>> विष्णू मनोहर
गायिका सावनी रवींद्र. शाकाहार आणि घरचा स्वाद ही सावनीची खरी आवड.
सावनी रवींद्र एक आघाडीची गायिका तेवढीच शाकाहारी, चटकमटक खाण्याची शौकिन. मराठीबरोबरच तिन्ही तेलगू, तामीळ सिनेमांमध्येसुद्धा आपल्या गाण्याचा ठसा उमटवलेला आहे. तिचे बरेच अल्बम आणि सिनेमाची गाणी गाजलेली आहेत. त्यातला ‘कॅन्व्हास’ हा अल्बम बराच प्रसिद्ध आहे. मराठीपेक्षा साऊथमध्ये तिचे बरेच चाहते आहेत. बेसिक संगीताचे शिक्षण तिने आपले वडील डॉ. रवींद्र घांगुरडे आणि अभिनेत्री, गायिका वंदना घांगुरडे यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर पंडित यशवंत देव यांच्याकडे रीतसर शिक्षण घेतलं. एका मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने तिची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली आणि मुळात खाण्याची शौकिन त्यातच ती शाकाहारी असल्यामुळे आमच्या गप्पा रंगल्या.
सावनीला शाकाहारी वरण, भात, भाजी-पोळी यासारखं रोजचं जेवण आवडतं. याशिवाय थाय प्रकारचं शाकाहारी जेवणं तिला बनवायला व खायला आवडते. पुण्यात जन्मली असल्यामुळे पुणेरी मिसळ ही तिची फार आवडती डिश. तिची आई आणि आजी उत्तम स्वयंपाक बनवितात. तिला जेव्हा विचारलं स्वयंपाक करायला आवडतो का? तर ती म्हणाली, मी खूप आवडीने स्वयंपाक करते. माझी आई व आजी सुगरण असल्यामुळे स्वयंपाक बनवणे मी त्यांच्याकडून शिकले आणि आता कामाच्या व्यापामुळे सासूबाईच्या हातचं आयतं जेवायला मिळते. थाय पदार्थाबरोबरच तिला फोडणीचा भात, फोडणीची पोळी, उकडपेंडी इत्यादी पदार्थ आवडतात आणि पोहे बनवायला लावलं तर अर्ध्या रात्रीसुद्धा उठून ती बनवू शकते, इतके तिला पोहे आवडतात.
बाहेर देशात कार्यक्रम असताना मात्र तिला जेवणाची अडचण जाते. कारण शाकाहारी जेवण मिळायला त्रास होतो. एकदा दोन महिने अमेरिकेच्या दौऱयावर असताना साधं मराठमोळं जेवण मिळालं नाही. शेवटचा कार्यक्रम जिथे होतो त्यांच्याकडे तरी आपल्याला मराठी जेवण मिळेल अशी तिला आशा होती. त्यांच्या घरी गेल्यानंतर एकूण वातावरण पाहता साधं जेवण मिळेल असं तिला वाटलं नाही. पण काय आश्चर्य त्या घरातल्या आजी बाहेर येऊन तिला म्हणाल्यात की, काय गं पोरी आमटी भात केला तरं चालेल नं? ते ऐकल्याबरोबर सावनीला इतका आनंद झाला की दोन महिन्यांचा थकवा एका क्षणातच निघून गेला.
फावल्या वेळात काय करते असं विचारल्यावर तिने प्रामाणिकपणे सांगतिलं की, मी विष्णू मनोहरांच्या मास्टर रेसिपी यूटय़ूब चॅनलवर पाहात असते. तिच्या मते स्वयंपाक करणं किंवा रेसिपी शो बघणं हे एक थकवा घालवण्याचं साधन आहे. तुमच्याच यूटय़ूब चॅनल बघून मी आतापर्यंत 4-5 वेळा पनीर-बटर मसाला बनवला आणि माझ्या नवऱयाला तो प्रचंड आवडला.
गप्पा रंगल्या असतानाच डायरेक्टरने बोलावले, पुढच्या वेळी भेटल्यावर पोहे खिलवण्याचं प्रॉमिस करून आमची भेट संपली.
मिसळ पाव
साहित्य – 3 वाटय़ा मोड आलेली मटकी , 4 कांदे लाल मोठे , 2 वाटय़ा ओले खोबरे, 1 वाटी सुके खोबरे, 3 इंच आल्याचा तुकडा, 1 लहान लसणाचा कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 चमचे कोल्हापुरी चटणी, 1 चमचा गरम मसाला, 2 चिरलेले बटाटे, मीठ, हिंग, हळद, तिखट चवीनुसार, 2 ब्रेड, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी कोथिंबीर, 1 लिंबू, 2 चमचे फरसाण.
कृती – पातेल्यात तेल तापवून त्यात हिंग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी, तिखट, मीठ घालून शिजवावे. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कांदे बाजूला ठेवून उरलेला कांदा खोबरे (दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटवा. आलं, लसूण, कोथिंबीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून हिंग हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कांदा कोल्हापुरी चटणी टाकावी. परतल्यावर दोन्ही वाटण घालून पुन्हा चांगले परतावे. त्यात मीठ आणि 4 कप पाणी घालून उकळी आणावी. घेताना एका खोलगट प्लेटमध्ये 2 मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कांदा, कोथिंबीर घालून मग 1 पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. लिंबू पिळून ब्रेड बरोबर खावे.
उकडपेंडी
साहित्य – 2 वाटय़ा कणीक, 1 चमचा मोहरी, 1 चमचा चिरलेला लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेला कांदा , पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट,अर्धा चमचा आमचूर, चवीनुसार मीठ, साखर, थोडीशी कोथिंबीर
कृती ः- साधारण 2 वाटय़ा कणकेची उकडपेंढी 6-7 लोकांना पुरेल. कढईत तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची व कांदा घालून चांगले परता. नंतर त्यात हळद, तिखट व कणीक, थोडेसे आमचूर, मीठ, साखर घालून खमंग होईस्तोवर परतून गरम पाणी घाला. एक वाफ येऊ द्या. नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
फोडणीची पोळी
साहित्य – 10-12 तयार शिळय़ा पोळय़ा, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2 चमचे बारीक चिरलेली मिरची, 1 वाटी चिरलेला कांदा, मीठ, 1 लिंबू, चवीनुसार साखर, 4 चमचे कोथिंबीर.
कृती – पोळय़ांना कुस्करून चुरा करून घ्या. एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालून त्यात हिरव्या मिरची, हळद, तिखट घालून चांगले परतून घ्या. नंतर तयार पोळय़ांचा चुरा घाला. चवीनुसार मीठ, लिंबू, साखर घालून थोडा पाण्याचा शिबका मारा व एक वाफ येऊ द्या. नंतर गरम गरम खायला द्या.




























































