
>> वीणा जामकर
हिंदुस्थान स्वतंत्र झाला तरी गरिबीच्या प्रश्नातून मात्र त्याची सुटकी झाली नाही. कंचितांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. ही दारिद्रय़रेषा दिवसेंदिवस खाली येत आहे. शिक्षणामुळे आपण प्रगती केली असली तरी शिक्षणाचं हे सुख साऱयांच्या नशिबी नाही. किमान गरजा पूर्ण करण्यासाठीची वणवण शाळेपर्यंत पावलं घेऊनच जात नसेल तर… देश प्रगती करतोय पण नेमका कुठे, पालाकर, रस्त्याकर, खाणकामगारांची दारिद्रय़रेषा कोणत्या निकषाने मोजली जात असेल, अशा अनेक प्रश्नांना समोर आणलं आहे, हेरंब कुलकर्णी यांच्या ‘दारिद्रय़ाची शोधयात्रा ’या पुस्तकाने. वंचितांच्या जगण्यातलं वास्तव शोधताना गरिबीची अनेक रूपं हेरंब कुलकर्णी यांनी अनुभवली. पुस्तकाबाबत जे अनुभवलं त्याचं संवेदनशील चिंतन मांडणारा प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकर यांचा हा लेख.
हेरंब कुलकर्णी यांचे ‘दारिद्रय़ाची शोधयात्रा’ हे पुस्तक वाचले. वाचून फार त्रास झाला. वाईट वाटले. आनंद व्हावा असं या पुस्तकात काहीच नाही. फक्त कमाल वाटली हेरंब सरांची. जे वाचवत नाही, एकेक पान पालटून मन विषण्ण होतं.
मी काही वर्षांपूर्वीपर्यंत या वेगवेगळय़ा घटकांशी संबंधित काम करत होते. दलपतसिंग येती गावासारखं नाटक, काही पूर्णपणे सामाजिक विषय असलेले चित्रपट, कधी एचआयव्हीग्रस्त मुलं, कधी आदिवासी पाडय़ाला भेट असं काहीबाही करत होते. एका क्षणी मला त्रास व्हायला लागला आणि मी जवळजवळ स्वतःला या सर्वांतून बाजूला करून घेतलं. कधीही न संपणारे, गरीबांचे, शोषित-वंचितांचे प्रश्न, त्यावर चिकाटीने काम करणाऱया सामाजिक संस्था (काही चांगल्या, काही भ्रष्ट), काही एकटे-दुकटे कार्यकर्ते, काही जोडपी, त्यांना मदत करणारी वेगवेगळय़ा क्षेत्रांतली माणसं, त्यांच्यासोबत अनेक हेतूने जोडले जाणारे हौशे-नवशे-गवशे आणि कमालीची ‘मानसिक दारिद्रय़ता’ असलेली प्रशासन संस्था. असं वाटलं हे माझं क्षेत्र नाही.
‘दारिद्रय़ाची सीमारेषा’ या पुस्तकाने मला पुन्हा एकदा या डिप्रेशनमध्ये खेचलंय. जराशीही संवेदनशीलता असलेला माणूस झापड लावून नाही घेईल तर तो जगेल कसा? या महाप्रचंड विस्तारलेल्या महाराष्ट्रात असा एकही घटक नाही जो सुखी आहे. सगळीकडे प्रश्नच प्रश्न आणि त्याहून कडी म्हणजे ते सोडवण्याची धडपड, कळकळ असलेले अभ्यासू, चांगले लोकच फ्रस्ट्रेट होतील अशी वस्तुस्थिती. तरीही कितीजण या उखडून पडलेल्या जमिनीत काहीतरी रुजावं म्हणून घाव घालत बसतात… केवढी ती ताकद!
जे. कृष्णमूर्ती, सानेगुरुजी असं चांगलं-चांगलं, मनाला उभारी देणारच लिहा. कोण वाचणार हे? वाचून करावं काय? एकेक घटक – एकेक जात-जमात फक्त तडफडतेच आहे. दारिद्रय़ाची आकडेवारी भोवळ आणते. आतापर्यंत फक्त शेतकऱयांचेच प्रश्न सतत ऐकले. या बाकीच्या सर्वांनी बोलायचं ठरवलं तर? (जी ताकद त्यांच्यात जवळपास नाहीच).
गरीब लोक काय खातात? रोजगार, स्थलांतरित, शेतकरी आत्महत्या, कर्ज, भटके-विमुक्त खेडय़ातले दलित, असंघटित मजूर, दारूचे व्यसन, योजनांमधला छळ, अनारोग्य, लग्नखर्च, गावपातळीवरील प्रशासन, उखडलेले रस्ते, ग्रामीण शिक्षणाचा बट्टय़ाबोळ, सिंचन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे हाल, बचत गटांची रोडावलेली चळवळ, वनहक्कांच्या प्रतीक्षेत आदिवासी, प्रकल्पग्रस्तांचे अधांतरी आयुष्य याशिवायही उरलेली काही निरीक्षणं… कुठला मुद्दा सुटला ग्रामीण महाराष्ट्राचा की ज्यात सगळं बऱयापैकी नीट चालू आहे?
