रिसॉर्ट विश्वातला दीपस्तंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उत्तरा मोने

मुंबई आणि पुण्याच्या मंडळींसाठी एक दिवस किंवा 3/4 दिवसही राहण्यासाठी उत्तम पर्याय आणि उत्तम माणसांनी केलेला पाहुणचार अनुभवायचा असेल तर खोपोलीतल्या यू. के. रिसॉर्टला जायलाच हवं. आपल्या मराठी माणसाने बांधलेलं एक उत्तम रिसॉर्ट. संतोष पाटील या एका शेतकऱयाच्या मुलाने मोठय़ा कष्टाने उभी केलेली ही वास्तू, अनेक चढउतारांना तोंड देत सगळ्या सोयीसुविधांनी सुसज्ज असं हे रिसॉर्ट आज पर्यटकांच्या पसंतीला उतरलं आहे.

खोपोलीचे यू. के. रिसॉर्ट हे एकच ठिकाण नाही, तर येलूर येथील हॉटेल साई इंटरनॅशनल, साई मंगलम, शिराळा येथील साई संस्कृती नावाचा उद्योग… संतोष पाटील यांच्या या सगळ्याच उद्योगांसाठी ग्राहकांचं समाधानाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. स्टेडी माइंड क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच सिद्धागिरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते संचालक आहेत. अशा सर्व व्यवसायांचा डोलारा सांभाळत आज ते ठामपणे उभे आहेत. हा सगळा प्रवास करत असताना संतोषदादांच्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार आले, पण अपयशाने खचून न जाता ते आपल्या कर्तव्यपथावर चालत राहिले.

संतोष पाटील म्हणतात, ‘रिसॉर्ट इंडस्ट्रीमध्ये आव्हानंही खूप आहेत. बरेच लोक आपली जागा आहे म्हणून रिसॉर्ट किंवा हॉटेल काढतात. खरं तर ती जागा त्या योग्यतेची आहे का? काही पर्यटनस्थळ असेल, काही युनिकनेस असेल, तुमच्याकडेच लोकांनी का यावं याच्यासाठी तुम्ही काही योजना केली आहे का? या सगळ्या गोष्टी गृहीत धरून ती जागा निवडणं गरजेचं असतं.

ते पुढे म्हणाले, या रिसॉर्टच्या आव्हानांना लक्षात घेऊन मी खोपोलीला रिसॉर्ट चालू केलं. वर्ष दीड वर्षामध्येच एक्स्प्रेस हायवे सुरू झाला. जे रिसॉर्ट पहिल्या दिवसापासून खूप मोठय़ा प्रमाणामध्ये चालत होतं आणि अचानक 80 टक्के धंदा बंद झाला. त्या रस्त्यावरती असणारी अगदी 50 वर्षांची हॉटेल्स / रेस्टॉरंट बंद झाली. आम्ही तर नवीन आलेलो होतो. मग आम्ही त्यावर मात केली. आजूबाजूची आणखी काही जागा विकत घेतली. रिसॉर्ट मोठं करण्याच्या दृष्टीनं आम्ही नियोजन केलं. वॉटर पार्क, स्विमिंग पूल, रेन डान्स, डेस्टिनेशन वेडिंगसाठी तयारी केली. शिवाय खोपोलीच्या आजूबाजूला जी फार्म हाऊसेस आहेत, त्या ठिकाणी आम्ही पार्सल लोकांना नेऊन द्यायला लागलो. आम्ही टिकून राहण्यासाठी खूप काही अशा गोष्टी केल्या की, ज्याच्यातून आम्ही परत पुढच्या 2/3 वर्षांमध्ये चांगला जम बसवला.

खरं तर पाटील यांनी आपल्या उद्योगविश्वाची सुरुवात दाजी वसंतराव इंगवले यांच्या सहकार्याने येलूर गावाशेजारील हायवेवर छोटासा ढाबा सुरू करून केली. त्यानंतर अनेक वर्षे अभ्यास करून परिस्थितीचा अंदाज घेत, चिकाटीने त्यांनी या क्षेत्रात आपलं पाऊल घट्ट रोवलं. आज आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) उद्योगामध्ये त्यांनी मोठी भरारी घेतली.

नवउद्योजकांना मार्गदर्शन

संतोषदादांचं शालेय शिक्षण येलूरमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण इस्लामपूरमध्ये आणि कोल्हापुरात एलएलबीचं शिक्षण झालं. पुढे ते स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करत होते, पण त्या बाबतीत त्यांना हवं तसं यश मिळालं नाही आणि ते व्यवसायाच्या नव्या दिशेकडे वळले, पण पुढे यशस्वी उद्योजक झाल्यावर महाराष्ट्रातील स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून दरवर्षी न चुकता ते ‘स्पर्धा परीक्षा संमेलन’ भरवतात. तसंच ‘सॅटर्डे ग्लोबल क्लब’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर नवउद्योजक निर्मितीसाठीही त्यांनी मार्गदर्शनाचा जागर केला.