शताब्दी समाधी संस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तुषार राजे

श्री साईबाबा व श्री राममारुती महाराज. शंभर वर्षांपूर्वीचा योग जुळून आला शताब्दीला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी कल्याणमधील श्री संत राममारुती महाराजांनी समाधी घेतल्यानंतर पुढे सोळा दिवस उत्सव साजरा करण्यात आला. सोळाव्या दिवशी म्हणजे दसऱयाला श्रीसाईबाबांनीही समाधी घेतली. तो योग शंभर वर्षांनी 18 ऑक्टोबर रोजी दसऱयाच्या दिवशी पुन्हा जुळून आला. श्री संत राममारुती महाराजांच्या 100 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा लेख.

शंभर वर्षांपूर्वी श्री संत राममारुती महाराजांच्या निर्वाणानंतर सतत सोळा दिवस उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचा आरंभ तत्कालीन संत नाना महाराज श्रीगोंदेकर, श्री शांतारामभाऊ जयवंत, संत आप्पामास्तर लेले यांनी नामसप्ताहाने केला व 100 वा पुण्यतिथी उत्सव साजरा झाला. महाराजांचे निर्वाण ज्या दळवी वाडय़ात झाले व जिथे अंत्यसंस्कार झाले त्या आताच्या समाधीच्या जागी दोन्ही ठिकाणी धार्मिक उत्सव साजरे केले करण्यात आले.

26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उत्सवात भजन, कीर्तन, सामुदायिक पारायण, हरिपाठ, सामुदायिक आवर्तने झाली. तसेच बाबा महाराज सातारकर, हभप मोहनबुवा रामदासी, एकनाथ महाराज सदगीर, गणेश महाराज कुलकुंठवार यांच्यासह इतर दिग्गज प्रचवनकारांची भजने व प्रवचने झाली. यावेळी भक्तिसंगीताचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संगीत वाद्यवृंद, भरतनाटय़म, संगीत भारूड, जोगवा, गोंधळ तसेच गीतरामायणाचे सादरीकरण असे अनेक कार्यक्रम यावेळी झाले.

श्री साईबाबांचे भाऊ
शिर्डीचे श्री साईबाबा श्री राममारुती महाराजांना आपला भाऊ मानत असत. राममारुती महाराज शिर्डी येथे जाणार होते तेव्हा श्री साईबाबा आपल्या भक्तांना ‘‘माझा भाऊ मला भेटण्यासाठी येत आहे’’ असे सांगत असत.

1910 साली श्री राममारुती महाराज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथील मशिदीत म्हणजे द्वारकामाईत गेले तेव्हा आरती चालू होती. साईबाबांनी आरती थांबवून राममारुती महाराजांना घट्ट कवटाळून पोटाशी धरले व आपल्या अर्ध्या आसनावर बसून आरती सुरू केली. तिथे साईबाबांनी राममारुती महाराजांना ‘श्री राममारुतीनाथ’ असे संबोधले होते.
श्री राममारुती महाराज कल्याण परिसरातील ज्या मंदिरात भजन, कीर्तन असेल तिथे जात असत. ‘जेथे जेथे भजन सोहळा तेथे तेथे श्रीराम उभा’ अशी त्यांची भावना होती. कीर्तन किंवा भजनात रंगात येऊन महाराज भुःभुःकार करून ‘‘रामा रामा’’ म्हणत असत. एकदम बसल्या मांडीसह उड्डाण करीत. त्यांचे उड्डाण कमीत कमी सहा फुटांचे असे. या उड्डाणाने देवळातील झुंबरेही अनेक वेळा फुटत असत. दादर कुंभारवाडय़ातील राममंदिरात असे प्रसंग घडल्याचे सांगण्यात येते. याशिवाय रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळ अष्टमी अशा उत्सवांच्या पालखी सोहळय़ात राममारुती महाराज रस्त्याने गडबडा लोळण घेत. रस्त्यातून लोळण घेत असताना अणकुचीदार दगडगोटय़ांनी त्यांचे अंग रक्तबंबाळ झाले तरी त्यांचे त्यांना भान राहत नसे. तोंडाने ईश्वरनामाचा, विशेषतः रामनामाचा घोष चालू असे.

पेणच्या देशपांडे घराण्यातील राजारामभाऊ यांचा विवाह ठाणे जिह्यातील भिवंडी येथील कुळकर्णी घराण्यातील कन्येशी झाला. लग्नानंतर तिचे नाव सीता ठेवण्यात आले. राजारामभाऊ व सीताबाई हेच राममारुती महाराजांचे माता-पिता होते. कालांतराने वतने रद्द झाली व राजारामभाऊंनी विटागरात नोकरी धरली. राजारामभाऊ आपल्या आजोळात, भिवंडीत माधवराव खारकर यांच्याकडे राहू लागले. त्यांच्यापोटी रामभक्त, महारुद्र हनुमानाचे अवतार असणारे बालक जन्म घेणार याची कल्पनाही कोणाला नव्हती.

