
>> विवेक दिगंबर वैद्य
लौकिकदृष्ट्या श्रीदत्तात्रयांच्या ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ अवताराची समाप्ती झाली तरीही ‘भक्तरक्षणाकरिता व उद्धाराकरिता आपण गुप्तपणे नांदत आहोत’ याचा दाखला श्रीपाद श्रीवल्लभांनी गत अवतारामध्ये, ज्या ब्राह्मण स्त्रीला शनि प्रदोष व्रताचे आचरण करण्यास सांगितले होते तिला तिच्या पुढील जन्मी दिला. पुत्रप्राप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर ती स्त्री वऱहाडातील कारंजा (लाडाचे कारंजे) अंबाभवानी या नावाने जन्म घेती झाली. यथावकाश तिचा विवाह त्याच गावातील शिवव्रती माधव या ब्राह्मणाशी झाला. तिला जे पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव नरहरी ठेवण्यात आले. हे बालक म्हणजेच द्वितीय दत्तावतार ‘श्रीनृसिंह सरस्वती स्वामी’.
जन्मतः हे बालक ‘ॐ’काराचा उच्चार करू लागले. ही अलौकिक घटना पाहण्यास नगरजनांची अलोट गर्दी होऊ लागली. मात्र हे बालक कालांतराने ॐ काराशिवाय अन्य कोणताही शब्द उच्चारत नसल्याचे लक्षात आल्याने त्याचे मातापिता चिंतित झाले. तेव्हा नृसिंहाने ‘मी मुका नाही, माझे मौजीबंधन झाल्यानंतर मी बोलू लागेन. आपण चिंता करू नये.’ असे खुणेने सूचित केले. योग्य वेळी योग्य मुहूर्तावर त्याची मुंज झाली तेव्हा नृसिंहाला जेव्हा गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला, त्यानंतर भिक्षाग्रहणाच्या वेळी नृसिंहाने वेदोच्चार केला. हे बालक साधेसुधे नसून देवावतार असल्याचे सर्वांनाच कळून आले. मुंज झाल्यावर नृसिंहाने मातापित्याकडे तीर्थयात्रेस जाण्याची अनुज्ञा मागितली. माता अंबाभवानीने तसे करण्यास नकार दिला तेव्हा नृसिंहाने तिला मागील अवताराचे स्मरण करून दिले तेव्हा मात्र तिने नृसिंहास तीर्थयात्रेस जाण्याची अनुज्ञा दिली. नृसिंहाने मातेस ‘तुला चार पुत्र होतील. दोन पुत्र होईपर्यंत मी येथे राहीन’ हे आश्वासन दिले. ‘ईश्वरेच्छा बलीयसी’ या न्यायाने पुढे अंबाभवानीला वर्षभरात जुळे पुत्र झाले. त्यानंतर मात्र नृसिंह काशीयात्रेस निघून गेला.
नृसिंह काशी येथे वर्णाश्रमधर्मानुसार आचरण करू लागला. त्याचे शास्त्रोक्त आचरण पाहून तेथील संन्याशांना आनंद झाला व त्यांनी वयोवृद्ध व तपोवृद्ध अशा अधिकारी श्रीकृष्णसरस्वतींमार्फत नृसिंहाने संन्यास घ्यावा असा आग्रह केला. त्यानुसार नृसिंहाने कृष्णसरस्वतींकडून संन्यास दीक्षाग्रहण केली आणि पुढील काळात तो ‘श्रीनृसिंहसरस्वती’ नावाने ओळखला जाऊ लागला.
श्रीनृसिंहसरस्वती यांनी काही काळ काशीत वास्तव्य केले. दरम्यान अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुढे या शिष्यांसहित ते उत्तरेस यात्रेला निघाले. अनेक वर्षांचे भ्रमण घडल्यानंतर ते पुन्हा जन्मगावी कारंजा येथे आले. काही काळ राहिले आणि पुन्हा भ्रमणसंचाराकरिता निघाले हे पाहून मातेचे अंतःकरण पिळवटून आले. तिला शांत करताना श्रीनृसिंहसरस्वती यांनी आपल्या घराच्या माडीतील भिंतीवर जल शिंपडले व तिला सांगितले की, ‘जेव्हा मला भेटण्याची इच्छा होईल तेव्हा निरांजन लावून प्रेमळ अंतःकरणाने या भिंतीकडे पहा म्हणजे तुला माझे दर्शन घडेल.’ श्रीनृसिंहसरस्वती यांच्या वचनाची साक्ष देणारा हा वाडा आणि वाड्यातील भिंत आजही आपण कारंजा येथील श्रीनृसिंहसरस्वती यांच्या जन्मस्थळापाशी पाहू शकतो. अकोला, अकोट, मूर्तिजापूर, शेगाव येथून हे स्थान जवळ आहे.
