लेख – धोकादायक इमारतींचा प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

>> टिळक उमाजी खाडे

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी पावसाळय़ाच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळय़ाच्या सुरुवातीलाच मुंबईतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करून मुंबई महापालिका आपले इतिकर्तव्य पूर्ण करते, पण त्या धोकादायक इमारतींमधील रहिवासी जीव मुठीत धरून त्याच इमारतीत राहणे पसंत करतात. गेल्या पन्नास-साठ वर्षांत मुंबईत धोकादायक इमारती कोसळून आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे. असे असूनही धोकादायक इमारतीत राहून तेथील रहिवासी आपल्या जिवाची बाजी का लावतात? इमारत पडली की, धावाधाव होते, चौकशी आयोग नेमले जातात, पण या चौकशी अहवालातून काहीच निष्पन्न होत नाही. ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे दुसरी इमारत पडेपर्यंत सारे काही शांत! लोकांचा जीव गेल्यावर डोळयांत खोटी आसवे (अश्रू) आणून मृतांच्या नातेवाईकांच्या अंगावर चार-पाच लाखांचे मदतीचे तुकडे फेकून हा प्रश्न कधीच सुटणार नाही! केवळ नोटिसा पाठवून जुन्या, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटणार आहे का? नोटीस पाठवून धोकादायक इमारतीतील रहिवाशांनी घरे रिकामी करावीत हे बोलणे सोपे आहे. इमारतीमधील रहिवाशांनी आपले जुने घर सोडल्यावर जायचे कुठे? रहायचे कुठे? याचा गंभीरपणे विचार महापालिका किंवा राज्य सरकार का करत नाही? एकदा का हे हक्काचे घर सोडले की, पुन्हा इथे बांधल्या जाणाऱया नवीन इमारतीत रहायला येता येईल का? नव्या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल का? भाडेकरू म्हणून मूळ जागेवर आपला हक्क कायम राहील का? असे नानाविध प्रश्न धोकादायक इमारतीत राहणाऱया रहिवाशांच्या मनात उभे राहतात. धोकादायक इमारतीमधील घर सोडल्यावर प्रशासन त्या रहिवाशांची तात्पुरत्या स्वरूपात ‘संक्रमण शिबिरात’ (ट्रान्झिट कॅम्प) सोय करते. आतापर्यंतच्या अनुभवानुसार संक्रमण शिबिरात तात्पुरत्या स्वरूपात रहायला गेलेल्या रहिवाशांना त्या ठिकाणी दहा ते वीस वर्षे खितपत पडावे लागते. संतापजनक बाब म्हणजे या संक्रमण शिबिरात पिण्याच्या पाण्यापासून इतर मूलभूत सुविधांची वानवा असते. संक्रमण शिबिरातील रहिवाशांची नोकरी, मुलांचे शिक्षण अशा सर्वच बाबतीत त्यांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होते. आता तर संक्रमण शिबिरात दलालांनी शिरकाव केल्यामुळे इमारतीचा मूळ लाभार्थी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मालक व बिल्डर यांच्या साटेलोटय़ामुळे भाडेकरूला मूळ इमारतीमधील घर गमवावे लागते. गेल्या काही वर्षांत ब्रिटिशकालीन पगडी पद्धतीमुळे हजारो कुटुंबांना घरे गमवावी लागली याचे कारण इमारतीच्या मालकांनी त्यांच्या जुन्या भाडेकरूंना पुनर्विकासाचा फायदा होऊ दिला नाही. त्यामुळे अनेक रहिवासी रस्त्यावर आले असून ‘कुणी घर देता का घर?’ असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे!

राज्य सरकारने जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात अनेक धोरणे आखली. मात्र त्याचा सकारात्मक परिणाम अजून तरी दृष्टिपथात येऊ शकला नाही. इमारत दुर्घटना टाळायच्या असतील तर इमारत पुनर्बांधणी विषयात अधिक पारदर्शकता यायला हवी. इमारत पुनर्बांधणीचे प्रकल्प ठरावीक कालावधीत मार्गी लागायला हवेत! इमारत पुनर्बांधणीमधील यंत्रणांचा ढिसाळ कारभार सुधारायला हवा. तसेच या प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपही थांबायला हवा. मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींचा शतक महोत्सव सुरू आहे. शिवकालीन गडकिल्ले आजही बुलंद आहेत. या तुलनेत म्हाडाने व खासगी विकासकांनी बांधलेल्या इमारती एवढय़ा तकलादू कशा? याचे उत्तर मुंबई महापालिका व म्हाडा तसेच राज्य सरकारचे नगर विकास खाते देईल का?