>> विवेक दिगंबर वैद्य
शके अठराशे, बहुधान्य संवत्सर, चैत्र मास, वद्य पक्ष, मंगळवार, चतुर्दशी तिथी, चौथ्या प्रहरी, शुभकाळी अक्कलकोट गावातील भव्य अशा वटवृक्षाखाली श्रीस्वामीसमर्थांनी देह विसर्जीत केला. पुढे श्रीसमर्थांनी पूर्वी भाकीत केल्यानुसार, त्यांचा चैतन्यमय देह अपूर्व उत्कृष्ट समारंभ करून चोळाप्पांच्या घरी आणण्यात आला आणि बुधवार पेठेतील या ब्रह्मानंदगुहेत श्रीस्वामीसमर्थ निजानंदी अखंड राहिले. पुढे श्रीसमर्थकृपेने पाच खणी लाकडी बांधणीचा भव्य सभामंडप बांधण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी, ललिता पंचमीस (23 सप्टेंबर 1857) श्रीस्वामीसमर्थ पहिल्यांदा अक्कलकोट येथे दाखल झाले व पुढे त्यांचा मुक्काम बुधवार पेठ येथील चोळाप्पा नाईक यांच्या घरी झाला. श्रीस्वामीमहाराजांचे प्रारंभिक वास्तव्य चोळाप्पांच्या घरी झाले व त्यांची समाधीदेखील चोळाप्पांच्या घरीच झाली आणि हेच त्या पुण्यफलदायी वास्तूचे ‘स्थान’माहात्म्य आहे. ब्रह्मांडनायक ही ओळख लाभलेले श्रीस्वामीसमर्थ महाराज सन 1878मध्ये निजानंदी निमग्न झाले आणि चोळाप्पांच्या घरी कायमस्वरूपी देहरुपाने विसावले.
श्रीस्वामीसमर्थांचे बुधवार पेठेतील आगमन, वास्तव्य आणि समाधीस्थान अशा सर्व लीला चोळाप्पांच्या वास्तूने पाहिलेल्या, अनुभवलेल्या आहेत. या वास्तूमध्ये श्रीस्वामीसमर्थांचे उत्तम स्थान व्हावे या हेतूने चोळाप्पा यांनी पुढाकार घेतला त्यास अक्कलकोट संस्थान, पुणे-मुंबई येथील भक्त, श्रीपादभट यांसारखे सेवेकरी अशा सर्वांचे पाठबळ लाभले व सन 1868च्या आसपास, श्रीस्वामीसमर्थांच्या आज्ञेनुसार एका सुमुहूर्तावर पाया खोदून या शुभकार्याचा प्रारंभ झाला. काही वर्षांतच गाभाऱयासह अपूर्व देवालय तयार झाले. देवालयाच्या खाली गुहा बांधण्यात आली. या स्थानी श्रीस्वामी साक्षात एक प्रहर राहिले आणि म्हणाले, ‘‘हे आमचे योगसमाधीसुखाचे आद्य व प्रिय स्थान आहे.’’
ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वांबोरीकर विरचित ‘श्रीगुरुलीलामृत’ ग्रंथातील 35व्या अध्यायाच्या ओवी क्र. 6 ते 176मध्ये या समग्र घटनेचे वर्णन आलेले आहे. वामनबुवा म्हणतात, ‘‘प्रख्यात ग्रामजोशी बाळकृष्ण यांनी सुमुहूर्त काढून दिला त्यानुसार देवतास्थापनेकरता सर्वानुमते शुद्ध, सिद्ध मुहूर्त निश्चित करण्यात आला. शालिवाहन शके 1795, ‘श्रीमुख’ संवत्सर, उत्तरायण, शिशिरऋतू, माघ मास, शुक्ल पक्षात माघ शुद्ध दशमी, मंगळवारी ध्रुव रोहिणी नक्षत्रावर वेदाचार्यांनी अधिवासन करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यज्ञकुंड मंडपास प्रारंभ केला. माघ शुद्ध पौर्णिमेस त्रयमूर्तीची मुखकमले कोनाडय़ात उच्चस्थानी सन्मुख मांडून त्यापाशीच काळ्या पाषाणात घडविलेल्या श्रीस्वामी पादुका स्थापन केल्या. त्यांच्या निकट डाव्या बाजूस मयूरेश्वर सिद्धिविनायक व उजव्या बाजूस ‘आम्रकोटेश्वर’ लिंग स्थापन केले. वेद-मंत्राचे घोष, स्तोत्रे, जयजयकार चालू होते. वाजंत्री, भेरी, मृदंग, झांजा यांचे नाद होत होते. नगारे, तुताऱया, ढोलक, वीणा वाजत होत्या. विविध गायक संस्कृत, मराठी, कानडी भाषेत स्तोत्रे, भजने गात होते. श्रीस्वामींचा अखंड जयजयकार दुमदुमला होता. तेव्हा काही काळ खाली गुहेत बसलेले श्रीस्वामीमहाराज जेव्हा बाहेर आले तेव्हा उपस्थित विद्वान, साधुसंत, सेवेकरी व दर्शनाथन्नी श्रीस्वामीनामाचा गजर केला. डंके वाजू लागले, निशाणे फडकली, ध्वजा, पताका, तोरणे आनंदाने डोलू लागली. श्रीस्वामींच्या नामगजरात वेदमंत्रोच्चारण झाले. साक्षात श्रीस्वामीमुखातून वेदमंत्र प्रकट झाल्याने ते मंत्र अर्थपूर्ण झाले आणि हे अनुभवणाऱया श्रोत्यांच्या मनात परमानंद दाटला.’’
