जगाच्या छपरावर मी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजय ढवळे

माझे नाव कॅथरिन मॉरिस. पण सर्वजण ‘केट’ या संक्षिप्त नावानेच हाक मारतात. माझी अगदी जवळची मैत्रीण म्हणजे मेलिसा युले. तिचे प्रचलित नाव ‘मेल’. आम्ही दोघीही क्रीडापटू आहोत. एक दिवस ठरवले की, तिबेटचा प्रवास सायकलवरून करायचा. मग त्या देशाची माहिती जमवायला सुरुवात केली. त्याकरिता ग्रंथालये आणि गुगलची मदत अपरिहार्य होती. जगातला समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर हा देश आहे. त्याच्याबद्दल असणाऱया तुटपुंज्या सामान्यज्ञानाच्या जोरावर आम्ही दोघी पंचवीशीतल्या तरुणी निघालो होतो. तेथे सायकलवरून प्रवास करण्यासाठी चांगले रस्ते आहेत का, सुरक्षिततेचा प्रश्न किती भेडसावू शकतो, वगैरे शंकाकुशंका आम्हा दोघींच्या कुटुंबीयांच्या मनात होता, पण मनाचा निश्चय कायम होता.

कॅनेडियन्स असल्याने आम्हाला चीनचा व्हिसा विनासायास मिळाला. कुडी नावाचे पश्चिम चीनमध्ये एक छोटेसे गाव आहे. त्या दिशेने आमच्या सायकली दामटल्या. स्लिपिंग बॅगज्मधील सर्व आवश्यक सामान पुन्हा तपासून घेतले. कँपिंगकरता आवश्यक सामग्री जवळ होतीच. सायकलींना ‘रिफ्लेक्टर्स’ लावले होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात प्रवास करणे सोपे असते, असा अनुभव होता. नेहमी भल्या पहाटे प्रवासास सुरुवात करण्याची आमची प्रथा होती. सायकलींचा सराव व्हावा म्हणून आम्ही कॅनडात सुमारे हजार किलोमीटर्स प्रवास सायकलींवरून केला होता. त्यामुळे थोडाफार अनुभव गाठीला होता. तरी तिबेटमध्ये काही समस्या तर उद्भवणार नाही ना, ही शंका मन कुरडत होतीच!

तहान, भूक, शारीरिक विधी करण्याच्या गरजा या दैनंदिन जीवनातल्या नेहमीच्या गोष्टी, पण तुम्ही सायकलस्वार झालात की त्यांच्याही मोठय़ा समस्या होऊ शकतात. कारण अनेक मैल अंतर काटले तरी तुमच्या सहप्रवाशाशिवाय तुम्हाला कोणताही आधार नसतो. पुढचे खाणे कुठे मिळेल, केव्हा मिळेल, ते कसे असेल ही सर्व प्रश्नचिन्हेच असतात! ‘सिल्क रोड’ या नावाने ओळखल्या जाणाऱया मार्गावरून आमची कालक्रमणा चालू होती. अचानक दूरवर खोपटेवजा एक वास्तू दिसली. तो ‘चेक पॉइंट’ असावा, असा आमचा तर्क बरोबर निघाला. तेथे अर्थातच लष्करी सैनिक तैनातीमध्ये होते. कारण त्या भागाला भेट देण्याकरिता बरेच पर्यटक येतात. त्यांच्याबरोबर स्थानिक वाटाडय़ाही असतो आणि त्या भागाच्या आत शिरण्याकरिता स्पेशल परवाना आवश्यक असतो. आमच्याकडे ना गाईड होता, ना परवाने. आणि सक्ती केली असती तर परवाने घेण्यासाठी लागणाऱया पैशांचीही आमच्याकडे वानवा होती. आम्ही दोघी नुकत्याच पदवीधर झालो होतो. घरांतून संपत्ती अशी ऊतू वाहून जात नव्हती. पण तारुण्याची रग आणि साहसी प्रवृत्ती यांच्या बळावर आम्ही हा प्रवास करण्यास उद्युक्त झालो होतो. आम्ही त्या सुरक्षा पोस्टकडे न पाहिल्यासारखे केले आणि वेगाने पुढे निघालो. आश्चर्य म्हणजे आम्हाला कोणताही अटकाव झाला नाही.

