नाणकशास्त्राचे आगळे विश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सूरज पंडीत 

नाणकशास्त्र ही या पुरातत्त्वविद्येची एक उपशाखा. विविध प्राचीन, अर्वाचीन नाणी आणि नोटांचा संग्रह करून, त्यांचे अध्ययन सांस्कृतिक आणि विशेषतः आर्थिक इतिहास लेखनासाठी करणे हे या ज्ञानशाखेचे उद्दिष्ट आहे. 23 व 24 डिसेंबर 2018 या दोन दिवशी ‘नाणकशास्त्र दिना’च्या अनुषंगाने ‘महाराष्ट्रातील नाणी’ या विषयावर साठय़े महाविद्यालयात प्रदर्शन भरवण्यात येत आहे. त्यानिमित्त हा लेख.

भूतकाळात पाहून काहीतरी शिकण्याची क्षमता ही मानवामध्येच आहे. या भूतकाळाचा अभ्यास ज्ञानशाखा म्हणून आपण करतो. शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध भूतकाळाची मांडणी हे पुरातत्त्वविद्येचे उद्दिष्ट आहे. संस्कृतीच्या भौतिक अवशेषांच्या आधारे ही मांडणी केली जाते. याचे हे एक तंत्र.

हिंदुस्थानी उपखंडामध्ये या ज्ञानेशाची पाळेमुळे खरे तर ब्रिटिश काळात रुजली. अनेक पाश्चात्य विद्वानांनी खतपाणी घालून हिंदुस्थानात पुरातत्त्वविद्येचे रोपटे रोवले, परंतु हा वृक्ष बहरला तो स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थानी पुरातत्त्वाचे पितामह डॉक्टर ह. धि. सांकळिया यांच्या अथक प्रयत्नांनी, द्रष्टेपणानी आणि विद्वत्तेनी. यामुळेच ज्ञानशाखेची भरभराट झाली. या ऋषितुल्य गुरूंचा जन्म 10 डिसेंबर 1908 रोजी झाला. त्यांची आठवण म्हणून आणि त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षी 10 डिसेंबरला ‘पुरातत्व दिन’ साजरा करतो. मुंबई विद्यापीठातील बहिशःल शिक्षण केंद्रांतर्गत येणारे ‘पुरातत्व केंद्र’ आणि विषयाशी संबंधित अनेक संस्था एकत्र येऊन या ‘पुरातत्व दिनाचे’ आयोजन करतात. अनेक महाविद्यालयांतील इतिहास विभागात याच आठवडय़ात विविध व्याख्याने व प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. मुंबई विद्यापीठात यानिमित्ताने दोन दिवसांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नाणकशास्त्र ही या पुरातत्त्वविद्येची एक उपशाखा. आज याचा विस्तार एका वेगळ्या ज्ञानशाखेइतकाच झालेला आहे. विविध प्राचीन, अर्वाचीन नाणी आणि नोटांचा संग्रह करून, त्यांचे अध्ययन सांस्कृतिक आणि विशेषतः आर्थिक इतिहास लेखनासाठी करणे हे या ज्ञानशाखेचे उद्दिष्ट आहे. नाण्यांचे संग्राहकही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या ज्ञानशाखेचा अभ्यास करतच असतात. हिंदुस्थानात अशा संग्राहकांची परंपरा जुनी असली तरी या ज्ञानशाखेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून ती रुजवणारे पहिले हिंदुस्थानी विद्वान म्हणजे डॉक्टर परमेश्वरीलाल गुप्ता. हिंदुस्थानातील ‘नाणकशास्त्राचे जनक’ म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी हजारो नाण्यांचा अभ्यास करून, त्यांची अध्ययन पद्धती आणि संशोधन पद्धती निश्चित केली. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण 24 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस हा ‘नाणकशास्त्र दिवस’ म्हणून साजरा करतो.

