श्रीतुकामाई

817

>> विवेक दिगंबर वैद्य

‘मूर्तिमंत विरक्ती, शांती आणि आनंद’ या शब्दांत ज्यांचे वर्णन करता येईल अशा परमपूज्य ‘श्रीतुकामाईं’विषयीचा हा लेख.

मराठवाडय़ामध्ये नांदेडपासून दूर (सध्याचा हिंगोली जिल्हा) कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी गावामध्ये काशीनाथपंत उन्हाळे नावाचे यज्ञयागी, तपस्वी यजुर्वेदी ब्राह्मण वास्तव्य करून होते. योग, ध्यानधारणादी साधनांत निष्णात असलेल्या काशिनाथपंत आणि पार्वतीबाईंच्या सुखी संसाराला अपत्य नसल्याने दुःखाचे गालबोट लागलेले होते. विवाहाला पंधरा वर्षे उलटूनही पोटी संतान नसल्याने पार्वतीबाई जप, जाप्य, उपासतापास आणि पियूषव्रत करू लागल्या. याचे फलित म्हणून त्यांचे आराध्यदैवत, श्रीदत्तात्रेयाने दृष्टांताद्वारे ‘आपण त्यांच्यापोटी जन्म घेत असल्याचे’ सूचित केले. तसेच अन्य एका स्वप्नदृष्टांतामध्ये रुक्मिणीमातेने त्यांच्या ओटीत पिकलेला आंबा टाकला. साधना आणि देवदेवतांचा आशीर्वाद फलद होऊन फाल्गुन वद्य पंचमी, सोमवार शके 1734 (मार्च 1813) रोजी पार्वतीबाई त्यांच्या माहेरी, सुकळी येथे असताना प्रसूत झाल्या आणि शरीराला कसलाही मळ, रक्त वा गंध नसलेले तेजस्वी बालक जन्म घेते झाले.

जन्मतः स्वतःमधील अवधूततत्त्वाचा प्रत्यय देणारे हे सुकुमार आजानुबाहू बालक अन्य बालकांप्रमाणे रडारड न करता हसत हसत जन्म घेते झाले. मातापित्याने योग्य वेळ पाहून अन्नदान, इच्छाभोजन, ब्राह्मणदक्षिणा आणि वस्त्र्ाालंकार देऊन ग्रामस्थांना संतुष्ट केले व बाळाचे नामकरण ‘तुकाराम’ असे केले. थंडी-वारा-पावसाची तमा न बाळगणारे, खाण्यापिण्याची पर्वा न करणारे हे बालक बालपणापासूनच लीलाधर होते. त्याच्या या बालसुलभ लीला केवळ चार वर्षे अनुभवून पार्वतीबाई तुकारामला पोरके करून निवर्तल्या. वडिलांची विरक्त वृत्ती व मातृप्रेमाचा अभाव यांमुळे तुकारामास म्हणावा तसा धाक नव्हता. बालवयातील सर्व दांडगाई, खेळातील आनंद तो मनमुराद लुटत असे. एकदा नदीपात्रात खोल खड्डा करून तो आत बसून राहिला आणि बऱयाच काळानंतर सुखरूप बाहेर आला हे पाहून आपल्या पोटी अवधूततत्त्व साक्षात देहस्वरूप जन्मले आहे याची काशीनाथपंतांना जाणीव झाली. तुकारामातील देवत्वाचा प्रत्यय अनेकांना सातत्याने येत असे. पुढे तुकारामने दोन वर्षे मौन धारण केले. तो आठ वर्षांचा होताच काशिनाथपंतांनी त्याची मुंज केली, त्यानंतर मात्र तो घरातून कायमचा बाहेर निघाला आणि विदेहावस्थेत रानावनात सर्वत्र मनमुराद संचार करू लागला. पुढे काशीनाथपंतांचे देहावसान झाले तेव्हा त्यांचे अग्नीसंस्कार ग्रामस्थांनीच उरकले. काही दिवसांनी तुकाराम घरी परतला अन् आपल्या वडिलांविषयी विचारू लागला तेव्हा थोराजी माळी या ग्रामस्थाने पंतांच्या निधनाची दुदैवी बातमी तुकारामच्या कानी घातली आणि त्यांचे दहनसंस्कार जिथे झाले तिथे तुकारामास नेले तेव्हा तिथल्या राखेमध्ये तो यथेच्छ लोळला. त्या नंतर तुकाराम कुर्तडी गाव सोडून निघाला आणि पुन्हा कधी तिथे फिरकला नाही.

उमरखेड येथील श्रीचिन्मयानंदस्वामी आपली पंढरीची वारी करून परत येत असताना त्यांना येहळेगावी नदीच्या काठावर तुकाराम ध्यान लावून बसल्याचे दिसले. त्यांनी पुढे होत तुकारामला सावध केले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ‘रामकृष्णहरी’ हा षडाक्षरी मंत्र देऊन त्याचे नामकरण ‘श्रीतुकाराम चैतन्य’ असे केले आणि ते निघून गेले. अनुग्रहप्राप्ती घडताच तुकारामांची देहस्थिती पालटली आणि ते परमहंसवृत्ती बाळगून सर्वत्र संचार करु लागले. त्यांच्या गुरुपरंपरेचा उगम आदीनाथ-मत्स्येंद्रनाथ-गोरक्षनाथ यांच्यापासून होता तसेच श्रीसहजानंदस्वामी (गोचरस्वामी) आणि श्रीपूर्णानंद (रावसाहेब शेवाळकर) हे त्यांचे गुरुबंधू होते.

