
>> वामन देशपांडे
संपूर्ण विसावे शतक आपल्या शाश्वत गीतकाव्याने तोलून धरणारे महाकवी ग. दि. माडगूळकर हे मराठी अक्षर वाङ्मयातले सर्वात मोठा चमत्कार होते. अभिजात मराठी काव्यातले सर्व प्रकार महाकवी माडगूळकरांनी अगदी लीलया हाताळले. अभिजात काव्य आणि शाश्वत तत्त्वज्ञान यांचा अप्रतिम संगम म्हणजे माडगूळकरांचे एकूणच काव्य. महाकवी गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष सोमवार, 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
संपूर्ण विसावे शतक आपल्या शाश्वत गीतकाव्याने तोलून धरणारे महाकवी पद्मश्री ग. दि. माडगूळकर हे मराठी अक्षरवाङ्मयातला सर्वात मोठा चमत्कार होते. अभिजात मराठी काव्यातले सर्व प्रकार महाकवी माडगूळकरांनी अगदी लीलया हाताळले. मानवी मनातली तत्त्वजिज्ञासा सतत तेजाळत ठेवणारी, अभिजात रसिकतेला आपल्या प्रेममयी कुशीत घेणारी, परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव क्षणोक्षणी जागृतावस्थेत ठेवणारी, भक्तिमार्ग उजळवून टाकणारी, प्रेमभावनेला सतारीसारखी झंकारत ठेवणारी, संतवाङ्मयाशी थेट नाते जोडणारी माडगूळकरांची एकूणच कविता, त्यांचे गीतकाव्य, त्यांचे कढत लावणी वाङ्मय, चित्रपटातली शेकडो गाणी आणि सवाल-जबाब या साऱया नक्षत्रकाव्याचा रसिकतेने आपण आस्वाद घेतो, तेव्हा आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते की, ही सारी एकाच कवीची काव्यप्रतिभा एकाच जन्मात कशी काय उमलून आली? अभिजात काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा अप्रतिम प्रीतिसंगम म्हणजे माडगूळकरांची अवकाशव्यापी प्रतिभा आहे याची जाणीव, आपल्याला पदोपदी होत राहते.
माडगूळकरांच्या शैलीबद्दल काय लिहावे? शब्दसिद्धी जणू त्यांना जन्मतःच लाभलेली होती. कोणतीही अनुभूती असो, तिला रूपवंत करणारे शब्द जणू त्यांच्या पुढे हात जोडून उभे राहत. ठोस मराठमोळी भाषा लिहिणारे त्यांच्यासारखे कवी आजही दुर्मीळ आहेत. त्या भाषेला एकीकडून संस्कृतच्या व्यासंगाने विदग्धतेचा स्पर्श झालेला होता, तर दुसरीकडून ग्रामीण शब्दसंपत्तीने तिला श्रीमंत केले होते. ‘पूरिया’तल्या कविता वरवर चाळून पाहिल्या तरी यूथप, आरक्षी, उपानह, अनाहत, रतिक्लान्त असे अस्सल संस्कृत शब्द त्यात सापडतात. त्याप्रमाणे बुरंगट, वायधूळ, वेत, तवसडी अशा अर्थपूर्ण ग्रामीण शब्दांचाही त्यात आढळ होतो. सुंदर शब्दचित्रांनी आपली चित्रपट गीते जिवंत करणारे माडगूळकर कवितांमधूनही ते चित्रलाघव दाखवून देतात.
हा ‘पूरिया’ जीवनाच्या संध्याकाळी आळवलेला आहे. त्यामुळे आनंदाबरोबर खिन्नताही तो आपल्या मनात निर्माण करतो आणि शेवटी मनात जाग्या होतात त्या माडगूळकरांच्याच काव्यपंक्ती. कवीबरोबर आपलेही मन गुणगूणू लागते…
‘‘दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया!
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या!’’
माडगूळकरांच्या काव्य प्रतिभेला अवकाशाचा वेध घेण्याचे सामर्थ्य लाभले होते. कथा-कादंबऱया-व्यक्तिचित्रण अशा वाङ्मयाचे दालन माडगूळकरांनी समृद्ध केले होते.
एकनाथांप्रमाणे माडगूळकर हे सर्व पेठांचे कवी. भागवतापासून भारुडापर्यंत नाना परींच्या गीतांचे एकनाथ जसे जनक होते, तसेच माडगूळकर. तमाशाच्या बोर्डावर माडगूळकरांची लावणी छुमछुमत असते. देवळातल्या कीर्तनात त्यांचा अभंग रंगलेला असतो. एखादी नात आजीला ‘गीतरामायण’ ऐकवीत असते. एखाद्या विजनात तरुतळी एक वही कवितेची घेऊन प्रियकराच्या कानी गाणे गुणगुणणारी युवती माडगूळकरांचे गीत गात असते आणि सीमेवरचे जवान त्यांच्या समरगीताच्या धुंदीत पावले टाकीत असतात. कवीच्या हयातीतच त्या गीतांपैकी अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभले.
