
पद्मश्री श्रीमती माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 7 व 8 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे भव्य संगीत सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उल्हास कशाळकर यांना माणिक वर्मा फाउंडेशनद्वारे ‘माणिक रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्त…
घरंदाज गायिका श्रीमती माणिक वर्मा यांच्या नावाने दिल्या जाणाऱया या पुरस्कारामुळे फार आनंद झाला आहे. त्या एक उत्तम कलाकार व माझ्या आवडत्या गायिका आहेत. माझा त्यांच्याशी जवळचा परिचय होता. माझं गायन ऐकण्यासाठी त्या येत व तेव्हा त्यांच्याकडून माझी भरभरून तारीफ ऐकली आहे. अशा दिग्गज गायिकेच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही अतिशय सन्मानाची अन् तितकीच आनंददायी गोष्ट आहे. माझ्या कलेला मिळालेली ही पोचपावती आहे. माणिक वर्मा यांचं संपूर्ण कुटुंब कलाकारांचं. त्यांच्याकडून माझ्या नावाची निवड होणे याचा मला फार आनंद होत आहे.
गाणं माझ्यापासून कधीच वेगळं नव्हतं. माझ्या घरातच गाणं होतं. त्यामुळे गाण्याचे संस्कार नकळत होत गेले. माझे वडील हे गुरू होते. नागपूरला असताना मी राजाभाऊ कोकजे आणि प्रभाकरराव यांच्याकडे गायन शिकलो. नंतर पुढे गुरुकुल पद्धतीने पं. राम मराठे व पं. गजाननबुवा जोशी या दिग्गजांकडून तालीम मिळाली. योगायोग असा की हे दोघेही कलाकार जयपूर, ग्वाल्हेर आणि आग्रा या तीन घराण्यांची गायकी करायचे. या गायकीची तालीम मला त्यांच्याकडून मिळाली. या गायकीची वैशिष्ट्ये, त्यातील वेगळेपण हे सारं त्यांच्याकडून शिकता आलं. ते मला त्यांच्या या संगीतकृतींचा कोणतातरी नवा पैलू उलगडून दाखवत. या शैलींची वैशिष्ट्ये मला अवडत होती. माझं असं काय निर्माण करता येईल असा प्रयत्न करत असताना मलाही यात रुची निर्माण झाली. असे पुरस्कार, मानसन्मान मिळतात तेव्हा पहिली आठवण येते ती गुरूंची. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं संपूर्ण श्रेय मला लाभलेल्या गुरूंचं आहे असं मला कायम वाटतं. या प्रवासात गुरूंचं महत्त्व
अबाधित आहे. मी आधी वडिलांकडूनच गाणं शिकलो. माझ्या भावंडांचा प्रवासही याच क्षेत्रात घडला. गायनातील पुढची तालीम मी गजाननबुवा जोशी यांच्याकडून घेतली. गुरूकुल म्हणावं तसंच ते शिक्षण होतं, जे आजकाल दुर्मीळ आहे. प्रत्येक रागाची विस्तृत मांडणी, सादरीकरण यातून त्यांनी संगीत, गायन या विद्येचं कलेत कसं रूपांतर करायचं हे शिकवलं.
कलेतील समृद्धता काय असते हे त्यांच्याकडून शिकता आलं. गुरूंच्या संस्कारांसोबत त्या काळातील दिग्गज गायक, पुढच्या पिढीतील गायक यांच्याकडूनही मला या साऱया खुबी, वैशिष्ट्ये शिकता आली. प्रत्यक्ष शिकवणीतून, निरीक्षणातून माझ्यात रुजत गेलेले, आत्मसात झालेले सर्वकाही यातून माझी स्वतंत्र गायकी घडत गेली. असा हा सर्वंकष प्रवास घडत गेला आणि आजही तो घडत आहे.
संगीत हा विषय व्यापक आहे. खूप गाणं ऐकून गायकी आत्मसात करता येईलच असे नाही आणि गुरूने जे शिकवले आहे ते कितपत रुजले आहे, आत्मसात झाले आहे हे कळण्यासाठीही गुरू हवाच. इथे प्रत्येक पायरीवर गुरूचं महत्त्व आहे. यातही गुरू-शिष्य परंपरा अधिक उजवी आहे. कारण शिष्याला किती उमजले आहे हे कळण्याचा मार्ग इथे असतो. तसंच गाणं ही अल्प काळात शिकण्याची गोष्ट नाही. ती साधना आहे. या साधनेसाठी जितका वेळ देऊ, मेहनत घेऊ तितकी ती अधिक प्रत्ययकारी ठरते. ही साधनेची एक प्रक्रियाच आहे. सोबत त्याला प्रासादिक अनुभवांचीही जोड असावी म्हणूनच गाण्यासोबत गाणं ऐकण्यासाठीही तयारी असायला हवी. त्याचा आपल्यावर नकळत परिणाम होत जातो. चांगली कला अनुभवण्याचा प्रत्येक अनुभव विचारप्रवण करणारा असतो. वेगळी दृष्टी देणारा असतो.
माझ्यासाठी पुरस्कार लाभणं ही माझ्या कलेला मिळालेले अधिष्ठान आहे. आपल्या आतापर्यंतच्या साधनेला दर्दी लोकांकडून मिळालेली ही दाद आहे, असे मला वाटते. या सगळ्या मागे आपल्या गुरूंचे आशीर्वाद आहेत. आपल्या पंखांमध्ये कलात्मकतेचे आणि सर्जनाचे वारे भरणारे, या साधनेच्या वाटेवर बोट धरून मार्ग दाखवणारे गुरू यांनाच हे पुरस्कार समर्पित आहेत. एखादी कला आपल्यात असणं, त्यात आवड असणं आणि अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी स्वतला सिद्ध करणं हा अनेकपदरी आणि मोठा प्रवास असतो. हा प्रवास अधिक ‘स्वरमय’ होत राहावा आणि चिरंतन शिकणं घडत राहावं.
शब्दांकन : शुभांगी बागडे
[email protected]































































