योगसाधना

550

>> वरद चव्हाण

माधवी निमकर. स्वतःचा आहार आणि व्यायाम याविषयी अत्यंत जागरुक असलेली माधवी आपल्या योगसाधनेच्या अत्यंत प्रेमात आहे.

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! नवीन वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने झाली आहे. थंडीत अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो. आळसामुळे कुठेही जाऊ नये, काही करू नये असे वाटते. पण थंडीत व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत हे विसरू नका. उदा. थंडीत व्यायाम करून तुम्ही नेहमीपेक्षा अधिक कॅलरीज बर्न करता, तुमचे हृदय अधिक सक्षम होते, तुम्ही पाणी जास्त पिता, तुम्हाला व्हिटॅमिन डीसुद्धा जरा अधिक प्रमाणात मिळते. हे वाचूनसुद्धा जर तुम्हाला व्यायाम करण्याची प्रेरणा मिळत नसेल तर आजचा हा लेख वाचून नक्की मिळेल. आज आपण एका अशा सेलिब्रिटीचा लेख वाचणार आहोत जिने अभिनयात पदार्पण 2007 साली केले खरे, पण तेव्हापासून आतापर्यंत, म्हणजेच ती खोपोलीवरून मुंबईत आली, स्ट्रगल केले, अभिनयात यशही मिळाले, अनेक तरुण तिच्या सौंदर्यामुळे तिचे चाहते झाले, आज ती एक नामांकित अभिनेत्री आहे. शिवाय एका मुलाची आईसुद्धा आहे. पण मुंबईत आल्यापासून ते आई होण्यापर्यंत एका गोष्टीवर ती अत्यंत फोकस करते आणि ती गोष्ट म्हणजे तिचा फिटनेस. आपल्यातले अनेकजण फिट राहण्यासाठी जिमचा आसरा घेतात, पण हिने आसरा घेतला ‘योगाचा’. आजची आपली फिट सेलिब्रिटी आहे ‘माधवी निमकर’. शाळा-कॉलेजमध्ये असताना माधवीला कुठल्याही स्पोर्टस्मध्ये भाग घेण्याची अजिबात आवड नव्हती. अभिनेत्री ‘सोनाली खरे’ माधवीची सख्खी मावस बहीण. बहिणीला बघून माधवीलासुद्धा अभिनयाची आवड निर्माण झाली. शाळा-कॉलेजला सुट्टी असताना माधवी जमेल तसे खोपोली-मुंबई हा प्रवास फक्त सोनाली खरेचं शूटिंग बघायला करत असे. 2007 साली तिने मुंबईत येऊन स्ट्रगल करायचे ठरवले. एकदा सोनाली खरे बरोबरच ती ‘ई’टीव्हीच्या ऑफिसमध्ये गेली होती. तेव्हा संतोष आयाचीत म्हणजेच ‘जय मल्हार’ व ‘बाळूमामा’ ज्यांनी घडवले त्यांनी माधवीला ‘गाणे तुमचे-आमचे’ नावाच्या एका शोमध्ये ऍन्करिंग करायची संधी दिली. तेव्हा माधवीच्या बँकेत मोजून 1800 ते 2000 रुपये होते. त्यामुळे शो तर मिळाला. आता जिम लावू, डाएट करू, असा विचारसुद्धा तिच्या मनात आला नाही. म्हणून तिने काही दिवस पार्टटाइम जॉबसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, पण शूट आणि जॉब दोन्ही एका वेळेस करणे शक्य होत नव्हते म्हणून जॉब सोडावा लागला. त्यामुळे तेव्हा मिळेल त्या पैशात सर्व्हाइव्ह होणे हाच माधवीचा हेतू होता. 2010 साली माधवीला ‘स्वप्नांच्या पलीकडले’ नावाची सीरियल मिळाली. ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाली. तेव्हा कुठे माधवीने स्वतःवर लक्ष देण्याचे ठरवले. सुदैवाने माधवी सुरुवातीपासून बारीकच होती, पण मिळालेले यश गृहित न धरता तिने डाएट करायचे ठरवले आणि तेसुद्धा कुठल्याही डाएटिशनकडे न जाता स्वतःच करायचे ठरवले. मित्र-मैत्रिणींचा सल्ला घेतला, नेटवरून माहिती काढली आणि स्वतःचा डाएट ठरवला. डाएटमध्ये जर तुम्ही फास्ट फूड, बेकरी आयटम्स, ऑयली, तिखट खाणे हे जरी बंद किंवा कंट्रोल केले तरी तुम्हाला कुठल्याही डाएटिशनकडे जायची गरज नसते असे तिचे ठाम मत आहे. 2012 साली तिने जिमसुद्धा जॉईन केली. तिला व्यायाम करायला आवडत होते, पण कुठेतरी या व्यायामामुळे आपली बॉडी स्टिफ होतेय असे तिला जाणवू लागले. तिला तिचे शरीर फ्लेक्सिबल हवे होते म्हणूनच कदाचित व्यायामशाळेचे वेड फार टिकले नसावे. इतकी वर्षे डाएटची साथ होतीच आणि तिने तयार केलेला डाएट प्लॅन तिला योग्यही वाटत होता. कारण तिचे वजन वाढत नव्हते, अशक्तपणासुद्धा वाटत नव्हता, पण माधवीच्या आयुष्यात ‘योगा’ने एण्ट्री घेतली ते ती ‘आई’ झाल्यानंतर. साधारण 3 वर्षे ती नियमितपणे योगा करत आहे. डिलिव्हरीनंतर प्रत्येक स्त्र्ााrप्रमाणेच माधवीचे वजन वाढले होते. माधवीचे वजन 62 किलोपर्यंत गेले होते आणि माधवीचा असा हट्ट होता की, तिला परत इतके बारीक व्हायचंय की तिला डिलिव्हरीआधीचे तिचे कपडे परत नीट झाले पाहिजेत आणि या वेळेस तिने जिमला न जाता ‘योगा’ करायचे ठरवले. प्रेगनेंट असतानासुद्धा माधवी प्रेगनेन्सी योगा करत होती. मुलगा झाल्यावर मात्र तिने ‘रिमा वेंगळुलेकर’ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अष्टांगयोगा’ सुरू केला. आधी रिमाजी माधवीला घरी येऊन योगा शिकवत असत, पण आता त्यांचा स्वतःचा योगा क्लास आहे आणि माधवी आता योगामध्ये इतकी माहीर झाली आहे हे तिच्या इन्स्टाग्रामच्या व्हिडीओजमधून आपल्याला दिसून येते. योगाच्या आसनांपैकी ‘कूरमासन’, ‘अष्टवक्रासन’, ‘भूजपिदासन’, चक्रासन’, ‘उर्ध्व धनू आसन’ ही माधवीची आवडती आसने आहेत. तिच्या चाहत्यांना माधवीला आवर्जून सांगावेसे वाटते की, सध्याच्या ताणतणावाच्या आयुष्यात स्वतःचे मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी योगा उत्तम पर्याय आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या