विज्ञान-रंजन- धागा… धागा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

‘धागा धागा अखंड विणू या…’ या गीतात जनकवी पी. सावळाराम यांनी छान कल्पना मांडलीय. परवा आशाताईंचं वसंत प्रभू यांनी सुरेल संगीत दिलेलं हे गाणं ऐकताना ते पुन्हा एकदा लक्षात आलं. पी. सावळाराम म्हणतात, ‘अक्षाशांचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे, विविधरंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे, विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरू या!’

…या भक्तिगीतातील विणकर संकल्पनेशी मन थबकलं आणि विचार आला. खरंच, आज जगभर जो कापड उद्योग विविधरंगी झाला आहे त्याची मानवी इतिहासात सुरुवात कधी झाली असेल? त्यामागेही विज्ञान आहेच. वास्तविक आपल्या संपूर्ण जीवनाचा क्षण न् क्षण कळत-नकळत विज्ञानाशीच निगडित आहे. प्रत्येक ‘आर्ट’मागे ‘सायन्स’ आहे हे आपल्या म्हणजे विज्ञानाच्या वापरकर्त्यांच्या सहजी ध्यानात येत नाही. पण विज्ञानाचा थोडा विचार केला तर ते ठायी ठायी दिसून येतं. कलेचा पाया विज्ञान असतं आणि विज्ञानाचं प्रगटीकरण कलेतूनच होतं, अन्यथा ते लोकांना स्वीकारता येणार नाही. उदाहरणार्थ एखादी गाडी काय पिंवा साडी काय, त्यामागील वैज्ञानिक तंत्रज्ञान ठाऊक नसलं तरी त्याचं अंतिम प्रगटीकरण छान असावं असं सर्वांनाच वाटतं. म्हणूनच गाडय़ांची आकर्षक ‘मॉडेल्स’ येत राहतात आणि मनोहारी वस्त्र्ाप्रावरणं तयार होतात. तेव्हा कला आणि विज्ञानात भेद नसून त्यात अद्वैत आहे हे लक्षात आलं तर दोन्ही समजणं सोपं होईल.

विणकामाचं विज्ञान माणसाला, गुहांमधे राहात असल्यापासून सुचलं होतं. हा अश्मयुगीन (पॅलिओलिथिक) काळ आहे. रानावनात राहणाऱया आदिम मानवाने सुरुवातीला वनस्पतींच्या मोठय़ा पानांची ‘वस्त्र’ बनवली, त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य वेलींपासून वल्कलं आकाराला आली. आजही आपण वापरतो त्या आधुनिक वस्त्रांमधले धागे या ना त्याप्रकारे ‘वनस्पतीजन्य’च असतात. कृत्रिम धाग्यांविषयी नंतर विचार करू. सध्या ‘कॉटन’ किंवा सुती कपडय़ांना जगात केवळ मागणीच नव्हे, तर प्रतिष्ठा आहे. हिंदुस्थान अखंड होता तेव्हा बंगाल हे सुती धाग्यांचं जागतिक केंद्र होतं. हातमागावरचे तलम कपडे कारागीर बनवत असत. त्यांच्या काही अतिशयोक्तीपूर्ण कथाही आम्ही लहानपणी ऐकल्या आहेत. एखाद्या पाच-दहा वार तलम कपडा बारीक घडी करून अंगठीतून आरपार जायचा. असं या तलमपणाचं वर्णन केलं जायचं. त्यात तथ्य किती हा मुद्दा बाजूला ठेवला तरी हिंदुस्थानी कपडय़ाची, इथल्या विणकामाची गुणवत्ता किती असायची याचा अंदाज येईल. बरं, ही काही सांगोवांगी गोष्ट नव्हती. जगाची वस्त्रांची बाजारपेठ हिंदुस्थानी वस्त्रांनी सजलेली असायची. आपल्या देशातले सुती आणि रेशमी तसंच लोकरी कपडे संपूर्ण मध्य आशिया आणि युरोपात जायचे. रेशमी वस्त्रांच्या व्यापारात चीनही अग्रेसर असला तरी 1750 पर्यंत जागतिक वस्त्रोद्योगात हिंदुस्थानचा वाटा सुमारे 25 टक्के होता. याचा उल्लेख कार्ल मार्क्सनेही 1853 मध्ये केल्याचं वाचनात आलं. थोडक्यात युरोपात भारतीय कापड लोकप्रिय होतं. आपल्याकडचा 70 टक्के रेशमी कपडा युरोपात आणि विशेषतः नेदरलॅण्डसारखा स्पॅन्डिनेलियन देशात जायचा. अठराव्या शतकात देशात हातमागांची संख्या मोठी होती. महेश्वरला, पुष्पश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला हातमाग व्यवसाय आजही चालतो.

आपल्या देशात पुरातन काळापासून अध्वरीय आणि उत्तरीय अशी वस्त्रं स्त्री-पुरुष सर्वच वापरत. हा कपडा नेसावा लागायचा. त्यामुळे हल्ली सरसकट साडी आणि धोतर ‘घालणे’ असा शब्दप्रयोग केला जातो तो बरोबर नाही. शिवलेला कपडा, शर्ट-पॅन्ट वगैरे अंगात ‘घालता’ येतो. अखंड वस्त्र नेसता येतं. क्वचित अंथरुण-पांघरुण म्हणूनही प्रवासात त्याचा वापर करता येतो. शिवलेल्या कपडय़ांचं तसं करता येत नाही हा फरक लक्षात घ्यायला हवा.

आपल्या देशातील विपुल कापूस उत्पादन, सूत तयार करण्यासाठीचं अनुकूल हवामान यामुळे आपण जगाला वस्त्र (कपडा) पुरवतो. विदेशी जीन्ससुद्धा आशियाई देशातून शिवून घेतल्या जातात. सुरुवातीला हाताने कापसाच्या पेलूतून धागा काढणं. मग टकली, चरखा असं करत करत हातमागापर्यंतची उत्क्रांती झाली. इथपर्यंत जगावर आपल्या वस्त्रोद्योगाचं वर्चस्व राहिलं. नंतर मात्र युरोपात यंत्रयुग अवतरलं. विजेचा शोध लागला. पावरलूम सुरू झाल्या आणि लुटारू इंग्रज सरकारने इथला विणकरांचा धंदा नष्ट करून कापूस हा कच्चा माल इंग्लंडला नेऊन मॅन्चेस्टरच्या कारखान्यातून तयार कपडा परत इथे आणून भरपूर नफा कमावला. पुढे आपल्याकडच्या टाटांसारख्या अनेक उद्योजकांनी काळाची पावलं ओळखून अनेक कापड गिरण्यांची निर्मिती केली. मुंबई हे जगातलं मोठं कापड-उत्पादक केंद्र बनलं. आज त्याचं काय झालं हा वेगळा इतिहासच आहे. पण या देशातल्या सुती, रेशमी, लोकरी, ज्युट यापासून बनवलेल्या कपडय़ाने शेकडो वर्षं जगाची वस्त्रांची गरज पुरवली हे विसरता येणार नाही. सुतावरून स्वर्ग नसेल, पण त्यातील वैज्ञानिक संशोधनातून आणि प्रगतीतून जागतिक बाजारपेठ गाठता येते एवढं मात्र नक्की!