श्री राममारुती महाराजांचा जन्म पेण येथे त्यांच्या राहत्या घरी 1778 साली भाद्रपदात झाला. महाराजांचे नामकरण भिवंडी येथे करण्यात आले व त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. महाराजांचे पिता राजारामभाऊ सद्गुरू बालमुकुंद स्वामींचे शिष्य होते. महाराज मातोश्रींबरोबर देवदर्शन, कथाकीर्तनाला जात असत. पुढे त्यांना शाळेत घातले, परंतु शालेय शिक्षणात त्यांचे मन रमेना. एके दिवशी महाराजांच्या मामांनी महाराजांना मुंबईस बालमुकुंद स्वामींच्या दर्शनास नेले व स्वामींच्या चरणावर महाराजांना अर्पण केले. बालमुकुंद स्वामींबरोबर सुमारे 10 वर्षे तीर्थाटने आटपून ते महाराजांना घेऊन मुंबईच्या मठात आले. बालमुकुंद स्वामींच्या निर्वाणानंतर महाराज कमालीचे उदास झाले व त्यांनी प्राकृत व व्यावहारिक भाषेचा त्याग केला. आयुष्यभर स्वतःची एक स्वतंत्र ईश्वरनाम भाषा तयार केली. हे एका अत्यंत बुद्धिमान व्यक्तीला शक्य असते. पुढे महाराजांचे मामा आजोबा माधवराव खारकर शीव सोडून कल्याणला राहायला गेल्याचे कळले. नंतर महाराजही कल्याणला आले. महाराजांचा भिवंडीतील श्री भीमेश्वराच्या मंदिरात मुक्काम असे. राममारुती महाराजांचे ठाणे येथील श्री कौपिनेश्वर मंदिरातही जाणे-येणे असे. त्यावेळी महाराजांचा मुक्काम खारकर आळीतील शास्त्राrबुवा खारकर यांच्याकडे होता. शास्त्राrबुवांचे निवासस्थान म्हणजे सध्या सीकेपी ज्ञातिगृह म्हणून ओळखली जाणारी जागा. श्री राममारुती महाराजांना त्या काळी संत म्हणून लोकमान्यता मिळाली होती. श्री राममारुती महाराजांनी आयुष्यभर सहवासात येणाऱया सर्वांना नामस्मरणाचा परमेश्वराचे अनुसंधान ठेवण्याचे स्वतःचे आदर्श ठेवण्याचा मार्ग दाखविला.

1918 श्रावण महिन्यात महाराजांना शिर्डीच्या साईबाबांनी दृष्टांत देऊन गुप्त संदेश दिला. श्री साईनाथांच्या गुप्त संदेशानंतर महाराजांनाही अवतार समाप्तीचे वेड लागले. मुंबई, ठाणे व अन्य ठिकाणच्या भक्तांना भेटीला बोलावून पाठीवरून हात फिरवावा व दही-साखर मागून घ्यावी हा नेहमीचा परिपाठ होत बसला. भाद्रपद वद्य प्रतिपदेला शनिवारी उपवास असल्याने दुपारी दोनच्या सुमारास महाराजांना भयंकर ताप भरला म्हणून महाराज टांगा करून केशवराव दळवी यांच्याकडे आले. सात दिवस तापात निघून गेले. त्याच वेळेस शांतारामभाऊ जयवंत, शिवरामभाऊ गुप्ते, वामनराव प्रधान इत्यादींना महाराजांनी बोलावून आपले इच्छापत्र लिहून घेतले. आपल्या सभोवताली बसलेल्या भक्तांना वेगवेगळी कामे सांगून बाहेर पाठविले आणि ‘‘मारुती मारुती म्हणून शनिवार लागला का’’ असे बोलत सोहम जप एवढय़ा जोराने सुरू केला.

पहाटे सवापाच वाजता जपाचा नाद थांबवून महाराज अनंतात विलीन झाले. महाराजांच्या निर्वाणाचे वृत्त सर्वत्र पसरले. कल्याण गावात मुंगीलाही प्रवेश कठीण होईल अशी अलोट गर्दी जमली. अफाट जनसागराच्या साक्षीने महाराजांची भव्य अंत्ययात्रा दळवी वाडय़ातून निघाली. पालखीसारखी आरामखुर्ची फुलांनी शृंगारून त्यात महाराजांना बसविण्यात आले होते. मिरवणुकीत दिव्यांची व हार-फुलांची रोषणाई, अग्रभागी चौघडा, भजनी-दिंडय़ा, ‘रामनामा’च्या निनादात मध्यरात्री एक वाजता ती पालखी पोहोचली.

[email protected]