50 लाखांच्या देशाने गरुडाचे कबूतर केले!

750

>> द्वारकानाथ संझगिरी

यशाच्या आकाशात घिरट्या घालणाNया हिंदुस्थानी संघ नावाच्या गरुडाला फक्त पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या देशाच्या संघाने कबूतर करून स्वत:च्या खिडकीवर आणून बसवलं. टी-20 मालिका 5-0 ने जिंकल्यानंतर मला अश्वमेधाच्या घोड्याचं स्वप्न पडलं होतं. दात घशात गेलेल्या दु:खापेक्षा जुने रोग वर डोवंâ काढायला लागल्याचं दु:ख आणि चिंता जास्त आहे. आधी वन डेत 3-0ने पराभव, मग कसोटीत पुन्हा 2-0 असा व्हाइट वॉश. त्यातही एक पराभव दहा विकेटस्नी, दुसरा सात बळी राखून. मला ते जुने दिवस आठवले, जेव्हा मॅच ड्रॉ झाली की विजयाचा आनंद व्हायचा.

आणि तरीही विराट कोहली म्हणतो, ‘आमच्याकडे आल्यावर त्यांना दाखवतो.’ अजून किती दिवस इसापनीतीतला कोल्हा आणि करकोच्याचा खेळ खेळणार? हिरवी खेळपट्टी दिसली की खांदे टाकून‘क्यासे क्या हो गया’ म्हणायचं आणि पुन्हा घरच्या आखाड्यावर आल्यावर ‘गाता रहे मेरा दिल’.

या पराभवाचं विश्लेषण करताना मला फलंदाजीइतकंच गोलंदाजीचं अपयश महत्त्वाचं वाटतं. पण सुरुवात फलंदाजीनेच करूया. चारही डावांत एकदाही आघाडीच्या जोडीने भक्कम पाया घातलाच नाही. तुफान फॉर्मात असलेल्या राहुलला परत पाठवण्याची गरजच काय होती? का त्याच्यावर पांढ-या चेंडूचा खेळाडू म्हणून शिक्का मारलाय? त्याला काय ‘लाल चेंडू’ची अॅलर्जी आहे का? पृथ्वी शॉ हा एका गियरवर खेळतो. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीला आणखी दोन गियर लागतातच लागतात. सेहवाग हा अपवाद असतो. पृथ्वी फटके मारतो तेव्हा त्याची गुणवत्ता ओसंडून वाहतेय असं वाटतं. पण गुणवत्तेला बेदरकार विंâवा निष्काळजी होऊन चालत नाही. खाईस्टचर्चच्या दुसNया कसोटीत पहिल्या डावात किती मस्त सुरुवात त्याने केली, पण बाद कसा झाला? रस्ता ओलांडून समोरच्या पुâटपाथवरच्या मित्राला साद घालावी तशी त्याने दूरच्या पुâटपाथवरून गुमान यष्टिरक्षकाकडे जाणा-या चेंडूला साद घातली. काय गरज? झाला अपघात. फलंदाजीचा मूलभूत नियम आहे ‘प्ले क्लोज टू द बॉडी’. पण त्यापेक्षा वाईट होतं त्याचे उसळत्या चेंडूवर विचित्र पोझिशनमध्ये येऊन बाद होणं. गेलीय, बातमी गेलीय जगभर! जगभरातले वेगवान गोलंदाज आता त्याला सोडणार नाहीत. एरवी यशस्वी ठरलेला अगरवाल स्विंग आणि सिमसमोर लोंबकळला. बरं चेंडू अतिरेकी, सिम विंâवा स्विंग होता का, तर उत्तर नाही असं आहे. बोल्टचा अपवाद सोडा. पण तो स्विंग गोलंदाज आहे. हिरव्या खेळपट्टीने बाऊन्सला थोडी जास्त मदत केली एवढंच. माझ्या पिढीचं दुर्दैव एवढंच आहे की, आम्ही सुनील गावसकरला नवा चेंडू खेळताना पाहिलंय. आम्ही त्यामुळे प्रत्येक आघाडीच्या फलंदाजाला सुनील गावसकरचे कपडे घालायला जातो आणि ते त्याला तोकडे पडले की मग हिरमुसतो.

