गावकुसाबाहेरचा संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वृषाली सोनार

विमुक्त भटक्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे, शोषित, पीडित समाज घटकांमध्ये सामाजिक परिवर्तन करणारे आणि विमुक्त भटक्या जमातीच्या लोकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणारे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांना न ओळखणारे विरळाच. ‘उचल्या’ हे त्यांचे अत्यंत गाजलेले आत्मचरित्र. ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे सद्यःस्थितीतील वास्तवाचं दर्शन घडवणारी साहित्यनिर्मिती करण्याचे काम सातत्याने केले आहे.

उचल्या, विमुक्त भटक्याचे स्वातंत्र्य, वडार वेदना अशा उत्कृष्ट साहित्याच्या माध्यमातून त्यांनी विविध जाती-जमातीचे जीवन, जातीजातीतील वैमनस्य, दारिद्रय़, सामाजिक विषमता अशा कितीतरी प्रश्नांचे वर्णन केले आहे. असाच त्यांच्या अनुभवातून साकारलेला ‘गावकुसाबाहेरची माणसं’ हा वस्तुस्थितीवर आधारित कथासंग्रह वाचकांना एक नवा अनुभव देईल.

एकूण 21 कथांचा समावेश असणारा हा कथासंग्रह म्हणजे करोडोंच्या संख्येने असलेला गावकुसाबाहेरचा हा हिंदुस्थानातला समाज गुन्हेगार जमातीचा वर्ग मानला गेल्याने स्वातंत्र्यानंतरही हिंदुस्थानच्या संविधानाच्या अंतर्गत कसा येत नाही याचे दारुण चित्रण हे लेखकाने आपल्या अनुभवातून मुद्देसूदपणे पटवून दिले आहे.

एखाद्या विशिष्ट जाती-जमातीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलायला हवा. त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळायला हवा. त्यांच्या अन्न, वस्त्र्ा, निवारा व शिक्षण या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यास तेदेखील या पुरोगामी महाराष्ट्राचे जबाबदार नागरिक होतील, असे लेखक अनुभवातून सांगतात.

विविध भटक्या-विमुक्त जाती-जमातींना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी लेखक आजतागायत संघर्ष करीत आहे. हाच संघर्ष करीत असताना आलेल्या अनुभवातून त्यांनी गावकुसाबाहेरच्या माणसांची व्यथा या कथासंग्रहातून मांडली आहे. त्यांच्या इतर साहित्याप्रमाणेच हे पुस्तकदेखील समाजात पिढय़ान् पिढय़ा चालत आलेले जातीय भेदभाव नष्ट करण्यात मदत करणारे ठरेल अशी आशा आहे.

गावकुसाबाहेरची माणसं
लेखक ः लक्ष्मण गायकवाड
प्रकाशक ः साकेत प्रकाशन
मूल्य ः रुपये 175/-