अष्टविनायकाचे वैभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

शिवकालीन कालखंडानंतर पेशवाईचा काळ आणि मराठय़ांची सत्ता जोपर्यंत महाराष्ट्रभूमीवर अधिराज्य गाजवीत होती तेव्हापासूनच ही अष्टगणेश स्थाने निर्माण झाली किंवा जीर्णोद्धारित झाली. पुणे, नगर, नाशिक आणि रायगड जिह्याच्या आसपास असलेली श्रीगणेशाची ही ‘आठ’ स्थाने आजतागायत ‘अष्टविनायक’ या संबोधनाने आपले स्थानमाहात्म्य राखून आहेत आणि वृद्धिंगतही करून आहेत.

महाराष्ट्रभूमीला धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्राचीन काळापासूनच लाभलेला आहे. या भूमीला देवदेवता, संतश्रेष्ठ यांची अपार कृपा सातत्याने लाभलेली आहे. महाराष्ट्र प्रांतात अनेक स्थानांचे माहात्म्य विशिष्ट देवतांनुसार ओळखले जाते. त्या अलौकिक परंपरेमधूनच श्रीदेवीमातेची साडेतीन शक्तिपीठे, श्रीसमर्थ रामदास यांनी स्थापन केलेले अकरा मारुती, बारा ज्योतार्ंलगांपैकी काही स्थाने, अष्टविनायक, श्रीदत्तक्षेत्रे या व अशा अनेक पवित्र स्थानांचे माहात्म्य महाराष्ट्रभूमीचे धार्मिक व आध्यात्मिक वैभव अधोरेखित करीत आहे.

देशभरात तसेच जगभरातही जिथे हिंदू धर्म व संस्कृतीचा प्रसार झालेला आहे, तिथे श्रीगणेश देवतेचे पूजन केले जाते. जगभरात अनेक ठिकाणी श्रीगणेश मंदिरे स्थापन झालेली आहेत. महाराष्ट्र प्रांतापुरता विचार करायचा झाला तर मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महड आणि पाली ही आठ गावे आणि तिथल्या परिसराचे ‘स्थान’माहात्म्य श्रीगणेशामुळे वाढल्याचे दिसून येते.

शिवकालीन कालखंडानंतर पेशवाईचा काळ आणि मराठय़ांची सत्ता जोपर्यंत महाराष्ट्रभूमीवर अधिराज्य गाजवीत होती तेव्हापासूनच ही अष्टगणेश स्थाने निर्माण झाली किंवा जीर्णोद्धारित झाली. पुणे, नगर, नाशिक आणि रायगड जिह्याच्या आसपास असलेली श्रीगणेशाची ही ‘आठ’ स्थाने आजतागायत ‘अष्टविनायक’ या संबोधनाने आपले स्थानमाहात्म्य राखून आहेत आणि वृद्धिंगतही करून आहेत.

महाराष्ट्रात श्रीगणरायाची अनेक मंदिरे आहेत. त्यातील काही पुरातन, काही जागृत, तर काही नवी अशी शेकडो प्रचलित स्थाने आहेत. मात्र त्यातही ‘अष्टविनायक यात्रे’च्या माध्यमातून भक्तांच्या पसंतीचा कल मिळविणारी आठ स्थाने एक ते दोन दिवसांत सहजगत्या पाहता येतात. स्वतःचे वाहन असल्यास आपल्याला या अष्टविनायकांचे दर्शन खासगी यात्रा-सहल कंपन्यांपेक्षाही अधिक सुलभतेने घेता येते.

अष्टविनायकांमधील पहिला गणपती मोरगाव येथे ‘मयुरेश्वर’ या नावाने विराजमान आहे. कुलदैवत ‘खंडोबा’च्या वास्तव्याने पावन झालेल्या ‘जेजुरी’नगरीच्या जवळ असलेल्या ‘मयुरेश्वर’ या श्रीगणेशमूर्तीच्या डोळ्यामध्ये आणि बेंबीमध्ये हिरे बसवलेले आहेत. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही श्रीगणेशाची आरती समर्थ श्रीरामदास स्वामींना याच स्थानावर स्फुरली असे सांगण्यात येते. अष्टविनायकातील दुसरा गणपती ‘थेऊर’ येथे ‘चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर पुण्याहून 30 कि.मी. अंतरावर थेऊर येथे विराजमान झालेला हा चिंतामणी भक्तांच्या मनातील चिंता आणि शंकाकुशंकांचे ‘हरण’ करणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे मंदिरामध्ये माधवराव पेशवे यांची स्मृती जतन करण्यात आलेली असून त्यांची पत्नी रमाबाई यांची समाधीदेखील पाहावयास मिळते.