पुजाराने हिंदुस्थानी फलंदाजी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात स्वत:च्या बॅटवर तोलून धरली होती. त्यामुळे वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ नसलेल्या ऑस्ट्रेलियाला आपण हरवलं होतं. त्यात ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या पूर्वी इतक्या बाऊन्सी नाहीत. कारण संपूर्ण केकमधून मधला एक चौकोनी तुकडा काढावा तशी रग्बी मोसमात खेळपट्टी तिथे काढली जाते आणि क्रिकेट मोसमात पुन्हा खड्ड्यात उतरवली जाते. त्यामुळे पूर्वीचा तो बाऊन्स कमी झालाय. न्यूझीलंडमध्ये पुजारा पुजारासारखा खेळला. एकदा बोल्टने त्याला राऊंड द विकेट जाऊन असा चेंडू टाकला की, वासीम अक्रमलाही त्यावर आपल्या नावाचा शिक्का मारावा असं वाटलं असेल. पण न्यूझीलंडमध्ये पुजारा फलंदाजीचा हक्र्युलस नाही होऊ शकला. सेट झालेल्या पुजाराने खाईस्टचर्चला पहिल्या डावात पुल का मारण्याचा प्रयत्न करावा? ते म्हणजे सलमान खानने ‘इमोशनल शॉट’ देण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. त्याने लक्षात ठेवावं, देवाने त्याला बॅग भरून पेशन्स दिलाय, फटके नाहीत. आणि जे फटके त्याच्याकडे आहेत त्यावर शतकं होऊ शकतात.

सर्वात भयानक अपयश जे संघाला जास्तीत जास्त भोवलं ते कर्णधार कोहलीचं. धावांचा धबधबाच थांबला. गेली चार-पाच वर्षे धावा जगभर अखंड वाहत होत्या. काय झालं अचानक? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुष्काळी परिस्थिती जाणवली नाही असा फलंदाज क्रिकेटच्या इतिहासात झालेला नाही. अपवाद फक्त सर डॉन ब्रॅडमन. बाकी सोबर्स, रिचर्डस्, सचिन, लारा, गावसकर कुणी अपवाद नाहीत. पण एक गोष्ट जाणवते की, त्याला अपयश स्वीकारता येत नाहीये. तो बुद्ध कधीच नव्हता, पण त्याच्यातला उद्दामपणा जो त्याने कष्टाने लपवला होता तो न्यूझीलंडमध्ये बाहेर आला. त्याचं मैदानावर प्रेक्षकांना शटअप म्हणणे, पत्रकार परिषदेत पत्रकाराला विनाकारण नडणे याबाबतीत त्याने सचिनला कॉपी करण्याचा किमान प्रयत्न करावा. तोही अपयशाच्या पेâNयात अडकला होताच त्याच्या कारकीर्दीत; पण मैदानावर जाऊ दे, ड्रेसिंग रूममध्येही त्याने कधी आदळआपट केली नाही. दुसरं म्हणजे नुसता फॉर्म गेला ‘हा’ निष्कर्ष धोकादायक असतो. काय चुकतंय हे पाहायला हवं. आऊट स्विंगच्या अपेक्षेने खेळताना दोनदा तो इन स्विंगरवर बाद झाला. तो अॅक्रॉस खेळला हे खरंय, पण आयुष्यात पहिल्यांदा नाही. त्या फटक्यावर त्याने अनंत धावा जमवल्या आहेत. विराटने लक्षात ठेवावं की, तो फलंदाजीला आल्यावर जगात कुठेही आऊटस्विंगर त्याची वाट पाहत असणारच. दुसरं म्हणजे, आऊट स्विंगरवर बाद होणारा तो पहिला फलंदाज नाही. आमचा वासू परांजपे म्हणतो की, ‘जगात आऊटस्विंगर नसता तर सर लेन हटनने दोन लाख तीस हजार पाचशे पंचवीस धावा केल्या असत्या. विराट लहान असताना सचिन एकदा ऑस्ट्रेलियात आऊटस्विंगरवर बाद होत होता. त्याने सिडनीच्या खेळातून कव्हरड्राइव्हच काढून टाकला. फक्त ऑनला धावा केल्या. त्यासुद्धा तब्बल 241 नाबाद. आत्मविश्वास आल्यावर पुन्हा ऑफचे फटके त्याच्या पायावर लोळायला लागले. धावांच्या दुष्काळातून बाहेर पडायला आदळआपटपेक्षा हे जास्त योग्य असतं. धावांच्या दुष्काळात कर्जमाफीची सोय नाही. स्वत:च मेहनत घ्यावी लागते. त्याने डोक्यातून आऊटस्विंगरचं भूत काढावं.