या सोहळ्याच्या निमित्ताने श्रीस्वामीसमर्थांनी भक्तश्रेष्ठ चोळाप्पांच्या वास्तूत स्थापन झालेल्या या अद्वितीय स्थानाचे माहात्म्य कथन करताना सांगितले, ‘‘आद्य वेदमंत्रांनी सिद्ध झालेल्या या प्रिय देवस्थानात येऊन, वास्तव्य करून, जे जप-यज्ञ-तप-अनुष्ठान, ब्राह्मण संतर्पण, समाराधना करतील. आम्रकोटेश्वराची आराधना, मंगलमूर्ती मयूरेश्वराची सेवा व निजपादुकांचे यथासांग पूजन करतील. वेदमंत्राचे नित्य पठण वा गुरुचरित्रादी ग्रंथाचे पारायण, शुद्ध अंतःकरणाने इष्ट मंत्राचे पुरश्चरण करतील त्यांना कोटिगुण फळ मिळेल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. येथील कुशावर्त तीर्थात (चोळाप्पांच्या अंगणातील बावडी) स्नान करून जे तीर्थ घेतील ते रोग, संकट, दुःखमुक्त होतील व पुण्यपावन होतील. या वास्तूच्या तळघरातील स्थान हे आमचे प्रिय निवासस्थान आहे. अपरिमित समाधान देणारी, निर्विकार, जीवब्रह्मैक्य साधणारी अशी जी अखंड समाधी सांगितली जाते त्या अद्वैत परमामृत समाधीचे हे आमचे एकांत निवासस्थान आहे. या जैन चोळाप्पाच्या घरात मी राहिलो व अखेरीस हे शरीर या ब्रह्मानंद गृहेत ठेवून गुप्त रूपाने भक्त-सेवकांचे मनोरथ सदोदित पूर्ण करेन. कार्यानिमित्त आम्ही इतर ठिकाणी गेलो तरी सदैव येथेच असतो. आम्ही सर्वव्यापी असलो तरी शुद्ध अंतःकरणात प्रकट होतो.’’ असा बोध करून श्रीस्वामींनी सर्वांचे समाधान केले. त्यामुळे सर्व विद्वज्जन आणि अन्य सर्व संतुष्ट झाले. पुढे श्रीसमर्थांच्या आज्ञेने सर्वांना श्रीफल, प्रसाद, विडे देण्यात आले आणि पुढे उत्तम आखणी केलेल्या भोजन समारंभामध्ये शेकडो उपस्थित भाविक महाप्रसाद घेऊन तृप्त मनाने माघारी परतले.
शके अठराशे, बहुधान्य संवत्सर, चैत्र मास, वद्य पक्ष, मंगळवार, चतुर्दशी तिथी, चौथ्या प्रहरी, शुभकाळी अक्कलकोट गावातील भव्य अशा वटवृक्षाखाली श्रीस्वामीसमर्थांनी देह विसर्जीत केला. पुढे श्रीसमर्थांनी पूर्वी भाकीत केल्यानुसार, त्यांचा चैतन्यमय देह अपूर्व उत्कृष्ट समारंभ करून चोळाप्पांच्या घरी आणण्यात आला आणि बुधवार पेठेतील या ब्रह्मानंदगुहेत श्रीस्वामीसमर्थ निजानंदी अखंड राहिले. पुढे श्रीसमर्थकृपेने पाच खणी लाकडी बांधणीचा भव्य सभामंडप बांधण्यात आला. उजवीकडे सहा खणी दुमजली जागा बांधून चौघडादी वाद्ये आणि सभामंडपात नगाऱयाची सोय झाली. या ब्रह्मानंदगुहेपाशी दक्षिणेस, स्वतः श्रीस्वामीमहाराजांनी स्वहस्ते लावलेल्या औदुंबर कल्पवृक्षाच्या पारावर त्यांनीच दगडी पादुका आणि देवतांचीही स्थापना केलेली आहे. तिथून जवळच श्रीस्वामीसमर्थांच्या प्रिय कपिलागायीचे आणि श्रीस्वामींचे एक निस्सीम भक्त महारुद्रराव तथा नानासाहेब देशपांडे (केजकर) यांचेदेखील समाधीस्थान आहे.
ब्रह्मानंद गुहेवरील गाभाऱयातील काळ्या पाषाणावर श्रीसमर्थांचा मुखवटा असून उत्तम किरीट, मकराकार कुंडले, महावस्त्र, अलंकारांनी सुशोभित अशा समाधीचे त्रिकाल यथासांग पूजन पुजारी (चोळाप्पांचे वंशज) करतात. समाधीस भक्त लघुरुद्र, महारुद्र अभिषेक करतात. भक्त चोळाप्पांच्या इच्छेनुसार येथे घडलेले श्रीस्वामीसमर्थांचे अखंड वास्तव्य हेच या अलौकिक वास्तूचे शाश्वत ‘स्थान’माहात्म्य आहे.






























