आमचा भ्रमनिरास व्हायला पाच मिनिटांचाही अवधी लागला नाही. माझ्या डाव्या बाजूला नदीचा खळखळाट ऐकू येत होता. समोर अंधाराला थोडीशी दृष्टी सरावल्याने पर्वतरांगाच दिसत होत्या. अचानक एक प्रकाशझोत समोर आला. ते इतके अनपेक्षित होते की, माझा सायकलवरून तोल सुटला. मेलही डोळे विस्फारून पाहत होती. तो प्रकाश वर खाली होत होतो. मेलचे ध्यान ढळले. तिचा तोल गेला व ती शेजारच्या खड्डय़ात पडली.

या सर्व हालचाली टिपल्या जात होत्या. एक माणूस त्याच्या बॅटरीच्या उजेडात ते सर्व पाहत होता. या इसमाने आम्हाला मदत करण्याचा काडीइतकाही प्रयत्न केला नाही. आम्ही तिबेटचे पठार आता गाठायचेच, मध्ये कुठठे थांबायचे नाही असा एकमेकींना निश्चय बोलून दाखवला आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता सायकली पुढे जोमाने चालवायला सुरुवात केली. थोडय़ाच वेळात समोर आणखी एक चेकनाका आला. इथे मात्र भिंत होती. मध्ये लोखंडी चेन बांधलेली होती. त्य पॉईंटच्या दोन्ही बाजूला बैठय़ा इमारतीही होत्या. पण कुठेही मानवी हालचाल दिसत नव्हती. मेलकडे पाहिले. दोघींच्या मनात एकच विचार आला होता. त्या लोखंडी चेनच्या खालून सरपटत आम्ही ते कुंपण ओलांडून गेलो. सायकली हातांनी ओढून घेतल्या. त्यांच्यावर आरूढ झालो झपाझप पॅडल्स मारू लागलो.

आम्ही तारेच्या कुंपणाखालून निसटलो तेव्हा मेल सफाईने रांगत गेली. माझा मात्र धसमुसळेपणा नडला. डोक्यावरचे शिरस्त्र्ााण त्या लोखंडी पट्टीला घासून गेले. आम्ही सायकली इतक्या बेफाम वेगाने चालवत होतो की रस्त्यात असलेला खड्डा माझ्या ध्यानातच आला नाही. व्हायचे तेच झाले. सायकल खड्डय़ात आणि आम्ही भूमातेला साष्टांग नमस्कार घालण्याच्या पवित्र्यात. पहिल्या प्रथम मला हाताची बोटे बधीर झाल्यासारखी वाटली. पण लवकरच रुधिराभिसरण चालू चाले. मेलने आधार देऊन मला उठवले आणि एकाएकी आमच्या लक्षात आले की आम्ही जो रस्ता निवडला होता तो इतका निर्मनुष्य होता की, तिथे क्वचितच पर्यटक जत असावा.

