रंगमहर्षी गोपीनाथ सावकार!

513

>> कीर्ती शिलेदार

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांची आज (12 जाने.) 110वी जयंती आहे त्यानिमित्त…

रंगभूमीवर नितांत प्रेम करणाऱया सावकारमामांना मी आणि लता लहानपणापासून पाहतो आहोत. नाटक म्हणजे त्यांचा प्राण! ‘रंगदेवता हिंदू उर्दू मराठी थिएट्रिकल कंपनी’ ही रंगदेवता पदवी मिळालेल्या रघुवीर सावकारांची संगीत नाटक मंडळी. याच मंडळीमध्ये वसंतराव सावकार व गोपीनाथराव सावकार यांची कारकीर्द घडली. बहरत गेली. सगळे सावकार बंधू आपल्या नैसर्गिक अभिनय शैलीने स्वतःचे स्थान रंगमंचावर गाजवत होते.

रघुवीर सावकारांची रेवती तर रसिकजनांनी मनःपूर्वक डोक्यावर घेतली होती. घडय़ाळ लावून केवळ सात मिनिटांत ते रेवतीची रंगभूषा व वेशभूषा आटोपून एण्ट्री घेत आणि एण्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होत असे. हे आमच्या नानांनी (जयराम शिलेदारांनी) आम्हाला सांगितले होते. आमच्या नानांनी याच नाटकमंडळीत सोळाव्या वर्षी बेळगाव मुक्कामी प्रवेश केला. त्यांची रंगमंचीय कारकीर्द घडत गेली, शिकायला मिळाले, त्यांची आणि वसंतराव, गोपीनाथराव यांची गट्टी जमली. गोपीनाथराव नट म्हणून जसे उत्तम होते तसे फुटबॉलपटूही होते. फावल्या वेळात ते फुटबॉलच्या मॅचेस खेळत.
एकदा एक खेळाडू कमी पडत होता तर त्यांनी नानांना बोलावले. फुटबॉलचा खेळ नानांना मुळीच माहीत नव्हता. प्रतिस्पर्धी संघाने नवा खेळाडू नेमका हेरला आणि नानांना लक्ष्य केले.

नानांना जोरात धक्का मारला. नाना कळवळले. याचा मामांना (गोपीनाथ सावकार) यांना खूप राग आला. त्यांनी त्वेषाने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर प्रतिहल्ला करून त्यांचे तीन खेळाडू गारद केले, पण हा प्रकार रघुवीरदादांना कळल्यावर ते रागावले. पहिलं नाटक खेळायचं…त्याला धडधाकट नट लागतो. हा लाथालाथीचा खेळ बंद!

सावकार-शिलेदार ऋणानुबंध हा इतका पूर्वीपासूनचा आहे. फिरत्या नाटक मंडळय़ा बंद झाल्यावर मामांनी मुंबईला त्यांच्याकडे सराफ यांच्याकडे राहायला गेले. ‘कलामंदिर’ ही नाटय़संस्था त्यांनी स्थापन केली. त्याद्वारे जुन्या-नव्या संगीत नाटकांची निर्मिती ते करू लागले. ह. रा. महाजनींचे ‘शकुंतला’ नाटक त्यांनी रंगमंचावर आणले. त्यात कान्होपात्रा, थोर गायक वसंतराव कुलकर्णी, आमचे नाना, आशालता असे कलाकार होते. पुढे काही काळ अडचणीमुळे नानांनी कण्वाऐवजी दुष्यंताची भूमिका करायला सुरुवात केली.

विद्याधर गोखले लिखित ‘सुवर्णतुला’ हे नाटकही मामांनी रंगमंचावर आणले. कान्होपात्रा, प्रसाद सावकार आणि नारदाच्या भूमिकेत छोटा गंधर्व होते…संगीतही त्यांचेच होते, पण काही कारणाने प्रयोगाला गर्दी होईना. छोटा गंधर्व नाराज झाले. ‘हे नाटक चालणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरीरेघ आहे. नाटक बंद करण्यातच भलं आहे.’ असं पत्र मामांना पाठवले. मामा संतापले आणि त्यांनी ते पत्र गोखलेअण्णांना(विद्याधर गोखले) दाखवले. अण्णांनी ते चॅलेंज स्वीकारले आणि ‘सुवर्णतुला’ नाटक मा. दामले जयमाला शिलेदार, रामभाऊ मराठे, प्रसाद सावकार, दत्ता भट या नटमंडळीत बसवले आणि यशस्वी करून दाखवले. नवनिर्मिती करणाऱया निर्मात्याला किती अडचणींना सामना करावा लागतो ते दुःख मामांना सहन करावे लागले होते.