श्रीनृसिंहसरस्वती मार्गक्रमण करीत विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत, भक्तांसोबत विविध लीलाप्रसंग घडवीत कोल्हापूर करवीर प्रांती भिल्लवडीनजीक औदुंबरक्षेत्री आले. येथे त्यांनी एक चातुर्मास वास्तव्य केले. औदुंबराच्या पूर्वेस नदीच्या दुसऱ्याऱ्या तीरावर श्रीभुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. भुवनेश्वरी आणि कृष्णेच्या पात्रात बुडालेला सिद्धमठ ही दोन पुरातन स्थाने येथे आहेत. प्राचीन काळी सिद्धमठात मूळमाधव नावाचा सिद्धपुरुष राहत असे. कृष्णदयार्णव नामक सतराव्या शतकातील संतकवीच्या एका शिष्याचा मठ या नदीपात्रात लुप्त झाला आहे. भुवनेश्वरी देवी मात्र अजूनही येथील मंदिरात उभी आहे. मंदिराचा गोपूर प्रेक्षणीय असून बांधणी दगडी आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ आहे.
श्रीनृसिंहसरस्वती यांनी भुवनेश्वरीच्या मंदिरातील ब्राह्मणावर कृपा केली आणि त्यानंतर ते नरसोबाची वाडी येथे आले. कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमस्थानावरील गर्द जंगलात रामचंद्र नामक तपस्वी श्रीनृसिंहसरस्वती यांच्या दर्शनाकरिता उग्र तपश्चर्या करीत होते. महाराजांनी त्यांचा हेतू पूर्ण करून त्यांना त्याच्या इच्छेनुसार समाधीबद्ध केले. श्रीरामचंद्रयतींची समाधी श्रीनृसिंहसरस्वती यांच्या पादुकास्थानाच्या पश्चिमेस आहे. श्रीनृसिंहसरस्वती यांचे वास्तव्य वाडी येथे असताना चौसष्ट योगिनी त्यांना आरती ओवाळण्याकरिता प्रत्यक्ष येत असल्याचे दृश्य एका शेतकऱ्याने पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला होता असे वर्णन श्रीगुरूंच्या चरित्रामध्ये करण्यात आले आहे.
अमरापूरच्या दक्षिणेस राहणाऱ्या बहिरंभट या ब्राह्मणावर अनुग्रह करून ‘मी येथे लोककल्याणार्थ मनोहर पादुका ठेवतो, त्याची पूजा तू वंशपरंपरेने करावी.’ असा आशीर्वाद देऊन आणि गुरुद्वादशीच्या या तिथीस त्याच्याकडून शेवटची भिक्षा घेऊन श्रीनृसिंहसरस्वती गुप्त झाले. या कारणास्तव नरसोबाच्या वाडीस गुरुद्वादशी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. वाडी येथून जाण्यापूर्वी श्रीनृसिंह सरस्वती एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेस गेले असता त्याच्या दारी असलेला घेवड्याच्या शेंगांचा वेल त्यांनी उपटून टाकला. आपल्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेला वेल स्वामी महाराजांनी उपटला याचे ब्राह्मणास दुःख झाले. मात्र पूर्वसंचितानुसार बऱ्यावाईट गोष्टी आपल्या नशिबात येत-जात राहतात तेव्हा याकरिता ईश्वराला दोष देण्यात अर्थ नाही, अशी स्वतःच्या मनाची समजूत घालून त्या ब्राह्मणाने घेवड्याच्या वेलीचे शिल्लक राहिलेले मूळ काढून फेकण्यासाठी जमीन खणली तेव्हा तिथे सुवर्णमोहरांनी भरलेला हंडा त्याला सापडला.
श्रीऔदुंबर आणि श्रीनरसोबाची वाडी ही दोन्ही पवित्र-पावन स्थाने कृष्णपंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेली असून श्रीदत्तसंप्रदायामध्ये विलक्षण महत्त्व राखून आहेत. मार्गशीर्ष महिन्यात आणि श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने येथे श्रीदत्तभक्तांची नेहमीच अलोट गर्दी उसळते.
श्रीऔदुंबर आणि श्रीनरसोबाची वाडी ही दोन्ही पवित्र-पावन स्थाने कृष्णपंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेली असून श्रीदत्तसंप्रदायामध्ये विलक्षण महत्त्व राखून आहेत. मार्गशीर्ष महिन्यात आणि श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने येथे श्रीदत्तभक्तांची नेहमीच अलोट गर्दी उसळते.




























































