वसंतातली रानभूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शोभा हळवे-चावडा

सध्या माणसं जेरबंद झाली आहेत आणि निसर्ग मात्र मनमुक्तपणे रंगांची उधळण करत आहे. निसर्गाची ही रंगांची उधळण सर्व ऋतूत सुरूच असते पण वसंताची चाहूल मात्र ठेवणीतले रंग घेऊन येते. सध्या सगळ्या जगावर कोरोनाचं सावट आलं असलं तरी हे सौंदर्य नजरेआड करून कसं चालेल.

रंगगंधनादाने सृष्टीला न्हाऊ घालणारा वसंत. त्याची चाहूल लागते अन पानाफुलांच्या बहराने आणि पक्ष्यांच्या कूजनाने सगळी सृष्टी मोहरते. हा रंगांचा उत्सव सुरु होतो अन चैत्रातली पालवी त्यात अजूनच रंग भरते. या रंगभरल्या नादात सगळेच रंग आपली वर्णी लावतात पण त्यातही पिवळ्याधम्मक अन लालचुटूक रंगाच्या विविध छटा आणि सोनसळी किरणं सृष्टीला न्यारंच रूप बहाल करतात.

जंगल केसरीया पळसाने बेभान फुलतं आणि निळ्याशार आकाशातल्या लालभडक पांगाऱ्यावर दृष्टी ठरत नाही. त्याचाच भाऊबंद असलेला पिवळा टॅबुबिया तर हळदीने माखून जातो. शहरभर पसरलेल्या सोनमोहराच्या मऊ मुलायम सड्यावर पावलं टेकवत नाहीत.

एप्रिल महिना लागला की माझी नजर त्या झाडाला धुंडाळायला लागते. अचानक कोवळ्या हिरव्या पालवी बरोबर डुलणारी सोनेरी झुंबरं दृष्टीस पडतात आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखी तिथून पावलं हटतच नाहीत. जेव्हा जेव्हा हा झगझगता बहावा पाहते तेव्हा तेव्हा हटकून व्हॅन गॉग आठवतो. पिवळ्या रंगाच्या प्रत्येक छटेवर प्रेम करणारा व्हीन्सेंट. मनात येतं त्याच्या नजरेला बहावा पडला असता तर त्या प्रसिद्ध सनफ्लॉवर ऐवजी त्याने या अमलताशातच रंग भरले असते का?

अगदी आसेतुहिमाचल म्हणावा तसा हिमालयापासून कन्याकुमारी आणि आसामपासून ते राजस्थानपर्यंत पसरलेला हा वृक्ष मूळचा हिंदुस्थानीच. ऋग्वेदात आणि वाल्मिकी रामायणात तर याचा उल्लेख आढळतोच पण कालिदासाच्या प्रतिभेलाही याच्या सौंदर्याने धुमारे फुटले. केरळचं राज्यफूल असलेली ही फुलं वसंत आणि ग्रीष्मात मोठ्या मोठ्या माळांसकट झाडावर डुलायला लागतात.

नजर हटू नये असा लाल-केशरी पळस म्हणजे रानातलं वसंत वैभव. संपूर्ण जंगल शिशिरात आपला पर्णसांभार उतरवून बसलेलं असतं तेव्हा सगळ्यात आधी फुलण्याची घाई होते ती या पळसालाच.हिंदुस्थानी उपखंड आणि आग्नेय आशियात सर्वत्र आढळणारा हा पानझडीचा वृक्ष शहरात सहज दृष्टीस पडत नाही. याला पाहायचं तर रानावनातच जायला हवं. मध्यम उंची आणि जरासा अस्ताव्यस्त पसारा. फुलांना बहर आला की हे झाड असं बेभानपणे फुलतं, की रवींद्रनाथांना त्या लाल-केशरी रंगाच्या पाकळ्या बघून जणू काही जंगलाला वणवाच लागलाय असं वाटलं. म्हणूनच कदाचित याला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट नाव पडलं असावं. पिवळ्या रंगाचा पळसही असल्याचं ऐकीवात आहे पण तो मात्र अजूनही पाहायचा योग आला नाहीये. असा हा पळस कालिदासापासून ते रवींद्रनाथांपर्यंत सगळ्यांचाच लाडका. ’ऋतुसंहार’ मध्ये कालिदासाला सगळा विंध्याचल प्रदेशच लालभडक वस्त्र नेसलेल्या नववधू सारखा भासला होता आणि शांतिनिकेतनात अजूनही बसंत उत्सवात रवींद्रनाथांचं “आकाश आमाय भोरलो आलोय, ओरे पलाश…ओरे पलाश” गात आणि भगव्या पळसफुलांच्या माळा गळ्यात घालून नृत्य करतच हा उत्सव साजरा होतो.

लालभडक रंगाचा पांगारा वसंतात फुलतो तेव्हा लांबून पळसासारखाच वाटतो पण पळसाचं खोड गुळगुळीत तर पांगारा काटेरी. याच्या लांबलचक फुलोर्‍यांवर खालपासून वरपर्यंत कळ्या-फुलांची दाटी होते. फुलात भरपूर पुष्परस असल्यामुळे पक्षी आणि भुंग्यांची या दिवसात चंगळच असते.
सृष्टीच्या नवनिर्मितीचा हा सोहळा वैशाख संपेपर्यंत उत्तरोत्तर रंगतच जातो.

– [email protected]