पैजारवाडीचे श्रीचिलेदत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

पन्हाळ्यानजीकच्या ‘पैजारवाडी’ क्षेत्राला आध्यात्मिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या श्रीचिलेदत्त महाराजांचा हा अल्पपरिचय.

‘हा साधू नव्हे, संन्यासी नव्हे, बाबा नव्हे, बैरागी नव्हे, संत नव्हे, अवलियादेखील नव्हे. तर हा आहे भगवंत! साक्षात भगवंत! साक्षात परब्रह्म! हा जगाचा चालक, पालक आणि मालकदेखील आहे. हजारो साधू-सत्पुरुष निर्माण करण्याची ताकद यांच्यामध्ये आहे याची प्रचिती अनेकदा अनेकांना आली आहे आणि हेच पुढेदेखील दिसून येईल,’ हे प्रचीतीचे बोल चिलेभक्त बाबुराव अथणे यांचे आहेत.

चिलेदेव साक्षात भगवंत होते याचा प्रत्यय अन प्रत्यंतर त्यांच्या सदैव निकट असलेल्या भक्तांना अनेकदा अन वारंवार आले असले, तरीदेखील सर्वसामान्य भक्तांना चिलेदेवांमधील ‘परमेशतत्त्व’ चटकन उमगले नाही आणि याचे कारणदेखील स्वतः चिलेदेवच होते. पांढरा शर्ट अन् पांढरी विजार घातलेली साधी, सात्विक वृत्तीची सर्वसामान्य भासणारी असामी म्हणजे लौकिकातील वा प्रत्यक्षातील चिलेदेव. डोक्यावरचे केस कधी बारीक कापलेले तर कधी संपूर्णतः भादरलेले. क्वचितप्रसंगी दाढी वाढलेली असे तरीही नीटनेटकेपणाचा प्रत्यय त्यांच्या दिसण्या-वागण्यात ठळकपणे जाणवत असे. कधी दिवसातून चार-चार वेळेस स्नान करणाऱ्या चिलेदेवांना जेव्हा त्यांचे भक्त कधी कढत पाण्याची आंघोळ घालत तेव्हा आणि अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या कडाक्यात कापरे भरविणाऱ्या गार पाण्याने आंघोळ करतानाही चिलेदेव निर्विकार असत. रस्त्यातून सतत लगबगीने चालणाऱ्या चिलेदेवांच्या पायात चपला असल्याचे दृश्यही दुर्मीळच असे. कडक उन्हाने तापलेल्या डांबरी रस्त्यावरून, जंगला-चिखलातून, काट्याकुट्यातून, दगड-धोंड्यातून सतत अविश्रांत चाल काढल्यावरही त्यांच्या पायाचे तळवे मऊसुत हळुवार, तेजस्वी जाणवत असे निरीक्षण त्यांच्या भक्तांनी नोंदवले आहे. भोजन करण्याविषयी चिलेदेवांचे वागणे विलक्षण निरिच्छवृत्तीचे असे. चिलेदेव कित्येक दिवस अन्नाशिवाय आणि झोपेशिवाय राहिल्याचे प्रसंगही त्यांच्या निकटतम भक्तांनी अनुभवलेले आहेत. प्रसंगी कधी अभक्ष्य सेवन आणि अपेयपानही केले असले तरीदेखील ती केवळ एक लीला असे.

सदैव भक्तकल्याणार्थ रमलेला हा अवलिया स्वतःकडे शक्य तितके दुर्लक्ष करण्यात आणि स्वतःच्या देहाविषयी निष्ठर वृत्ती बाळगणारा होता. अनेकदा भक्तांच्या शारीरिक व्याधी आणि भोग परस्पर स्वतःच भोगून त्यांनी आपला देह हा स्व-मालकीचा नसून भक्त कल्याणार्थ आहे याची प्रचीती दाखवून दिली. भक्तांच्या मनातील दुर्बुद्धी अन् विकृती नष्ट होण्यासाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या चिलेदेवांचा नीटनेटकेपणाचा आग्रह अनावर झाला की, ते स्वतः हातात केरसुणी घेऊन स्वच्छतेचा फैलाव करीत. भक्ताची झोपडी चंद्रमौळी असली तरीही ती स्वच्छ व नीटनेटके असावी हा आग्रह त्यांनी कधी उपदेशाद्वारे केला नाही तर हातात प्रत्यक्ष केरसुणी घेऊन ते अंगणापासून परसदारापर्यंत स्वतः केरकचरा काढीत. कुण्या भक्ताच्या घरातील भिंतीवर कोळिष्टकं जमा झाली असल्यास तीही स्वच्छ करून सोडीत. त्यांची ही कृती इतकी बोलकी असे की, पुढे ते घर नेहमी कसे स्वच्छ राहील याची काळजी त्यांचे भक्तच घेत असत.

