नवनिर्मितीचं रूपक, जोकमार स्वामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शुभांगी बागडे

लोकसंस्कृतीचा गाभा हा अनेक समाजांना एकत्र घेत पुढे आलेला दिसून येतो. यात प्रामुख्याने ग्रामीण समाज, जनजीवन, जीवनशैली या गोष्टी प्रतित होताना दिसतात. सांस्कृतिकदृष्टय़ा अनुभवता येणारी ही संपन्नता ग्रामीण भागातील विविध समाजांनी आजही जोपासली आहे. यात अनेक लोकपरंपरा दिसून आजही दिसून येतात. पिढी दरपिढी काळासोबत त्या पुढे चालत राहतात. यात त्या त्या प्रदेशाला अधोरेखित केलं जातं.

अशीच एक लोकपरंपरा म्हणजे जोकमार. आपल्या सर्वच कलांना, परंपरांना मिथकांची सुंदर पार्श्वभूमी आहे. तीच जोकमार या प्रथेतही दिसून येते. सणकार, देकदेकता, क्रतकैकल्ये, सामाजिक चालीरीती, रूढी यांपैकी कशाचाही किचार करायचा म्हटले तर कथात्म अंशाच्या आधाराकर ते उभे असलेले दिसतात. लोकजीकनाचे अनेक घटक कलात्मक, कथात्मक असूनही सतत कास्तक-अकास्तकाच्या लौकिक- अलौकिकाच्या परिघात असतात असे दिसते.

जोकमारची ही प्रथा सोलापूर, सांगली या जिह्यांच्या कर्नाटक सीमाभागात विशेषतŠ दिसून येते. कोकणातही काही ठिकाणी जोकमारची प्रथा दिसते; परंतु तिथे याला अघोरी पंथाचा देव मानले जाते. खरंतर ‘जोकमार’ ही कष्टकरी शेतकऱयाच्या परंपरेतून आलेली प्रथा असं मानावं लागेल. कारण जोकमाराची मूर्ती घडवण्यापासून त्याचं विसर्जन करेपर्यंतच्या सर्व प्रथांमध्ये निसर्गपूजन विशेष दिसून येते. शिवाय जोकमाराचे पूजन करून विसर्जन केल्यानंतर पाऊस चांगला पडतो असा समज शेतकरीवर्गात आहे.

जोकमारचा उत्सव हा सात दिवसांचा असतो. हुबळी, धारवाड, गुलबर्गा, शिमोगा, कारवार या सोलापूरनजीकच्या सीमाभागात तसेच मंगळवेढा, अक्कलकोट या भागात याचा उत्सव साजरा केला जातो. खरंतर जोकमार हा क्षूद्रदेव म्हणूनच गणला जातो. म्हणूनच त्याच्या रूपाचंही विद्रुपीकरण झाल्याचंच पाहायला मिळतं. क्षूद्रदेवता मानल्या गेलेल्या इतर देवतांप्रमाणेच जोकमारबाबतही अढी आणि भीतीचं दडपण असतं किंवा या दैवतालाही तुच्छ, क्षूद्र लेखलं जातं. यामुळेच याच्या उत्सवातही काही वेगळय़ा प्रथा दिसून येतात. आपल्याकडे अनेक दैवतांच्या उपासनेत जोगवा मागण्याची प्रथा आहे. या देवता प्रामुख्याने स्त्र्ााrप्रतिमा धारण केलेल्या आहेत, परंतु इथे मात्र जोकमाराकडे जोगवा मागितला जातो. समृद्धी, धनधान्य आणि पावसासाठी जोकमाराकडे जोगका मागितला जातो. याला काही ठिकाणी ‘जोक्या उत्सव’ असंही म्हटलं जातं. गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात या जोक्याच्या उत्सवाची धूम असते.

सीमावर्ती भागात लोकदैवत म्हणून जोकमाराची स्थापना केली जाते. मूळचा कर्नाटकातील हा जोकमार ग्रामीण भागात ‘जोक्या’ म्हणून ओळखला जातो. बोलीभाषेत याला जोकमार स्वामी, जोक्या असंच म्हटलं जातं. या जोक्याच्या उत्सवाला गावांमध्ये खूप मान असतो. दुष्काळाच्या भीतीपोटी जोक्याची आराधना केली जाते. पाऊस चांगला पडून चांगलं पीक यावं यासाठी जोक्याची आराधना केली जाते. त्याची परडी डोक्यावर घेऊन गावभर मिरवणूक काढली जाते. या जोक्याला बनवण्याचा मान गावातील कुंभार घरांचा असतो, तर मिरवण्याचा मान कोळी समाजाला असतो.

जोकमाराच्या शरीराची रचना विचित्र आणि ओंगळवाणी असते. त्याचं रूप त्याच्या उत्सवाबद्दल निश्चितच उत्सुकता निर्माण करतं. रुंद कपाळ, मोठे बटबटीत डोळे, तोंडभर हसू असलेले पसरलेले ओठ, तोंडात लोण्याचा गोळा, हातात उगारलेली तलवार असं जोकमाराचं रूप इतर कोणत्याच दैवतांशी साधर्म्य असणारं नसल्याने हा उत्सव नेमका कोणता व का साजरा केला जात असावा याबद्दलचं कुतूहल आपोआप जागृत होतं. महाराष्ट्र, सीमावर्ती भागात ठरावीक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात असल्याने फार कोणाला माहिती असण्याची शक्यता नाहीच. अनेक रुढी-परंपरा कालपरत्वे बंद होत आहेत; मात्र तरीही अशा वेगळय़ा लोकदैवताचा उत्सव साजरा केला जात असल्याचं अप्रूप वाटतंच. खरंतर आपल्या अनेक प्रथा-परंपरा या बहुजन, कष्टकरी वर्गामुळे आजही अबाधित आहेत. त्यांचं जगणं मांडणाऱया या प्रथा त्यांना समस्या, विवंचनेतून काही काळ तरी सुटका देतात. लोकसंस्कृतीच्या दृष्टीतून अशा सणवारांचं वेगळं महत्त्व आहे.