माझे महाराष्ट्रातले काही 3-4 जिल्हे राहिलेत फिरायचे. गडचिरोली, चंद्रपूर, वाशीम, हिंगोली वगैरे. नाहीतर प्रत्येक जिल्हय़ाला किमान भोज्जा करून तरी आलेच आहे, पण आता हे पुस्तक वाचल्यानंतर डोळे आपोआप विस्फारलेलेच राहतील. ग्रामीण भागात फिरताना काय पाहावं हे थोडंफार माहीत होतंच एवढय़ा वर्षात, पण सरांच्या पुस्तकामुळे आता नजर बरंच काही बघू-ऐकू शकेल.
माझा दादा छत्तीसगढ, म. प्रदेशमध्ये आदिवासी भागात काम करायचा. एकदा त्याच्यासोबत पाडय़ावर गेले असताना एक गुबगुबीत, छान बाळ कडेवर घेतलं. म्हटलं, ‘काय छान गाल आहेत. गोबरे-गोबरे’ दादा म्हणाला, ‘‘गाल गोबरे नाहीत… ती सूज आहे.’’
कुलकर्णी सरांच्या शोधयात्रेत ग्रामीण महाराष्ट्राच्या सौंदर्यामागची सूज एक-एक ओळीतून स्पष्ट दिसते. मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडून अगदी साध्या खेडेगावात, दुष्काळी भागात गेलो तरी गावात आल्याचा आनंद व्हायचाच. अशी पुस्तकं आणि असे लेखक तुम्हाला स्वस्थचित्ताने जगू देत नाहीत. ते डोळय़ांवरची झापडं ओढून काढून एक प्रकारे आपल्यावर उपकारच करतात, पण त्या उपकाराचं ओझं कोणाकोणाला पेलवणार सर?
हे पुस्तक वाचून कुठल्या क्षेत्रातल्या व्यक्तीने काय करायचं हे ज्याचं तो ठरवेल, पण पुस्तकापेक्षाही त्या विषयावर लिहिण्याची जिज्ञासा, अभ्यास, वणवण आणि खंबीर अलिप्त, पण संवेदनशील मन असलेल्या हेरंब कुलकर्णी सरांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात. तुम्ही आताच्या काळातले सामाजिक, शैक्षणिक विषयांवर सातत्याने आणि अतिशय आस्थेने लिहिणारे महत्त्वाचे लेखक – कार्यकर्ते – शिक्षक आहात म्हणून घरबसल्या आमच्या जाणिवा इतक्या विस्तारत जातात. पुस्तक वाचून कितीही त्रास झाला तरी त्या त्रासाचं मोल खूप आहे.
माझ्या नजरेला अजून कंगोरे दिलेत आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच्या फोटोसारखा माझ्या तुकतुकीत चेहऱयावर तापलेल्या उन्हाचा भाजलेला कडक थर चढवलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मला आजकाल दृष्टिआड घडणाऱया अनंत अमानवी घटनांपेक्षा त्या इतरांपर्यंत पोहोचवणाऱया लोकांचीच काळजी जास्त वाटते. कारण वस्तुस्थितीत बऱयाचदा काहीच फरक पडत नाही किंवा अतिसंथ फरक पडतो तोपर्यंत त्या विषयात तळमळीने काम करणाऱयांनी कशाच्या जोरावर जगायचं? आपण कशासाठी हा लिहिण्याचा, काम करण्याचा खटाटोप करतो? काय हाती लागतं? अशी उद्विग्नता त्यांना येत नसेल का?
आमच्या 2-4 कौतुकाच्या शब्दांनी दारिद्रय़रेषा पुसली जाणारच नाही. लेखकाला तरी काय फरक पडेल माहीत नाही, पण पडलाच तर तुम्ही यापुढे मनाशी हरवलेल्या सर्व शोधयात्रा पूर्ण करण्याचं बळ तुमच्यात आणि तुमच्या कुटुंबात अखंड राहो अशी माझी मनापासून प्रार्थना आहे.
ग्रामीण महाराष्ट्र आता मला कायमचाच अनरोमँटिक वाटेल हे या पुस्तकाचं यश आणि परिस्थितीचं अपयश.





























































