माणसाचं सभोवतालाविषयीचं कुतूहल जेव्हा जागृत झालं तेव्हा तो त्याला त्या काळी वाटणाऱया अनेक ‘रहस्यां’मुळे चकित किंवा भयचकितही झाला. निरभ्र आकाशात अचानक कुठून तरी काळे ढग येतात आणि बघता बघता ‘धो धो’ पाऊस पडू लागतो ही गोष्ट आजच्या काळात आनंदाची, मौजमजा करण्याची असली, तरी उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातील आदिमानवाला या प्रकाराची धास्तीच वाटली असणार. मात्र, विकसित मेंदूसह जन्माला आलेल्या मानवप्राण्याकडे विचार करण्याची अमोघ शक्ती होती. ती सर्वांमध्ये सारखीच असली तरी रोजच्या जीवनक्रमापलीकडे काही वेगळा विचार करावा याची जाणीव फारच कमी लोकांमध्ये असायची. विशेषतः वैज्ञानिक पद्धतीचा विचार करणाऱयांची संख्या आजही कमीच आहे. आपण क्षणोक्षणी विज्ञानाचा वापर करत असलो तरी विचार किती करतो हीच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
मात्र, त्या काही लोकांच्या कुतूहल, उत्सुकता आणि संशोधक वृत्तीमधून माणसाच्या जीवनात आज आपण वैज्ञानिक सोयीसुविधांचा अनुभव घेत आहोत. कोणेएकेकाळीसुद्धा माणसं वृद्ध होऊ लागली की शरीर थकणं, दृष्टी मंदावणं वगैरे स्थित्यंतरं होतच होती आणि त्यावरचे उपाय नव्हते तेव्हा ती तशीच राहत होती. पण संशोधक वृत्तीच्या लोकांनी हळूहळू अनेक गोष्टींमागचा कार्यकारणभाव समजून घेत त्यावर ‘उपाय’ शोधायला सुरुवात केली. पाषाणयुगानंतर आलेल्या धातुयुगात अनेक धातूंचा वापर सुरू झाला. खनिजांचे शोध लागले तसेच निसर्गनिर्मित पारदर्शी काचगोलकही (ग्लास स्पेरुल) सापडले. एखाद्या कठीण चकचकीत वस्तूमधून आरपार दिसतंय याचा विस्मय ओसरल्यावर त्यावर प्रक्रिया करण्याचं तंत्र विकसित झालं. काचपात्रं तयार होऊ लागली.
यातलाच एक भाग म्हणजे दृष्टिमांद्यावर काचेचा म्हणजे भिंगाचा वापर करण्याचे प्रयोग सुरू झाले. धूसर, अस्पष्ट दिसणारी गोष्ट ‘स्पष्ट’ दाखवणारे ‘चष्मे’ जगात तेराव्या शतकात आले. जग ‘नव्या’ नजरेनं स्वतःकडेच पाहू लागलं. याच काळात इटलीमध्ये सॅल्व्हिनो अर्माटी याने जगातला पहिला चष्मा बनवल्याचं म्हटलं जातं. कदाचित युरोपात अन्यत्रही तसे प्रयत्न सुरू असतील, परंतु साधारण बाराव्या, तेराव्या शतकापासून युरोपातील वैज्ञानिक संशोधनाला सर्वंकष गती आली. वातावरणच संशोधनमय असल्यावर विविध प्रज्ञावंतांना अनेक प्रश्नांची उकल करण्याची उैर्जा प्राप्त झाली. त्यामुळे सोळाव्या-सतराव्या शतकात हिंदुस्थानातील काही राजांकडे चष्मे आले. ते अर्थातच व्यापाऱयांनी आणले होते. मुघलकालीन रत्नजडीत चष्म्यांचे पह्टो आणि लिलावाच्या बातम्याही येऊन गेलेल्या आहेत. सोळाव्या शतकाच्या मध्यावर नेदरलॅण्डमध्ये जन्माला आलेला हॅन्स पिंवा जॉन लिपर्शे पिंवा डच उच्चारानुसार लिपर्हे (सॅन जोसे स्पेलिंगचा उच्चार सॅन होजे व्हावा तसं) हा एक उत्साही चष्मेवाला होता. एकदा त्याच्याकडची दोन मुलं चष्म्याच्या काचा एकावर एक ठेवून ‘लांबची वस्तू जवळ’ आल्याचा खेळ खेळत होती, अशी एक गोष्ट आहे. ते पाहून लिपर्शे यांना काचेच्या, म्हणजे भिंगाच्या (रिप्रॅक्टर) दुर्बिणीची कल्पना सुचली आणि त्यांनी ती बनवली.
बऱयाच लोकांची अशी समजूत असते की गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला, पण तसे नाही. गॅलिलिओने ती दुर्बीण आकाशाकडे रोखण्याचं धाडस (पिंवा तत्कालीन रूढीवाद्यांच्या मते ‘पाप’) केलं आणि मग काय घडले ते पुढच्या लेखात पाहू या.
… तर दुर्बिणीचा जनक हॅन्स लिपर्शे. मात्र उत्तम लेन्स ग्रायन्डिंग करून बनवलेल्या त्याच्या दुर्बिणीला ‘पॅटन्ट’ (स्वामित्वाचा अधिकार) मिळेना. कारण तोपर्यंत युरोपातल्या इतरही ठिकाणांहून चष्म्याच्या ‘पॅटन्ट’साठी प्रयत्न सुरू होते. असं असलं तरी राजाने लिपर्शेचं कौतुक केलं. त्याच्या ‘दूरच्या वस्तू जवळून दाखवणाऱया यंत्रासाठी त्याला बक्षीसही मिळालं. लिपर्शे याने दोन बहिर्वक्र भिंगांची दुर्बीण तयार केली होती.
त्याचं खूप कौतुक होऊनही या यंत्राला ‘दुर्बिणी’चा दर्जा मिळाला नव्हता. नंतर तीनेक वर्षांनी जिओलिनी डेमिलियॅनी. याने भिंगांचं प्रतिमावर्धन ‘तिप्पट’ करून त्याला ‘टेलिस्कोप’ पिंवा दुर्बीण असं म्हटलं.
त्या काळात जगाचा व्यापार आणि वाहतूक समुद्रमार्गे होत असे. जहाजाच्या कप्तानाकडे ‘दूरची वस्तू जवळ दाखवणारं’ यंत्र असेल तर उत्तमच. समुद्री चाच्यांपासून ते हवामानाच्या अंदाजासाठी क्षितिजावर नजर रोखण्यासाठी ते उपयुक्त होतं. त्यातून एका डोळय़ाने पाहता येईल, असा ‘मोनोक्युलर’ 1668 मध्ये बनवला गेला. जगातल्या हेरखात्यांनाही या एकाक्ष ‘दुर्बिणी’चा खूप उपयोग झाला. त्यानंतर आज आपण वापरतो ती आधुनिक ‘बायनॉक्युलर’ आली. ती खरं तर ‘द्विनेत्री’ असते. दुर्बीण नव्हे. दुर्बिणीच्या ‘आयपीस’मधून एकाच डोळय़ाने पाहता येतं. गॅलिलिओने ती प्रथम आकाशाकडे रोखली आणि एकच गदारोळ उडाला… कसा ते पुढच्या लेखात.





























