सदोदीत बालोन्मतपिशाचवृत्ती धारण केलेल्या श्रीतुकाराम चैतन्यांची ओळख पुढे सर्वत्र ‘श्रीतुकामाई’ म्हणून दृढ झाली. विक्षिप्तपणा हा त्यांचा स्थायीभाव असला तरीही त्यांच्यातील देवत्वाचा प्रत्यय आणि प्रचीती लाभलेली भक्तमंडळी काही केल्या त्यांचा पिच्छा सोडत नसत. वरकरणी कठोर परंतु अंतर्यामी मृदू व कोमल अंतःकरणाचे श्रीतुकामाई अल्पावधीतच सर्वत्र आणि सर्वदूर प्रसिद्धीला आले. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढती झाली. त्यांच्या अवतारकार्यामुळे ते जसे प्रसिद्ध झाले तसेच अन्य एका घटनेमुळेही ते प्रसिद्धीस आले.

‘अरे, चोर येणार आहे आणि सगळे लुटून नेणार आहे, सांभाळा रे सांभाळा’ असे तिनेक दिवस ओरडत फिरणारे तुकामाई एकाएकी येहळे गावातून नाहीसे झाले त्याचवेळी चौदा-पंधरा वर्षांचा एक गुटगुटीत तेजस्वी मुलगा गावात येऊन तुकामाईंची चौकशी करू लागला. ग्रामस्थांना मोठे कौतुक वाटले. त्यांनी याविषयी चौकशी केली असता तो मुलगा म्हणाला, ‘माझे नाव गणपती असून मी गुरुशोधार्थ इथवर येऊन पोहोचलोय.’ गणपती तुकामाईंची वाट पाहात त्यांच्या घराच्या भिंतीला टेकून बसला. काही वेळातच कमरेला लंगोटी, डोक्याला टोपडे, एका हाती चिलीम आणि दुसऱया हाती उसाचे दांडके घेतलेली तुकामाईंची स्वारी आरडाओरड करीत घरी परतली. त्यांना पाहून गणपती उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. तुकामाईंनी हातातील दांडके उगारून ’थांब, तुझा खून करतो’ असे म्हटले, तोच गणपती तुकामाईंच्या चरणांवरच कोसळला. तुकामाईंचा क्रोध क्षणार्धात मावळला. त्यांनी गणपतीला प्रेमाने उठवले आणि पोटाशी धरले. गणपतीला आपल्या गुरुशोधाची तळमळ संपल्याची जाणीव झाली. त्याचे मन तृप्त झाले मात्र येणारा काळ त्याच्यासाठी अतिशय त्रासदायक होता.

तुकामाईंनी गणपतीला अनेक खडतर कसोटय़ांमधून तावून-सुलाखून बाहेर काढले अन् त्यानंतर पूर्ण कृपेचा वर्षाव केला. रामनवमीच्या मुहूर्तावर तुकामाईंनी गणपतीला समोर बसवले आणि ‘मी आजवर तुला बरेच कष्ट दिले, मात्र पूर्वी वसिष्ठांनी जे रामचंद्रास दिले तेच मी तुला देत आहे!’ असे म्हणून गणपतीच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यास समाधीवस्था प्राप्त झाली. तुकामाईने ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र, रामदासी दीक्षा आणि अनुग्रह देण्याचा अधिकार बहाल करून, पुढील काळात रामोपासना व रामनामाचा प्रचार करावयास सांगितला. गणपतीचे नाव त्यांनी ‘ब्रह्मचैतन्य’ असे ठेवले आणि हाच ‘ब्रह्मचैतन्य’ पुढे गोंदवले येथे जाऊन ‘नामसंप्रदायाचे प्रमुख श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ म्हणून ‘यातकीर्त’ झाले. ब्रह्मचैतन्यासोबतच उपेंद्रस्वामी, रामानंद महाराज, हनुमंत महाराज वावरहिरेकर असे अनेक शिष्योत्तम तुकामाईंनी निर्माण केले. रामजी बापू यांना तुकामाईंचा बराच सहवास लाभला. त्यांनी गुरुआज्ञेनुसार सुकळी येथे तुकामाईंच्या पादुका स्थापन केल्या. ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, शके 1809 (जून 1887) या दिवशी येहळेगावामध्ये तुकामाईंनी समाधी घेतली तेव्हा रामजीबापू उपस्थित होते. तुकाराम चैतन्य अर्थात तुकामाईंची आज सर्वत्र सिद्धसत्पुरुष म्हणून जशी ओळख आहे तसेच नामसंप्रदायाचे प्रणेते श्रीगोंदवलेकर महाराज यांचे गुरू म्हणूनही ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. धन्य ते गुरू-शिष्य!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या