लेख – जगण्याची तत्त्वं मांडणारा नाटककार!

658

>> सुरेंद्र तेलंग

विख्यात नाटककार राम गणेश गडकरी यांची स्मृती शताब्दी गुरुवार, 23 जानेवारी रोजी आहे. अवघे 34 वर्षे आयुष्य लाभलेल्या या नाटककाराने एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ही नाटके लिहिली. ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने कविता व बालकराम या टोपणनावाने विनोदी लेख लिहिले. त्यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त…

राम गणेश गडकरी यांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे झाल्याने आणि प्राथमिक शिक्षणही तेथेच झाल्याने त्यांना गुजराथी भाषा उत्तम येत होती. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदाही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यातून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकरींचे पुढील शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. हाती पैसे नाहीत अशी परिस्थिती होती. तरीही त्यांनी काबाडकष्ट करून फर्ग्युसन कॉलेजमधून कला शाखेत पदवी मिळविली. त्यांना नाटकाचा ओढा होता. शिडशिडीत शरीरयष्टी, सडपातळ बांधा आणि मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाविद्यालयात शिकत असताना गडकरी किर्लोस्कर नाटक मंडळीत दाखल झाले. किर्लोस्कर नाटक मंडळीने चालविलेल्या ‘रंगभूमी’ नावाच्या मासिकातून तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या ‘काळ’ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपटेंच्या ‘करमणूक’ नियतकालिकातून ते कविता व लेखासोबतच नाटय़लेखनही करू लागले.

‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या आणि ‘बालकराम’ या टोपण नावाने अनेक विनोदी लेख लिहिले. ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ ही चार नाटके, ‘राजसंन्यास’, ‘वेडय़ांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर समजले जाते. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते.

ऐन पंचविशीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’ ही नाटके लिहिली. त्यांच्या सगळय़ा चांगल्या-वाईट दिवसांत कृ. प्र. खाडिलकरांनी गडकरींना खूप पाठिंबा दिला. गडकरींनाही त्यांच्याविषयी खूप प्रेम आणि आदर होता. लग्नाचा बाजार हा शब्द आज आपण सर्रास वापरतो; पण हा शब्द गडकरींनी आपल्याला दिलेला आहे. ‘ठकीचं लग्न’ हा तर विनोदी मराठी साहित्यातील मानदंड आहे.

किर्लोस्कर कंपनीतून फुटून बाहेर पडलेले सगळे तरुण कलाकार गडकरींच्या भरवशावर एकत्र आले आणि त्यांनी बळवंत नाटक मंडळी काढली. या कंपनीची स्थापना केल्यावर ते ‘राजसंन्यास’ नाटक लिहीत होते. त्यांच्या लिखाणाच्या पद्धतीनुसार अधले-मधले प्रवेश त्यांनी लिहून ठेवले होते. पण अजून ते नाटक अपूर्ण होते. ‘राजसंन्यास’ची कल्पना त्यांनी बळवंत नाटक कंपनीला ऐकविली तेव्हा ते खूप खर्चिक वाटल्याने कंपनीने त्यांच्याकडे खर्चाने स्वस्त होईल अशा नाटकाची मागणी केली. मग त्यांनी ‘भावबंधन’ नाटक लिहायला घेतले. त्याचवेळी त्यांचे आजारपण वाढत होते. त्यांना क्षयाचा खूप त्रास व्हायचा. त्यांना कळलं की, आता आपण फार दिवस राहणार नाही. ‘भावबंधन’ नाटक लिहून झालं. शेवटच्या पानावर त्यांनी ‘समाप्त’ असं लिहिलं आणि पदरी बाळगलेल्या पांडू नावाच्या मुलाला त्यांनी ‘राजसंन्यास’चे कागद टेबलावर ठेवायला सांगितले. पाच मिनिटे झोपतो सांगून ते जे झोपले ते परत कधी उठलेच नाहीत आणि ‘राजसंन्यास’ अपुरे राहिले ते कायमचेच.

गडकरींचा शेक्सपियरच्या नाटकांचा गाढा अभ्यास होता आणि त्याच्यावर अगाध श्रद्धाही. शेक्सपियरने 36 नाटके लिहिली तर आपल्या हातून 18 तर नाटके लिहून व्हावीत अशी त्यांची इच्छा होती.

‘भावबंधन’ नाटक जेव्हा रंगभूमीवर आले तेव्हा त्या नाटकाने अक्षरशः कहर केला. तिकिटाचे दर चार आणे, आठ आणे, एक रुपया, दोन रुपये व तीन रुपये असे होते. सर्वात जास्त किमतीचं तिकीट तीन रुपये असताना नाटकाने पाच हजार रुपयांचे बुकिंग घेतले होते. उभ्या हयातीत त्यांना कधी पैसे बघायला मिळाले नाहीत ते त्यांना या नाटकाने मिळाले असते; पण माणूस दारिद्रय़ातच गेला आणि तेसुद्धा ऐन तारुण्यात.

त्यांच्या लिखाणाने अनेक नाटय़संस्था गर्भश्रीमंत झाल्या. हिंदुस्थानी रंगभूमीची परंपरा ही सुखातिकांची असताना गडकरींनी नाटकांतून शोकांतिका मांडल्या. त्या नुसत्या शोकांतिका नव्हत्या, तर जगण्याची पाच तत्त्वं त्यांनी त्यांच्या पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, प्रेमसंन्यास आणि राजसंन्यास या नाटकांतून मांडली. गडकरी यांचे ऐन तारुण्यात वयाच्या 34व्या वर्षी 23 जानेवारी 1919 रोजी निधन झाले. मुंबई महापालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवाजी पार्क, दादर येथील चौकास राम गणेश गडकरी चौक असे नाव दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या