लोकनेता – मी माधुरी दीक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल मणियार

पवारसाहेबांची एखाद्याशी ओळख झाली किंवा भेट झाली की त्या व्यक्तीला ते विसरत नाहीत. काही वर्षे उलटली तरी नावाने हाक मारतात किंवा ओळखतात. महाराष्ट्रातल्या गावोगावी होणाऱया सभांमध्ये पवारसाहेब भाषणातून सभेत उपस्थित असणाऱया गावखेडय़ातील लोकांची नावे घेऊन सभांचा फड गाजवतात. खरे तर ही त्यांची खासियत. साहेब एवढे सगळे लक्षात कसे ठेवतात, हादेखील उत्सुकतेचा विषय ठरायचा. अनेक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती ज्या आपण नेहमी फोटो, चित्रपट किंवा अन्य माध्यमातून पाहत असतो त्या एकमेकाला ओळखत असल्याच पाहिजेत, असा आपला एक समज असतो. परंतु अशा व्यक्ती एकमेकांना ओळखत किंवा त्यांचा सुपरिचय असतो या म्हणण्यात मात्र तथ्य नसते अशा दोन प्रसिद्ध व्यक्ती समोरासमोर आल्यानंतर असा प्रसंग घडला तर काय होईल? खुद्द शरद पवार यांनीच सांगितलेला एक किस्सा. पवारसाहेब दिल्ली-मुंबई विमान प्रवासात होते. विमानातही फायली व कागदपत्रे पाहण्याची त्यांना सवय आहे. त्याही दिवशी ते अशाच फायली पाहण्यात गर्क असताना एक तरुणी त्यांच्याकडे आली. साहेबांना नमस्कार करून या तरुणीने त्यांचे क्षेमकुशल विचारले. साहेबांनीही तिची विचारपूस केली. थोडा वेळ इकडच्या- तिकडच्या गप्पाही झाल्या. ती तरुणी निरोप घेणार तेव्हा साहेबांनी विचारले, ‘आपण काय करता?’ इतका वेळ गप्पा झाल्यानंतर आलेल्या या प्रश्नाने क्षणभर शांतताच पसरली. ती तरुणी म्हणाली ‘मी माधुरी दीक्षित’! हे उत्तर देताना तिचा आणि ते ऐकताना साहेबांचा चेहरा कसा झाला, हे त्या दोघांनाच माहिती. संध्याकाळी पवारसाहेब मुंबईत पोहोचले. घरी जेवणाच्या टेबलवर ते, वहिनी आणि सुप्रिया एकत्र होते. साहेबांनी विमान प्रवासातील किस्सा सांगितला. क्षणभर हशा उसळला आणि एरवी अत्यंत ‘अपडेटेड’, माणसांची ओळख न विसरणारे म्हणून प्रसिद्ध असणाऱया साहेबांना सुप्रिया म्हणाली, ‘काय बाबा, तुम्ही माधुरीला ओळखले नाही?