
>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक
वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.
मी सध्या गृहकर्जाची रक्कम अंशतः फेडू शकतो. अशी परतफेड करावी का, म्हणजे माझ्या शिल्लक ईएमआयची संख्या कमी होईल? – प्रशांत सुर्वे, कामोठे, नवी मुंबई
उत्तर -सर्वसाधारणपणे कर्जफेड करणे कधीही चांगलेच, पण गृहकर्ज त्याला अपवाद आहे. गृहकर्जावरील व्याजदर वाढले असले तरी ते सध्या 8.5 टक्क्यांच्या आसपास आहेत जे सर्वात कमी आहेत. याशिवाय कर्जदाराने जुन्या पद्धतीने आयकर मोजणी करण्याचा विकल्प निवडल्यास मुद्दल आणि व्याज यावर भरपूर कर सवलत आहे. आपल्याकडे असलेल्या पैशांतून गृहकर्ज पूर्णपणे फिटू शकत नाही आणि मासिक हप्ते कमी होत असले तरी मासिक हप्ता कमी होत नाहीये, अशा परिस्थितीत आपले अधिक व्याजदाराचे अन्य कर्ज असेल तर त्याची परतफेड करावी. जर असे कर्ज नसेल तर थोडी जोखीम स्वीकारल्यास आपल्याला उपलब्ध रकमेची गुंतवणूक करून 12 ते 15 टक्के परतावा मिळवता येणे शक्य आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी संपर्क साधून गृहकर्जाची कर्जफेड न करता उपलब्ध रकमेची गुंतवणूक करणे हा स्मार्ट पर्याय समजून घ्यावा. तो पटल्यास कर्जाची अंशतः परतफेड करण्याऐवजी गुंतवणूक करत जावे. जर भविष्यात आपण एकरकमी कर्जफेड करू शकण्याच्या परिस्थितीत आलात तरच सर्व कर्ज एकदम फेडण्याचा विचार करावा.
मला काही अचानक निर्माण झालेल्या खर्चांसाठी अंदाजे पाच लाख रुपये हवे आहेत, यासंबंधी मी माझ्या बँकेकडे चौकशी केली असता ते मला याहून अधिक रकमेचे वैयक्तिक कर्ज देण्यास तयार आहेत. मी हे कर्ज घेऊ का? – प्रसाद दळवी, कोपरखैरणे, नवी मुंबई
उत्तर – आपल्याला पैशांची गरज आहे आणि आपली बँक त्याहून अधिक रक्कम द्यायला तयार आहे. असे म्हणतात की, गरजवंताला अक्कल नसते. तुमच्याकडे ठोस पर्याय असल्याने आपल्याला सदर कर्ज घेणे सहज शक्य आहे, तरीही यात आपले काहीतरी चुकत आहे असे मला वाटते. आपली बँक त्याहून अधिक कर्ज आपणास देण्यास तयार आहे याचा अर्थ आपले उत्पन्न आणि परतफेड क्षमता याविषयी बँकेस खात्री आहे. तरीही आपल्यावर कर्ज घेण्याची वेळ येत आहे याचा दुसरा अर्थ असे आकस्मित खर्च करण्याची तुमची तयारी कुठेतरी कमी पडते आहे. तेव्हा भविष्यात अशा प्रसंगासाठी आपल्याकडे काहीतरी पर्यायी योजना असायला हवी हे लक्षात घ्या. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त असतो, तेव्हा ते घेण्याऐवजी फिक्स डिपॉझिटवर, सोन्याचे दागिने तारण ठेवून, पीपीएफमधील पैसे काढून अथवा मित्र, नातेवाईक यांच्याकडून उसने पैसे घेऊन आपली गरज भागते का याची चाचपणी करावी. यात व्याज कमी लागेल अथवा अजिबात लागणार नाही, फक्त त्याची वेळेत परतफेड करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. हे लक्षात ठेवून उसने पैसे घ्यावे.





























