नगर जिह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीवर वसलेले सिद्धटेक हे अष्टविनायकांमधील तिसरे स्थान आहे. ऐसपैस गाभारा आणि प्रशस्त सभामंडप लाभलेल्या या श्रीगणेश मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. या स्थानावर वास्तव्य करणारा स्वयंभू गणपती ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्रसिद्ध आहे. तर अष्टविनायकांपैकी शक्तिमान असलेले तसेच स्वर्ग व पृथ्वीलोकाला छळणाऱया त्रिपुरासुराचा वध करून ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ या नावाने प्रसिद्धीस आलेले श्रीगणेशरूप रांजणगाव येथे वसलेले आहे. पुणे-नगर रस्त्यावर ‘शिरूर’ तालुक्यातील ‘रांजणगाव’चा ‘महागणपती’ अष्टविनायकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीमहागणपतीचे हे स्वयंभू स्थान दहाव्या शतकापासूनच अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. माधवराव पेशवे तसेच इंदूरचे सरदार किबे या दोघांनी येथील श्रीगणेशस्थानाचा जीर्णोद्धार कालानुरूप केला. ‘रांजणगाव’चा ‘महागणपती’ उजव्या सोंडेचा आहे.

पुण्यापासून 85 कि.मी. अंतरावर नारायणगावच्या उत्तरेस, जुन्नर तालुक्यामध्ये ‘ओझर’ येथे कुकडी नदीतीरावर वसलेला ‘विघ्नेश्वर’ हा अष्टविनायकांतील पाचवा गणपती आहे. लांब, रुंद व प्रशस्त अशा येथील श्रीगणेशमूर्तीच्या डोळ्यांमध्ये ‘माणिक’ रत्न असून मूर्तीच्या कपाळावर ‘हिरा’ आहे. अतिशय देखणे व प्रसन्न असे हे श्रीगणेशस्थान कुकडी नदीतीरावर वसलेले आहे. चारही बाजूंना तटबंदी असलेले हे मध्यवर्ती श्रीगणेश मंदिर पेशवे घराण्यातील चिमाजीआप्पा यांनी जीर्णोद्धारित केले. सर्व विघ्नांचे हरण करणारा ‘विघ्नहर्ता गणेश’ म्हणून ‘ओझर’चा ‘विघ्नेश्वर’ अष्टविनायकांत सुप्रसिद्ध आहे. येथून जवळ 14 कि.मी. अंतरावर डोंगरात खोदलेल्या लेणी समूहांमध्ये अष्टविनायकांतील सहावा ‘गिरिजात्मक’ गणपती वास्तव्य करुन आहे. हे गिरिस्थान कुकडी नदीच्या काठी जुन्नर तालुक्यात आहे. पुणे येथून 17 कि.मी. तसेच जुन्नरहून 7 कि.मी. अंतरावर असलेल्या या मंदिरात 400 पायऱया चढून जावे लागते. या मंदिराचा जीर्णोद्धारदेखील पेशवे यांच्या कारकीर्दीत झाला. येथील दगडी खांबावर विविध प्राण्यांचे रूप साकारलेले असून येथील गिरिजात्मक गणेशमूर्ती दगडात कोरलेली आहे.

1725 साली पेशव्यांच्या कारकीर्दीत बांधले गेलेले व अष्टविनायकांमधील सातवा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले ‘महड’ हे स्थान रायगड जिह्यातील खालापूर तालुक्यात कर्जत, खोपोलीनजीक आहे. नागाची नक्षी असलेले, सोनेरी घुमटाकार कळसाचे साधे कौलारू मंदिर व त्यातील श्रीगणेशमूर्ती सिंहासनाधिष्ठत उजव्या सोंडेची आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तळ्यामध्ये ही मूर्ती असल्याचा दृष्टांत एका गणेशभक्ताला घडला तेव्हा त्याने शोध घेत जी मूर्ती पाण्याबाहेर काढून स्थापन केली तीच वरदविनायक म्हणून प्रसिद्ध झाली.

याच रायगड जिह्यातील अंबा नदीच्या काठी सुधागड किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिरेबंदी मंदिरात अष्टविनायकांतील आठवा गणपती विराजमान आहे. विशाल, भव्य ललाट आणि डोळ्यात हिरे असलेले हे स्वयंभू रूप ‘बल्लाळेश्वर’ नावाने प्रसिद्ध आहे. अशा रीतीने महाराष्ट्रात विविध स्थानांचे माहात्म्य जागविणाऱया या प्रसिद्ध अष्टविनायकांचे दर्शन प्रत्येक सश्रद्ध भाविकाने आवर्जून घेतलेच पाहिजे.

[email protected]