थोडा अट्टहास सोडूया!

291

>> विक्रम गायकवाड, [email protected]

खूप किमती, परदेशी जातीचा कुत्रा बाळगणं ही अलीकडे एक तथाकथित प्रतिष्ठेची खूण मानली जाते. पण त्या मुक्या जिवांना आपल्याकडचे हवामान खरोखरच मानवते का…?

अजकाल तर मुंबईसारख्या शहरात किंवा हिंदुस्थानातल्या प्रत्येकच छोटय़ा-मोठय़ा शहरात स्टेटस सिंबॉल म्हणून किंवा शेजाऱयानं 20हजार रुपयांचा कुत्रा घेतला तर मी 40 हजार रुपयांचा घेणार या ‘इगो’पायी परदेशी कुत्रे पाळण्याची चढाओढ दिसते. सकाळच्या वेळी उच्चभ्रू वस्तीतून फिरून बघा. पृथ्वीवरच्या सगळ्या जातींचे कुत्रे तुम्हाला बघायला मिळतील, पण आपल्या हौसेपायी त्या जातीच्या कुत्र्याला आपल्याकडचं वातावरण योग्य आहे की नाही याचा कोणीच विचार करत नाही.

गेल्या काही वर्षांत ‘सायबेरियन हस्की’ खूपच दिसू लागले आहेत. ही जात खरं तर फारच गोड, दिसायला रुबाबदार, प्रामाणिक, हुशार. त्यामुळे सायबेरियन हस्कींना जागतिक बाजारात खूप मागणी आहे आणि त्यामुळे ते बऱयापैकी महागही आहेत. याचमुळे ते श्रीमंतांचं आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याचं एक साधनही झालेत. तुम्ही पण कधीतरी ऐकलं असेल की, ‘आम्ही हस्की घेतला 50 किंवा 70 हजाराला (…फक्त). त्याला सेपरेट रूम दिली आहे. त्यात दोन एसी बसवले आहेत.’ पण या अशा कृत्रिम वातावरणात खरंच ते खुश आणि निरोगी राहू शकतात का? 20 अंशापुढे तापमान गेलं की, त्यांचं शरीर प्रचंड गरम होत जातं. त्यांना गुदमरल्यासारखं व्हायला लागतं, पण विकणारे पैशांसाठी आणि विकत घेणारे इगोमुळे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आज संपूर्ण जगात पाळीव प्राण्यांची जी खरेदी-विक्री होते, त्यात 48 टक्के व्यवहार हा फक्त सायबेरियन हस्कींचा होतो. त्यामुळे विक्रेते असं पसरवतात की, हस्की कुठल्याही वातावरणात जमवून घेऊ शकतो. बर्फात राहणारा हस्की हा मुंबईसारख्या दमट वातावरणाच्या ठिकाणीही आता सर्रास दिसतो. एवढंच काय… जयपूरसारख्या ठिकाणीसुद्धा मी सायबेरियन हस्की पाहिले आहेत. हे खरंच अमानुष आहे. ‘सायबेरियन अलास्कन’ या नावावरून तरी कळायला हवं की, त्यांचं शरीर हे आपल्या वातावरणासाठी नाही. इकडच्या वातावरणात ते आतल्या आत गुदमरत असतात आणि मग ते एकाच जागी बसून राहतात. मग मालक तक्रार करतात. आमचा कुत्रा आळशीच आहे किंवा मंदच आहे. पण तो बिचारा स्वतःचं शरीर थंड करायचा प्रयत्न करत असतो आणि त्या बिचाऱया मुक्या प्राण्याला तर स्वतःचा त्रास पण सांगता येत नाही. त्याला जर बोलता येत असतं तर त्याने मालकाला शिव्यांची लाखोली वाहिली असती. मला असं वाटतं की, जर तुम्हाला प्राणी पाळायची हौसच असेल तर आपल्याच राज्यातले पाळा. मी ‘राज्यातले’ अशासाठी म्हणतोय कारण आपला हिंदुस्थानसुद्धा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याचं तापमानसुद्धा वेगळं असतं. आजकाल डाएटमध्ये जसं रिजनल आणि सिजनलवर भर दिला जातो, तसंच पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही झालं तर त्या बिचाऱया बाहेरच्या प्राण्यांचे हाल बंद होतील. आपले गावठी कुत्रे इतके छान वाढतात आणि साथ देतात. विशेष म्हणजे त्यांना कुठल्याही बूस्टरची किंवा स्पेशल फूडची गरज लागत नाही.

विचार करा… उगाच एखाद्या सायबेरियन हस्की किंवा इतर कोणत्या जातीच्या कुत्र्याला त्रास देण्यापेक्षा एखादा आपल्याच मातीतला श्वान तुमची तुमच्याच रक्षणासाठी वाट बघत असेल.

आपली प्रतिक्रिया द्या