयलॅशेस जास्त टिकत नाहीत. शिवाय या ग्लूने लावाव्या लागतात. मात्र आयलॅशेस ग्लू लावताना काळजी घ्यावी लागते. पापण्यांच्या सरळ रेषेत त्यावर ग्लू लावून मग त्या पापण्यांवर लावाव्या लागतात. पापण्यांच्या केसांवर ग्लू लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
मॅग्नेटिक आयलॅशेस महाग असतात. मात्र त्यांना ग्लू लावण्याची गरज नसते. तसेच मॅग्नेटमुळे त्या पापण्यांवर सहज चिकटतात. मात्र दोन्ही प्रकारच्या लायलॅशेस लावताना काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता असते. ग्लू आयलॅशेस लावताना आयलॅशेस योग्य पद्धतीने ग्लू लावून त्या पटकन पापण्यांवर चिकटवाव्या लागतात व मग त्यावर आयलाइनर लावावे लागते, तर मॅग्नेटिक आयलॅशेस लावताना डोळ्यांचा मेकअप पूर्ण सुकल्यानंतर डोळ्यांच्या पापण्यांवर वरच्या दिशेने अथवा खालच्या दिशेने त्या लावाव्या लागतात. मात्र या आयलॅशेस लावताना हात कोरडे असावे लागतात. पाण्याचा कुठलाही ओलसरपणा असल्यास त्या डोळ्यांवर नीट बसत नाहीत. शिवाय त्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. मॅग्नेटिक आयलॅशेस प्रथम लावताना त्या डोळ्यांच्या कोपऱयात पीक करून व्यवस्थित बसवाव्यात. कारण त्या स्टेचेबल असतात.
आयलॅशेस काढताना…
ग्लू आयलॅशेस काढताना त्या डोळ्यांच्या कडांकडून वर उचलत अलगद ओढून काढू शकता किंवा ओल्या कापडाने हलकंसं टॅप करून त्या तुम्ही काढू शकता मात्र मॅग्नेटिक आयलॅशेस सावकाश कोरडय़ा हाताने अलगद ओढून काढाव्या लागतात. आयलॅशेस लावल्यावर चेहरा कधीही धुऊ नये. तसेच रात्री झोपताना आयलॅशेस काढूनच मग झोपावे.
– अनेक वेळा आयलॅशेस आपल्या डोळ्यांवर लावताना त्या किती लांब किंवा कोणत्या पद्धतीच्या घ्याव्यात हे कळत नाही. अशा वेळेस जर तुम्ही आयलॅशेस लावत असाल तर प्रथम तुमच्या पापण्यांवर त्या हलक्याशा ठेवून पहाव्यात. जर जास्त लांब असतील तर त्यापेक्षा छोटी साईज घ्यावी किंवा जर तुम्ही लांब आयलॅशेस घेतली तर तुम्ही ती कापून तुमच्या डोळ्यांच्या मापाची करू शकता.
– मेकअप काढताना फार रगडून काढू नये. कारण त्यामुळे पापण्यांना त्रास होऊ शकतो. तसेच पापण्या तुटू शकतात. व्हिटॅमिन आणि प्रोटिनयुक्त आहारामुळेही पापण्यांचे केस घनदाट होतात. शिवाय पोषक आहार घेतल्यामुळे त्यांची वाढदेखील होते. फळे, हिरव्या भाज्या, पालेभाज्या यांचा आहारात समावेश केल्यामुळे पापण्यांचे केस नीट टिकून राहतात. काही घरगुती उपायांसाठी कच्चे दूध, कोरफड, पेट्रोलियम जेली, एरंडेल तेल, शिया बटर, ग्रीन टी यांचा वापर करून पापण्यांना अलगद मालिश करण्यासारखे केल्यास पापण्यांची वाढ होऊन पापण्या तुटत नाहीत.