रहाणे तर अविश्वसनीय खेळला. पहिल्या कसोटीत तो चांगला वाटला. दुसNया कसोटीत दुसNया डावात तो काय करीत होता? त्याची स्ट्रॅटेजीच कळत नव्हती. जगात तो कुठे गेला तरी त्याच्या ताटात बाऊन्सर येणार. व्हॅगनर त्यासाठीच होता. कसा बाद झाला… प्रतिकारांनाही शिस्त असते. तो विहारी पहिल्या डावात चौकार ठोकत सुटला आणि इतका वाहवला की, पायावर कुNहाड मारून घेतली. हे कसोटी क्रिकेट आहे, टी-20 नव्हे! पंत हा निवड समिती विंâवा टीम मॅनेजमेंटपैकी कुणाला तरी दत्तक गेलाय. नाहीतर तो अजून हिंदुस्थानी संघात नसता.

न्यूझीलंडची गोलंदाजी खतरनाक नव्हती. बोल्ट सोडला तर त्यांच्याकडे जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज नाही. उसळते चेंडू आणि मधून ऑफ स्टंपचा वेध घेऊन पुढे सोडलेले चेंडू यावर हिंदुस्थानी फलंदाजांना त्यांनी लोळवले. मानसिकदृष्ट्या हिंदुस्थानी फलंदाज आधीच बॅकपूâटवर होते. त्यांना अचानक प्रंâटपूâटवर आणून चुका करवल्या जायच्या. नाहीतर बाऊन्सरच्या ट्रॅपमध्ये ते स्वत:च्या पायाने चालत जायचे. हिंदुस्थानी गोलंदाजीचं दु:ख मला जास्त वर्मी लागलं. गेल्या चार वर्षांत हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजी जगभरात उत्तर परफॉर्मन्स देत होती. बॅकअपसाठी गोलंदाज होते. एक बुमराह अयशस्वी ठरल्यावर गोलंदाजी विषारी दातच पडल्यासारखे झाले. इशांत खेळतो तेव्हा उंचीने तो बाऊन्स चांगला मिळवतो, पण तो अनफिट किती वेळा होतो? तो फिट असेल तेव्हा सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. देशाला निदान फिट इशांत नीट पाहता येईल. न्यूझीलंड खेळपट्ट्यांना साजेसा टप्पा हिंदुस्थानी गोलंदाजांना सापडलाच नाही. एक विल्यमसन सोडला आणि टेलरचा अनुभव, तर न्यूझीलंडच्या फलंदाजीत जागतिक दर्जाचा फलंदाज होता कोण? दोनदा तळाच्या फलंदाजांनी मॅच फिरवली.

असो, कबूतराचा गरुड पुन्हा व्हायचा असेल तर पूर्ण विश्लेषण होऊन नव्या दमाने उभं राहावं लागेल. पुन्हा हिंदुस्थानात जिंकल्यावर कॉलर वर करून फिरण्यात अर्थ नाही. या पराभवानंतर आपल्याला शेंडीला गाठ मारणारा चाणक्य हवाय. आपला चाणक्य कधी शेंडीला गाठ मारणार?

आपली प्रतिक्रिया द्या