चिलेदेवांसमोर येणाऱ्या कोणत्याही वयोगटातील स्त्रीचा म्हणजे जराजर्जर वृद्धेपासून अगदी परकऱ्या पोरीपर्यंतच्या प्रत्येकीचा उल्लेख ते ‘आई’ या संबोधनाने करीत असत. क्वचितप्रसंगी ते ‘अक्का’ हे संबोधनही वापरीत असत. चिलेदेवांच्या लेखी ‘आईसाहेब’ हे आत्यंतिक बहुमानाचे संबोधन मात्र कोल्हापूरवासिनी अंबाबाई हिच्यासाठी होते. तत्कालीन दिग्गज संतसत्पुरुष चिलेदेवांचा अधिकार ओळखून होते. श्रीगुळवणी महाराज, श्रीस्वरूपानंद स्वामी, श्रीश्रीखंडे महाराज, श्रीबालमुकुंद बालावधूत, श्रीगंधेमहाराज यांसारख्या दिग्गज संतमंडळींना चिलेदेवांविषयी विलक्षण आदर आणि प्रेम होते. चिलेदेवांविषयीचे त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असे.

अनेक भक्तभाविकांची ‘चिलेदेव हेच धनकवडीस्थित श्रीशंकर महाराज आहेत’ अशी ठाम श्रद्धा आहे आणि यामागचे कारणही तसेच आहे. पुण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या अभ्यंकर घराण्यावर श्रीशंकर महाराजांची विशेष कृपादृष्टी होती. त्यांच्या घरी श्रीशंकर महाराज येत असत, मुक्कामही करीत असत. एकदा त्यांनी अण्णा अभ्यंकर यांना ‘तुझ्या नव्या घराच्या वास्तुशांतीला मी येईन, तेव्हा मला घोंगडे टाकशील नां?’ असे विचारले. अण्णांनी तसे कबूलही केले. मात्र, पुढे काही काळानंतर श्रीशंकर महाराज समाधिस्थ झाले. हा प्रसंग घडल्यानंतर बऱ्याच वर्षाने अभ्यंकरांनी पुण्यामध्येच नवे घर बांधले तेव्हा त्यांना श्रीशंकर महाराजांनी वास्तुशांतीला येण्याच्या आश्वासनाचे स्मरण झाले. तोवर श्रीशंकर महाराज समाधिस्थ होऊन बराच काळ लोटला होता, परंतु ते येतील असा ठाम विश्वास अण्णा अभ्यंकर बाळगून होते. पुढे वास्तुशांतीचा दिवस उजाडला. कार्याची लगबग सुरू झाली एवढ्यात बाहेर गलबला झाल्याचे त्यांच्या कानी आले म्हणून अण्णा बाहेर येऊन पाहतात तो काय? त्यांच्या नव्या घराच्या प्रवेशद्वारावर श्रीचिले महाराज ‘दत्त’ म्हणून उभे ठाकले होते. अण्णा त्यांना सामोरे गेले तेव्हा चिलेदेव चढ्या स्वरात म्हणाले, ‘आलो की नाही तुझ्या वास्तुशांतीला? आता टाक घोंगडे!’ अण्णांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. या प्रसंगानंतर अनेक भक्त श्रीशंकर महाराजांना चिलेदेवांच्या रूपात पाहू लागले.

चिलेदेवदेखील धनकवडी येथे श्रीशंकर महाराजांच्या समाधीमंदिरात अनेकदा येत असत, ‘शंकरदादा माझा मोठा भाऊ आहे’ असे सांगत असत. हातात झोळी घेतलेल्या चिलेदेवांनी एकदा धनकवडीच्या सभामंडपात उभं राहून ‘शंकरदादाने त्याची मुलं माझ्या झोळीत घातलीत रे!’ असे उद्गार काढले होते. यामुळेच की काय, श्रीशंकर महाराज आणि चिलेदेवांकडे त्यांचे अनेक भक्त समदृष्टीने पाहतात.

चिलेदेवांचा सहवास डॉ. सुधीर बापूसाहेब तथा बाबा गुप्ते यांना अनेकदा लाभला. चिलेदेवांविषयीच्या त्यांच्या आठवणींचे व त्यांच्याशी परिचित असलेल्या चिलेदेवांच्या अन्य भक्तांच्याही आठवणींचे संकलन व लेखन डॉ. गुप्ते यांनी ‘चंदनी सुगंध’ या ग्रंथामध्ये केलेले आहे. या ग्रंथाच्या दोन भागात आणि 80 अध्यायांतील साडेपाचशेहून अधिक लीलाप्रसंगात चिलेदेवांचे अवतारकार्य संग्रहित करण्यात आलेले आहे. बाबूराव अथणे आणि डॉ. बाबा गुप्ते लिखित ग्रंथामधून उलगडणारे चिलेदेवांचे अवतारकार्य आणि अलौकिक चरित्र निव्वळ अद्भुत आहे. मागील शतकात अगदी नव्वदच्या दशकापर्यंत तुमच्या आमच्यात सहजपणे वावरलेला आणि मिसळून गेलेला हा ‘देव’ अनुभवण्यासाठी कोल्हापूर परिसरातील पन्हाळ्यानजीकच्या ‘पैजारवाडी’ येथे गेले पाहिजे आणि तेथे कासवाकृती आकारातून घडविलेल्या समाधीमंदिरात विराजमान झालेल्या ‘शंकर दत्त चिले’ या अवलिया सत्पुरुषाचे दर्शन प्रत्येक भाविक-भक्ताने घेतलेच पाहिजे. (उत्तरार्ध)

[email protected]