
>> विठ्ठल देवकाते
हिंदुस्थानी क्रीडाक्षेत्राचा मागोवा घेतला तर काही व्यक्तिमत्त्वे अशी दिसतात, ज्यांनी मैदानावर न उतरताही देशाच्या क्रीडाक्षेत्राचा चेहरामोहरा बदलला. सुरेश कलमाडी हे त्यातीलच एक महत्त्वाचे नाव! त्यामुळे सुरेश कलमाडी यांची ‘एण्ट्री’ होताच ‘सबसे बडा खिलाडी… सुरेश कलमाडी’ असा जयघोष घुमायचा. खेळांचा राजा असलेल्या अॅथलेटिक्सला देशात रुजविणे, क्रीडा संघटनांना दिशा देणे आणि हिंदुस्थानला जागतिक क्रीडा नकाशावर झळाळी मिळवून देणे या तिन्ही पातळय़ांवर कलमाडी यांचे योगदान ठळकपणे दिसून येते. त्यांचा प्रवास हा हिंदुस्थानी क्रीडा प्रशासनाचा एक महत्त्वाचा अध्याय ठरतो. देशाच्या क्रीडाक्षेत्रासाठी बहुमोल योगदान देणारे सुरेश कलमाडी यांचे आज 6 जानेवारी रोजी भल्यापहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यानिमित्त दैनिक ‘सामना’ने त्यांच्या क्रीडा कारकीर्दीचा आढावा घेत ही लेखरूपी विशेष श्रद्धांजली वाहिली.
1987पासून ‘अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सुरेश कलमाडी यांनी केवळ संघटनात्मक बदल केले नाहीत, तर खेळाच्या मुळाशी जाऊन काम करण्याची भूमिका घेतली. स्पर्धांचा विस्तार, खेळाडू निवडीतील पारदर्शकता, प्रशिक्षक व्यवस्थेची उभारणी आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. याच काळात हिंदुस्थानी अॅथलेटिक्सला नवी ओळख आणि दिशा मिळू लागली, असे म्हटल्यास नक्कीच वावगे ठरणार नाही.
1996 पासून तब्बल 16 वर्षे हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशातील क्रीडा प्रशासनाची सूत्रे सांभाळली. हा काळ हिंदुस्थानी क्रीडासंस्कृतीसाठी संक्रमणाचा होता. हा काळ केवळ पदाचा नव्हता, तर धोरणात्मक निर्णयांचा होता. खेळाडूंना फक्त स्पर्धेसाठी पाठवायचे नाही, तर तयारीसह पाठवायचे ही भूमिका कलमाडींच्या काळात रुजली. परिणामी, ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा वाढताना दिसला. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, प्रशिक्षण आणि अनुभव मिळवून देण्याचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. याच दरम्यान 2000 पासून ‘एशियन अॅथलेटिक्स असोसिएशन’चे अध्यक्षपद भूषविताना आशियातील अॅथलेटिक्सच्या विकासातही कलमाडी यांनी हिंदुस्थानचा आवाज अधिक बुलंद झाला.
क्रीडा आयोजन हे केवळ मैदान उभारण्यापुरते मर्यादित नसते, तर ते देशाच्या व्यवस्थापन क्षमतेचे दर्शन घडविते. 2008 मध्ये पुण्यात झालेली राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि 2010 मध्ये नवी दिल्लीत पार पडलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून हिंदुस्थानही भव्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करू शकतो हा आत्मविश्वास कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाला. याशिवाय पुणे, बंगळुरू, मणिपूर, पंजाब, हैदराबाद, गुवाहाटी आणि झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच 2003 मधील ‘आफ्रो-एशियन गेम्स’ या स्पर्धांच्या यजमानीमुळे देशातील पायाभूत क्रीडासुविधांना नवे बळ मिळाले.
कलमाडी यांचे कार्य केवळ उच्चपदस्थ कार्यालयांपुरते मर्यादित नव्हते. अॅथलेटिक्सची क्रीडासंस्कृती देशात रुजविणे हेच त्यांच्या कार्याचे पेंद्रबिंदू राहिले. ग्रामीण भागांपासून महानगरांपर्यंत स्पर्धांची साखळी उभी राहत गेली. त्यातून हजारो तरुण खेळाडूंना संधी मिळाली. अनेकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले.
वादविवाद, टीका आणि राजकीय संघर्ष यांचा काळही त्यांच्या वाटय़ाला आला, मात्र त्या सगळय़ांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर हिंदुस्थानी क्रीडाक्षेत्राला व्यवस्थापन, आयोजन आणि अॅथलेटिक्सच्या पायाभरणीच्या दृष्टीने जे व्यापक व्यासपीठ मिळाले त्यात सुरेश कलमाडी यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. देशपातळीपासून पुण्यापर्यंत क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा आणि अॅथलेटिक्स आयोजनांची साखळी उभी राहण्यात सुरेश कलमाडी यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानने केवळ खेळाडूच नव्हे, तर जागतिक दर्जाचा क्रीडा यजमान म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली. त्यामुळे प्रशासक, आयोजक आणि अॅथलेटिक्सचा शिल्पकार म्हणून सुरेश कलमाडी यांचे नाव हिंदुस्थानी क्रीडा इतिहासात कायम वाचले जाईल, एवढे नक्की!
पुण्याला ‘क्रीडानगरी’ बनविले
पुणे शहराच्या क्रीडाविकासात सुरेश कलमाडी यांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे हेच त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र होते. पुण्याला देशातील ‘मॅरेथॉनची जननी’ म्हणतात. ही ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ची मुहूर्तमेढ सुरेश कलमाडी यांनीच 1983 मध्ये रोवली. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी होणाऱया पुण्यातील या ‘मॅरेथॉन महोत्सवा’ला यंदा 39 वर्षे पूर्ण झाली आहेत. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील एकाच छत्राखाली असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध स्टेडियम्स जगभरातील खेळाडूंना भुरळ घालतात. ते अत्याधुनिक सुविधांनी सजलेले क्रीडा संकुलदेखील सुरेश कलमाडी यांच्यामुळेच उभे राहिले आहे. ‘एशियन अॅथलेटिक्स असोसिएशन’च्या अध्यक्षपदी असताना कलमाडी यांनी अनेक मोठय़ा स्पर्धांचे आयोजन पुणे शहरात केले. 2008 मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेमुळे संपूर्ण शहर क्रीडामय झाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने दिल्लीहून आलेल्या बॅटन रिलेने पुणे शहर उजळून निघाले होते. त्यामुळे पुण्यातील क्रीडासंस्कृती वाढविण्यामध्ये कलमाडी यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. शैक्षणिक आणि औद्योगिकनगरी असलेल्या पुण्याला कलमाडी यांच्यामुळे ‘क्रीडानगरी’ म्हणून न































