संतशाहिरांनंतर असले नामातीत होण्याचे भाग्य एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाभलेला कवी माझ्या पाहण्यात नाही. सामान्य आणि असामान्य दोन्ही प्रतीच्या रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळालेला हा कवी आहे.
अत्यंत सोप्या आणि चित्रमयता लाभलेल्या लडिवाळ शब्दांमधून ‘गदिमां’नी शाश्वत गीतांचा नजराणा संपूर्ण मराठी साहित्य आणि संस्कृतीला बहाल केला. प्रतिभेची सहज लीला म्हणजे काय याचे सुंदर दृश्यमयी गीतकाव्य म्हणजे ‘गदिमां’चे समग्र काव्यलेखन. ‘गीतरामायण’ हा गदिमांच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार. ‘गीतरामायण’ संपूर्ण विश्वभर पसरले. माडगूळकर-फडके या दोन दिग्गजांच्या प्रतिभासंगमाला आज साठ वर्षे उलटून गेली तरी ‘गीतरामायण’ हे महाकाव्य रसिकांच्या अंतःकरणात सतत झंकारत असते. ‘गीतरामायण’ या अजरामर काव्याने माडगूळकरांना वाल्मीकी ऋषींच्या परंपरेत सहजपणे स्थान देत ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ म्हणून संबोधले गेले. 1 ऑक्टोबर 1919 या शुभ दिवशी माणदेशात प्रकट झालेल्या या सरस्वतीपुत्राने अठ्ठावन्न वर्षांच्या आयुष्यात खूप मोठा अक्षरचमत्कार घडविला. 1969 साली वयाच्या पन्नासाव्या वर्षी केंद्र सरकारने त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचा सत्कार करीत ‘पद्मश्री’ देऊन त्यांना भूषवले. त्याच वर्षी गदिमा अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष झाले. 1973 च्या यवतमाळ येथे संपन्न झालेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषवले. अनेक सरकारी कमिटय़ांवर त्यांनी काम केले. काही वर्षे ते विधान परिषदेचे आमदारसुद्धा होते. त्यांनी आपल्या प्रतिभेची कुंडली मांडताना लिहिले होते की,
माझिया रक्तात काही ईश्वराचा अंश आहे
ज्ञानियाचा वा तुक्याचा हाच माझा वंश आहे
संपूर्ण विसाव्या शतकाला आपल्या शाश्वत कवितेचा चंदनगंधी स्पर्श बहाल करणाऱया गदिमांच्या कवितेला मराठी भाषेने अमरत्वाचे वरदान दिले. ‘गदिमा’ म्हणजे जणू अक्षरब्रह्म अशा दिव्य स्वरूपात मराठी रसिकांनी त्यांच्या काव्यभारल्या अस्तित्वाचे दर्शन घेतले. ‘गीतरामायण’ तर देशातील कितीतरी भाषांमधून रूपांतरित झाले. तीस-पस्तीस वर्षे गदिमांच्या काव्यसृष्टीने स्वैर संचार करीत संपूर्ण चित्रपट विश्व काबीज केले. गदिमांचे बालपण जात्यावरच्या ओव्या ऐकण्यात तसेच गावातल्या देवळात रंगणाऱया कीर्तनातल्या कथांमधून सहजपणे घडत गेले. बालमनावर झालेले संस्कार पुढे त्यांच्या असंख्य गीतांमधून उमटत गेले. गदिमांची गाणी आकाशभर विखुरली. एवढा चतुरस्र कवी मराठी काव्यात दुसरा नाही. सर्व मानसन्मान माडगूळकरांना मिळाले. मनात येते की, त्यांच्या एकूणच काव्याचा विचार करता ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने ‘गदिमां’ना सन्मानित करायला हवे होते. ‘गीतरामायण’ या अमरत्व लाभलेल्या कलाकृतीचा सन्मान व्हायला हवा होता. मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱया ‘गदिमां’ना निदान ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने तरी गौरवणे आवश्यक होते, परंतु समीक्षेची फुटपट्टी त्यांच्या शाश्वत काव्याचे मोजमाप करायला असमर्थ ठरली.
14 डिसेंबर 1977 रोजी गदिमांनी या मर्त्य विश्वाचा निरोप घेतला, परंतु त्यांना परमेश्वरी कृपेने अमरत्वाचा नजराणा मिळाला. जोपर्यंत ही पृथ्वी फिरते आहे तोपर्यंत ‘गीतरामायण’ आकाशात तेजस्वी ताऱयासारखे चमकत राहील हे निश्चित!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)



























































