
>> योगेश शौचे
नाशिक इथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. नारळीकर यांच्यासोबत काही काळ काम केलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ योगेश शौचे यांनी उलगडलेले नारळीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू… सर्वसामान्य लोकांमध्ये विज्ञान पोहोचविण्यासाठी नारळीकर सर कित्येक वर्षे करत असलेल्या प्रयत्नांची ही पावती आहे. त्यांच्या विज्ञाननिष्ठेचा हा गौरव आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर सरांची संपूर्ण कारकीर्दच वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यांचा जन्म जरी कोल्हापूरचा असला तरी त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून असल्याने त्यांचे बालपण त्या विद्यापीठात गेले. तिथूनच प्रेरणा घेऊन ते पुढच्या शिक्षणासाठी केंब्रिजला गेले आणि त्यांनी त्या काळात अतिशय अवघड असलेली ट्रायपोसची परीक्षा पास करून गणितात पदवी आणि पीएच.डी. मिळवली. पुढे ते सर फ्रेड होईल यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी खगोलशास्त्रात संशोधन सुरू केले. 1972 साली हिंदुस्थानात परत येऊन मुंबईला टाटा संशोधन संस्थेत त्यांनी सैद्धांतिक खगोलशास्त्रावर संशोधनाला सुरुवात केली. खगोलभौतिकी आणि विश्व उत्पत्ती शास्त्र या दोन शाखांमध्ये त्यांनी प्रामुख्याने संशोधन केले आहे. विश्वनिर्मितीच्या अनेक सिद्धांतांपैकी स्थिर स्थिती सिद्धांतावर त्यांनी संशोधन केले आहे. त्यांची कॉस्मॉलॉजीवरची पुस्तके अनेक विद्यापीठांतून संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जातात. त्यांचे गुरू फ्रेड होईल यांच्याबरोबर त्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ‘होईल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून ओळखला जातो. अनेक नामवंत खगोलशास्त्रज्ञांबरोबर त्यांनी काम केले आहे आणि असंख्य आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले आहेत. 1988 साली विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांना आयुका स्थापन करण्याची विनंती केली आणि ते तिचे संस्थापक संचालक झाले. 2003 साली ते निवृत्त झाले तरी अजूनही ते तिथे मानद शास्त्र्ाज्ञ म्हणून काम करतात.
हिंदुस्थानी, विशेषतः मराठी साहित्यात विज्ञानविषयक लेखनाला स्वतःची अशी ओळख मिळवू देण्यात नारळीकर सरांचा मोठा वाटा आहे. घरातल्या शाळकरी मुलांपासून त्यांच्या आजी-आजोबांपर्यंत विज्ञानाची आवड सरांच्या लेखनाने निर्माण झाली. सरांपूर्वी काही जणांनी विज्ञान लेखन केले असले तरी सर स्वतः एक नावाजलेले वैज्ञानिक, आयुकासारख्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक संचालक. त्यामुळे त्यांच्या लेखनाला विशेष वजन मिळाले.
विश्व उत्पत्तीबरोबरच जीवसृष्टीच्या निर्मितीविषयीच्या संशोधनात त्यांना रस आहे. विश्वात इतरत्र जीवसृष्टी आहे आणि तिथून ती पृथ्वीवर आजही सूक्ष्म जीव धूमकेतूंच्या माध्यमाने येत असतात या सिद्धांताचे ते पुरस्कर्ते आहेत. तो तपासून बघण्यासाठी 2001 आणि 2005 साली हिंदुस्थानातून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोग केले गेले. त्यात सहभागी असल्याने त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी लाभली. त्यानिमित्ताने त्यांचा निगर्वी आणि पारदर्शक स्वभाव, आपल्याला नव्या असलेल्या विषयाची माहिती जाणून घेण्याची लहान मुलासारखी उत्सुकता आणि प्रशासनिक कुशलता हे गुण जवळून पाहता आले. त्यांचा उपयोग पुढे सूक्ष्म जीव संकलन प्रकल्पाची उभारणी करताना झाला. सर आजही तितक्याच उत्साहाने अंतराळातल्या जिवाणूंच्या अभ्यासाच्या संशोधनाच्या पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन करत आहेत.
अशा या अतिशय विद्वान, व्यासंगी, अभ्यासू मनोवृत्तीच्या विनम्र आणि मितभाषी शास्त्र्ाज्ञ लेखकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्या पदाची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या कामासाठी शुभेच्छा! कोरोना काळात समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जास्त प्रबळ करण्यासाठी हे निश्चितच फार महत्त्वाचे आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सर पुन्हा एकदा हे यशस्वीपणे करतील असा विश्वास आहे.
(चौकट)
एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेची स्थापना, महत्त्वपूर्ण संशोधन करतानाच जयंत नारळीकर सरांनी सोप्या भाषेत विज्ञान सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचे लेखन अतिशय वैविध्यपूर्ण आहे. ‘आकाशाशी जडले नाते’ किंवा ‘अंतराळ आणि विज्ञान’ यासारखी विज्ञान कल्पना सोप्या भाषेत सांगणारी पुस्तके; ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’ यांसारख्या कादंबऱया; ‘यक्षांची देणगी’सारखे कथासंग्रह, ठगणित आणि विज्ञानसारखी विचारप्रवर्तक किंवा ‘मी शास्त्रज्ञ कसा झालो’, ‘चार नगरातले माझे विश्व’सारखी आत्मचरित्रात्मक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. विज्ञानातल्या अवघड कल्पना सोप्या करून सांगण्यासाठी त्यांनी शास्त्र्ााrय लेखनाबरोबरच विज्ञान कथांचाही सक्षम वापर केला. कथा – कादंबऱयांच्या माध्यमातून या कल्पना लोकांना समजावून सांगण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश मिळाले. त्यांच्या विज्ञान कथा केवळ काल्पनिक न राहता त्या शास्त्र्ााrय संकल्पनांच्या सबळ पायावर उभ्या असतात हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़. त्यांना विशेष रस असलेल्या परग्रहावरील जीवसृष्टीचा विषय बऱयाच लेखनात आलेला आपल्याला दिसतो. ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मचरित्र हा त्यांच्या लेखनसंपदेतला हिरा म्हणावा लागेल. त्यांची निरीक्षणशक्ती, लेखनशैली आणि विश्लेषक वृत्ती यामुळे ते केवळ त्यांचे आत्मचरित्र न राहता त्या काळातले वातावरण, शिक्षण पद्धती, संस्कृती यांचा एक आरसा बनते. प्रत्येकाने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. त्यामुळेच त्याचा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने उचित गौरवही झाला.
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)





























































