विमा कवच अपुरेच

515

>> वैभव मोहन पाटील

नुकत्याच सादर झालेल्या 2020-21 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापारी बँकांमधील ठेवींच्या विमा संरक्षणाची मर्यादा 1 लाखावरून 5 लाख रुपये प्रति खाते केली असल्याची घोषणा केली. बँक ठेवींना विमा संरक्षण देण्याचे काम रिझर्व्ह बँकेची उप कंपनी डिपॉझिट इन्शुरन्स ऍण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) करते. हे विमा संरक्षण गेल्या दोन ते तीन दशकांपासून केवळ एक लाख इतकेच होते. त्यामुळे बँक खाती अडचणीत सापडल्यानंतर त्याचा मोठा फटका एक लाखाच्या वर ठेवी असणाऱया बँक ठेवीदारांना बसत होता. पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे ठेवीदार हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे एक लाख ही विम्याची मर्यादा खूपच तोकडी असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत होते. आता ही मर्यादा पाच लाख केली असली तरी ही मर्यादादेखील अपुरी आहे. प्रत्यक्षात डीआयसीजीसीची आर्थिक परिस्थिती बघितली तर सर्वच बँकांमधील सर्व खातेदारांच्या संपूर्ण ठेवींना विमा संरक्षण मिळू शकते, अशी स्थिती आहे. डीआयसीजीसीने देशातील 2,109 बँकांना विमा संरक्षण कवच उपलब्ध केले आहे. या बँकांमध्ये एकूण 112.20 लाख कोटी ठेवी आहेत व एकूण खात्यांची संख्या 194 कोटी आहे. त्यापैकी 177 कोटी खात्यांमधील पूर्ण ठेवींना डीआयसीजीसीचे विमा संरक्षण मिळते आहे. याचा अर्थ केवळ 17 कोटी खात्यांमध्ये एक लाखापेक्षा अधिक रकमेच्या ठेवी आहेत व हीच खाती विमा संरक्षणाबाहेर आहेत. आता ही मर्यादा पाच लाख केल्याने आणखी कोटय़वधी खाती विमा संरक्षणाखाली येणार आहेत ही बाब समाधानकारक आहे. मात्र या कंपनीच्या वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध आहे, तिचा विचार करता डीआयसीजीसी केवळ पाच लाखच नव्हे तर सर्व ठेवींना विमा संरक्षण देण्यास सक्षम आहे असे दिसते.

डीआयसीजीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या 2017-18 च्या ताळेबंदानुसार डीआयसीजीसीजवळ 81 हजार 430 कोटींचा ठेव विमा निधी आहे व तो दरवर्षी 10 हजार ते 11 हजार 500 कोटींनी वाढतो आहे. त्यामानाने डीआयसीजीसीने चुकत्या केलेल्या विमा दाव्यांची रक्कम अर्धी म्हणजे 5,080 कोटी एवढी कमी आहे. अडचणीत सापडलेल्या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीचा एक मोठा आधार असतो. त्यामुळे विमा संरक्षण पाच लाखांवर गेले असले तरी लोकांचा वाढलेला आर्थिक स्तर व बँकेतील ठेवी सुरक्षित मानून बँकिंग क्षेत्रामधील वाढती गुंतवणूक पाहता ही मर्यादा वाढवण्याबाबत विचार व्हायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या