डिसेंबर महिन्यातील या दोन महान अभ्यासकांच्या ऋणांची कृतज्ञतेने आठवण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जावे अशी अनेक विद्वानांची इच्छा होती. ह. धि. सांकळिया यांनी विद्वज्जड ग्रंथातील पुरातत्व लोकाभिमुख केले आणि परमेश्वरीलाल गुप्ता यांनी हिंदुस्थानातील नाणीसंग्राहकांच्या विश्वातील नाण्यांच्या अभ्यासाला शास्त्रशुद्ध बैठक दिली. डॉक्टर परमेश्वरीलाल गुप्तांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी एक कल्पना मांडली. ती होती ‘नाणकशास्त्र दिन’ साजरा करण्याची. महाराष्ट्र शासनाच्या दार्शनीका विभागाचे डॉक्टर दिलीप बलसेकर आणि केंद्रीय पुराभिलेखागारांचे डॉक्टर संजय गर्ग तसेच डॉक्टर महेश कालरा आणि त्यांचे विद्यार्थी यांनी ती कल्पना उचलून धरली. एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला. ती म्हणजे ‘सेंटर फॉर हिस्टरी, आर्किऑलॉजी, एपिग्राफी ऍण्ड नुमिस्मॅटिकस्’ या केंद्राची स्थापना. याचा उल्लेख अभ्यासकांमध्ये CHAEN असा केला जातो. नाणकशास्त्र व संबंधित विषयातील अनेक देशी-परदेशी विद्वानांची व्याख्याने या केंद्राने मुंबई व परिसरात आयोजित केली.

साठये महाविद्यालया बरोबरीने वार्षिक राष्ट्रीय परिषद घ्यायला सुरुवात केली. या साऱ्य़ाचा मुख्य उद्देश होता इतिहास आणि पुरातत्वच्या विविध उपशाखांना एकत्र आणणे आणि या साऱ्य़ा ज्ञानशाखातील विद्यार्थी आणि संशोधक यांना सामावून घेण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. म्हणूनच ‘नाणकशास्त्र दिन’ साजरा करताना एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दर वर्षी केले जाते. CHAEN आणि साठये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन या वर्षी 23 व 24 डिसेंबर रोजी केले आहे. डॉक्टर हंडा नणकशास्त्रज्ञ या परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार असून डॉक्टर मंजिरी कामत, डॉक्टर बिंदा परांजपे. डॉक्टर ग. का.माने, डॉक्टर दिलीप बलसेकर, डॉक्टर अमित उपाध्याय आणि बाझल शेख हे विविध विभागीय अध्यक्ष म्हणून विद्वान व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

23 व 24 डिसेंबर 2018 या दोन दिवशी ‘नाणकशास्त्र दिना’च्या अनुषंगाने ‘महाराष्ट्रातील नाणी’ या विषयावर साठये महाविद्यालयात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून येऊन नाणी संग्रहक आपला संग्रह येथे मांडतील. नाशिकचे चेतन राजापूरकर, नागपूरचे डॉक्टर सचिन मिसर, मुंबईचे पास्कल लोपेज, सचिन जोशी, पनवेलचे अहमद अझर शेख तसेच रवींद्र राठोड, देवांशू मोदी आणि अरुण नारायणन यांसारख्या अनेक नाणी संग्राहकांच्या पुढाकाराने हे शक्य होत आहे. महाराष्ट्रातील नाण्यांच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन CHAEN करीत आहे. यात गेल्या साधारण अडीच हजार वर्षांचा महाराष्ट्रातील नाण्यांचा प्रवास प्रातिनिधिक स्वरूपात मांडला जाईल. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 अशी असून प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे. यातूनच महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे जनसामान्यांना ज्ञान होईल व मुलांना नाणकशास्त्राची गोडी लागेल.

पुरातत्त्वविद्या आणि नाणकशास्त्र, पुराभिलेखशास्त्र अशा त्याच्या इतर उपशाखा यांचा प्रचार-प्रसार व्हावा व नाणकशास्त्र- पुराभिलेखविद्या लोकाभिमुख व्हावी हेच डॉक्टर परमेश्वरी लाल गुप्ता आणि ह. धि. सांकळिया यांसारख्या ऋषितुल्य गुरूंची इच्छा होती. त्यांच्या ऋणातून अंशतः तरी मुक्त होण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा प्रयत्न!
[email protected]