मामांना मधुमेहाचा त्रास होता. त्यात त्यांना एक पाय गमवावा लागला होता. त्याही अवस्थेत त्यांनी रंगमंचावर भूमिका रंगवल्या होत्या. थक्क करून टाकणारे साहस मामांनी दाखवले होते. मामांनी आमचे तीन शिलेदारांचं बालपणी केलेले ‘सौभद्र’ पाहिले होते. तेव्हापासून आम्हा दोन्ही बहिणींवर त्यांनी खूप माया केली. आम्ही कधीही त्यांच्याकडे गेलो की ते आणि मामी आमचे खूप लाड करायचे. ‘संगीत शारदा’ नाटकाची त्यांनी निर्मिती केली. त्यात रामदास कामत, परशुराम सामंत, मा .दत्ताराम बापू, श्रीपादराव नेवरेकर, शंकर घाणेकर अशा दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळाली.
मुलींचे प्रवेश त्यांनी इतके सुंदर बसवले होते की, रसिकांची भरभरून दाद मिळत असे. साध्या पोष्टकार्डवर प्रयोगांची, नाटय़गृहांची तारीख वेळ अशा सूचना असलेली…तिरप्या अक्षरांतील पत्रे मिळाली की, लता आणि मी आनंदाने उडय़ा मारत असू!

मामांकडून संवादातले बारकावे, नाटय़मयता शिकण्याची संधी मिळाली याचे ऋण विसरू शकत नाही. मामांनी कलामंदिरतर्फे निर्मिती केलेली, अत्यंत दर्जेदार कलाकृती म्हणजे वि. वा. शिरवाडकर लिखित ‘ययाती आणि देवयानी’! लता कर्नाटकींनी साकारलेली देवयानी, कान्होपात्रा यांची शर्मिष्ठा, दत्ताराम बापूंचा ययाती, परशुराम सामंतांचा ‘यती’! पहिल्यांदा विदूषक म्हणून छोटू सावंत आणि नंतर अशोक सराफ आणि कचाच्या भूमिकेत रामदास कामत! काय प्रयोग व्हायचा! बापूंची स्वगते, कान्होपात्राबाईंची करुणरसपूर्ण पदे, लता कर्नाटकींची तेजस्वी देवयानी, सामंतांचा भ्रमिष्ट यती…सर्वात सुंदर रामदास कामतांची पदे आणि दमदार एण्ट्री!…एण्ट्रीला टाळ्याच पडायच्या.

दिग्दर्शकाची अचूक नजर असेल तर नाटकाची रंगत खणखणीतपणे रसिकांना तृप्त करीत असे. अभिषेकीबुवांचे अप्रतिम संगीत…सगळ्या सुंदर गोष्टींचा जणू उत्सवच होता. लताला आणि मला काही प्रयोगांचा अनुभव घेता आला, ते क्षण आम्हाला आनंददायी होते!
मामा प्रत्येक प्रयोगाला हजर राहत. त्यांना काळजीपूर्वक नाटय़गृहावर नेण्याआणण्याची जबाबदारी त्यांचे भाचे सुभाष सराफ घेत असत.
सुरुवातीपासून शेवटापर्यंत संपूर्ण नाटक मामा पाहात असत. रंगमंचावर घडणाऱया प्रयोगाचे प्रतिबिंब मामांच्या चेहऱयावर दिसत असे.
प्रयोग रंगतदार झाला तर त्यांच्या चेहऱयावर समाधान विलसत असे. काही चुकलं-बिकलं तर वैतागत असत आणि त्यांचे चंदेरी केस त्यांच्या हातांनी सतत विस्कटले जात. चुकलेल्या नटांना आत आल्याबरोबर तंबी मिळत असे.
संगीताचा उत्तम काळ असल्यामुळे गायक कलाकारांना वाहवाची शाबासकी …गाणं लांबले तर ओरडा, शब्दांची चूक केली तर क्वचित धपाटाही मिळे!
साथीदारांवरही त्यांची करडी नजर असे.
नाटकामध्ये रंगून गेलेले दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणजे गोपीनाथ सावकार! अशा असामान्य व्यक्तीला आम्ही भेटू शकलो, त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकलो, त्यांच्या कलामंदिरच्या प्रयोगात भाग घेऊ शकलो हा जणू देवाचा आशीर्वाद होता!

(लेखिका ज्येष्ठ गायक-अभिनेत्री असून 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.)

आपली प्रतिक्रिया द्या