आता भगवान सहस्रारश्मीने पृथ्वीवर आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. डोंगर आता स्पष्टपणे दृगोच्चर होत होते. पाण्याने बहरलेली नदी दुथडी भरून वाहत होती, पण ते पाणी निर्मळ नव्हते. त्याचा रंग चॉकलेटी होता. त्याकडे पाहिल्यावर मला जाणवले की, आपणास केव्हाची सडकून तहान लागली होती. पाण्याची बाटली काढली पण ती रिकामी होती म्हणून दुसरी बाटली घेण्याकरिता हँण्डबॅगेत हात घातला. पण ती गायब होती. मी शेजारून वाहणाऱया ओढय़ांतून पाणी भरून घेण्याचे ठरवले. बाटली भरून मी मागे वळते न वळते तोच समोर एक निळय़ा युनिफॉर्ममधला चिनी सैनिक, कमालीचा निर्विकार चेहरा करून उभा होता. काहीतरी अगम्य चिनी भाषेत पुटपुटत तो त्याच्या मोटारीकडे गेला. ती मोटार तेथे पूर्वीपासूनच उभी असली पाहिजे, पण माझे लक्षच गेले नव्हते. त्याने त्याच्या मोटारीचे मागचे हूड उघडले. मला खात्री होती की हा माणूस आता बेडय़ा घेऊन आपल्या हातामध्ये लटकवणार. पण आश्चर्याचा धक्का मला बसणार होता. कारण तो माझ्यासमोर उभा ठाकला तेव्हा त्याच्या हातात बेडय़ा नव्हत्या तर तीन लुसलुशीत, ताज्या काकडय़ा होत्या.

‘हॅलो’ – त्याने मला अभिवादन केले आणि भेट म्हणून काकडय़ा पुढे केल्या. मी त्याचे मनापासून आभार मानले. त्याने मान फिरवली. त्याची गाडी स्टार्ट केली आणि क्षणातच दिसेनासा झाला. आम्ही पुढचा प्रवास चालू झाला आणि एक मोठा चढ लागला. रस्त्यावरून सायकली चालवताना आमचा दम घुंटला. आता आम्ही तिबेटच्या पठाराच्या समीप येऊन पोहोचलो होतो. त्या काकडीदान करणाऱया पोलिसाने चौकीवर कळवले असावे, दोन गोऱया मुली येत आहेत. त्या धोकादायक वाटत नाहीत आणि वाटेत आम्हाला तीन पर्यटक भेटले. बेन हा सॅन फ्रॅन्सिस्कोचा. सायकल मेकॅनिक. त्याला मी गेल्या वर्षी आगामी चीन भेटीबद्दल बोलले होते व शक्य झाले तर तिथे येण्याचे निमंत्रणही दिले होते. त्याच्यासोबत फ्लोरियन आणि मटियास हे दोघे जर्मन सायकलपटूही होते. त्यांना आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलोही होती.

त्या तिघांनी रात्री प्रवास करून चेकनाका पार करण्याचा बेत आखला होता. परंतु तेथे असलेल्या शिकारी कुत्र्यांना ते घाबरत होते. म्हणून त्यांनी दिवसा प्रवास केला होता. पोलिसांना त्यांचे परदेशी पासपोर्ट दाखवले. त्यांनी ताबडतोब पुढे जाण्यास परवानगी दिली होती. म्हणजे आम्हीही तसे करू शकलो असतो. उगाचच रात्री तडफडत सायकली चालवत होतो. हे सर्व मागाहून सुचलेले शहाणपण. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुन्हा केव्हा आयुष्यात भेटणार होतो. त्याचा थांगपत्ता नव्हता. मेल आणि मी सायकली चालवत राहिलो. भोवताली निसर्ग भरभरून दान आमच्या पदरात टाकत होता. इतके सृष्टीसौंदर्य प्रत्यक्षात काय पण स्वप्नांतही पाहिले नव्हते. श्वास घ्यायचा, सायकलची पॅडल्स मारायची, पुन्हा श्वास घ्यायचा. हेच सारखे करत होतो. आता शरीरावर धूळ साचायला लागली होती. पण मन स्वच्छ होत होते. कोणतेही विचारही उद्भवत नव्हते. हाच अनुभव शरीरभर पसरून काही अद्भुत अनुभूती देत होता. निष्कर्ष एकच, तुम्ही सायकलवरून दुर्गम, अपरिचित भागात गेलात की तो प्रदेश तुम्हाला चमत्कृतीजन्य वाटतो. पुढे जात राहा. तुम्हीच स्वतःला विसरून जाता व निसर्गाशी एकरूप पाहायला बघता!

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत.)