जोकमार प्रथेसंबंधित अनेक वेगवेगळय़ा कथा प्रचलित आहेत. ज्या कथांमधून त्याचं शिव-पार्वती, गणपती आणि कार्तिकेयाशी असलेलं नातं दर्शवलं जातं. तसेच यातील काही कथा या गणेशजन्माच्या कथांशी साधर्म्य दर्शवणाऱयाही आहेत. तसेच या उत्सवातील प्रथेनुसार जोकमार स्वामीचंही विसर्जन केलं जातं. तसेच या उत्सवांचा समान कालावधी यामुळे गणपती व जोकमार स्वामीचा उत्सव अनुकरणातूनच साजरा केला जात असावा असाही संदर्भ जोडला जातो. प्रचलित कथामधल एका कथेत जोकमार स्वामी म्हणजे कार्तिकेयाने पृथ्वीवर येण्यासाठी घेतलेला अवतार असे मांडले आहे. ही कथा पुढीलप्रमाणे. आपल्या गणांसह पृथ्वीवरील उत्सवात तृप्त होऊन गणपती आपले माता-पिता पार्वती व शंकर यांना भेटण्यास कैलास पर्वतावर जातो. पृथ्वीवरच्या सुखाचं, पाहुणचाराचं वर्णन गणेश दोघांनाही सांगतो. हे वर्णन कार्तिकेयाला पटत नाही आणि म्हणून खरी परिस्थिती जाणून घेण्याकरिता कार्तिकेय पृथ्वीवर येतो. जोकमाराच्या रूपातील कार्तिकेय शेतकऱयाच्या शिवारी फिरतो. गावशिवारातून फिरताना त्याला शेतकऱयाची पावसाअभावी झालेली दयनीय अवस्था बघवत नाही. या सत्यस्थितीचं वर्णन महादेवाकडे केल्यानंतर महादेव पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी घडवतात. म्हणूनच जोकमाराचा उत्सव झाल्यानंतर चांगला पाऊस पडतो अशी धारणा शेतकरीवर्गात आहे. दुसरी एक कथा याच कथेला अनुसरून आहे ज्यात जोकमार हा कार्तिकेय नसून शिवाचा तिसरा मुलगा आहे. तर अशीच अजून एक कथा गणेशजन्माशी साधर्म्य असणारी आहे. या कथेत पार्वतीमाता स्नान करत असताना ती बाहेर लक्ष ठेवण्यासाठी जोकमाराला नेमते. याच समयी महादेव आले असता बालक जोकमार घाबरून पार्वतीला बिलगतो. मात्र पार्वतीला ते रुचत नाही आणि ती जोकमाराला सात दिवसांच्या अल्पायुष्याचा शाप देते. म्हणूनच जोकमाराचा हा उत्सव भाद्रपद अष्टमी ते भाद्रपद पौर्णिमा या सात दिवसांचाच असतो.

जोकमाराचा हा उत्सव खऱया अर्थाने शेतकरीवर्गाचा, कष्टकऱयांचा. कारण यात सर्व समाज एकवटलेला असतो. जोकमाराची मूर्ती कुंभाराच्या घरी तयार केली जाते. मात्र त्याची स्थापना होते ती कोळी समाजाच्या घरांमध्ये. कोळी समाज आणि इतर शेतकरीवर्ग गावातील घरोघरी जोगवा मागतात. शेवटच्या दिवशी त्याची मिरवणूक काढली जाते आणि परीटाच्या घरी त्याचे डोके फोडून शेवटी नदीत वा तलावात विर्सजन केले जाते. याची स्थापनाही अगदी साध्या परंतु निसर्गाला जोडणाऱया गोष्टींच्या माध्यमातून केली जाते. एका वेताच्या टोपलीत ज्वारी आणि कडुनिंबाच्या पानांनी सजावट केली जाते आणि यात जोकमार स्वामीला स्थानापन्न केलं जातं. दणकट शरीर, पिवळसर कांती, पिळदार मिशा, कपाळी विभूती आणि कुंकू, डोक्यावर मुकुट असं याचं रूप असतं. याचा नैवेद्य म्हणजे लोण्याचा गोळा. तर असा हा निसर्गपूजक, सर्जनशील, सुफलीकरण याचे प्रतीक आहे. तो येतो तो काळही निसर्गाच्या सुफलतेचा असतो. त्यावेळी गरज असते ती पावसाची. त्यामुळेच त्याचं येण्याचं प्रतीक हे पावसाशी जोडलेलं आहे.
लोकदैवतांची सगळीच रूपं ही त्या त्या समाजाच्या उदरनिर्वाहाच्या, जीवनशैलीच्या नियमांशी जोडली गेली आणि ती पुढे प्रथा, परंपरा म्हणून प्रचलित झाली. लोकसंस्कृतीत या दैवतांचं आगळं महत्त्व आहे. सृष्टीच्या नवनिमिर्तीचा अध्याय सांगणाऱया, निसर्गरूपक मांडणाऱया जोकमारसारख्या लोकदैवतांचा म्हणूनच अजून खोलवर अभ्यास होणं गरजेचं आहे.

– [email protected]