इनर मंगोलियामध्ये चीनचे अत्याचार

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

आंतरिक मंगोलिया (किंवा इनर मंगोलिया) हा चीनच्या उत्तर भागातील मंगोलिया देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे, जो चीनमध्ये अनेक वर्षांपूर्वी सामील झाला होता. इनर मंगोलियात मंगोलांची लोकसंख्या आधी 60 लाख इतकी होती. मात्र चिनी सरकारने तब्बल पाच लाख मंगोलांची अतिशय निर्दयतेने हत्या केली. त्यानंतर एक मूल धोरण अतिशय निर्दयी पद्धतीने राबवण्यात आले. परिणामी आज इनर मंगोलियातील मंगोलांची लोकसंख्या कमी होऊन ती केवळ 15 लाखांवर येऊन ठेपली आहे. आता चीनने उरल्यासुरल्यांवर सांस्कृतिक व आर्थिक दडपशाही सुरू केली.

मंगोलिया हा पूर्व व मध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन आहे. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ 1.75 प्रति वर्ग किमी इतकीच आहे व लोकसंख्या 33-35 लाखांच्या आसपास आहे.

20 ऑक्टोबर 1945 रोजी देशात सार्वमत घेऊन मंगोलिया प्रजासत्ताक हे सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले होते. रशिया-चीन संबंध बिघडत गेले व मंगोलिया प्रजासत्ताकाचे चीनशी असलेले संबंधही बिघडू लागले. चीनमधील मंगोल लोकांना चीनकडून फार वाईट वागणूक दिली जाते अशी तक्रार मंगोलिया प्रजासत्ताकाने केली.

मंगोलियाचा एक भाग इनर मंगोलिया काही ऐतिहासिक कारणामुळे चीनचा भाग बनला. आज मंगोलियन जनता ही चीनमधली मुख्य जमात हन चायनीजपेक्षा पुष्कळच वेगळी आहे. आज चीनची दहा टक्के लोकसंख्या ही अल्पसंख्याक आहे. मुस्लिम किंवा मंगोलियाचे बौद्ध धर्मीय या सगळ्यांवर चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात अत्याचार होत आहेत आणि त्यांच्या संस्कृतीवर एक मोठा आघात केला जात आहे.

80च्या दशकात चिनी कम्युनिस्ट सरकारने मंगोलांच्या संस्कृतीवर आक्रमण केले आणि लाखो शेतकऱयांना अमानुष यातना दिल्या, त्यांना अधिकारहीन केले. स्थानिकांना गेल्या दोन दशकांपासून शेतीसाठीचा जमीन वापर प्रतिबंधित केला. गवताळ प्रदेशात राहणे गुन्हा मानले गेले. आपल्याच जमिनीवर गुरे चारणाऱया गुराख्यांना कैदेत टाकले. सोबतच चीनने इनर मंगोलियाच्या सीमा भागात राहणाऱया भटक्या विमुक्तांचे नामोनिशाण मिटवून टाकले.

चिनी सरकारला इनर मंगोलियावरील मंगोलांच्या किंवा बिगर हान वंशीयांच्या संस्कृतीचा प्रभाव संपूर्णपणे संपवायचा आहे. त्यामुळे हान वंशीयांचे आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार तेथे प्रस्थापित होईल, परंतु ते केवळ नरसंहार, कत्तलीतून साध्य होणार नाही, तर त्यासाठी मंगोलांवर भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक असे चहूबाजूंनी अतिक्रमण केले जात आहे. या विषयावर शेकडो व्हिडीओ यूटय़ूब आणि इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

चीनने मंगोलांची ओळख मिटविण्यासाठी नुकतीच नवी भाषिक नीती अमलात आणली. त्यानुसार इनर मंगोलियातील शाळांमध्ये आता स्थानिक भाषेतून नव्हे, तर मांदारिन भाषेतून शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र मंगोल संस्कृतीवर चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून होणाऱया या अंतिम वाराविरोधात स्थानिक एकजुटीने विरोध करत आहेत. कारण मंगोलांची पारंपरिक वर्णमाला असून रशियाच्या प्रभावाने ते सीरिलिक लिपीचा वापर करतात. पण मांदारिन लादल्याने त्यांची भाषा व लिपी दोन्ही नष्ट होईल.

म्हणूनच प्राथमिक शाळांतील मुलांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत, कलाकारांपासून कामगार, सरकारी अधिकाऱयांपासून पक्ष सदस्यांपर्यंत प्रत्येकाने चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या सांस्कृतिक हल्ल्याला जोरदार विरोध सुरू केला आहे. मंगोलांच्या मनात चिनी सरकारविरोधात इतका राग, क्रोध, आक्रोश आहे की, मनाई करूनही ते रस्त्यावर उतरत असल्याचे दिसते.

विरोध करणाऱया अनेक निदर्शकांना अटक करण्यात येत असून नंतर ते गायब होणे ही तर इथली सामान्य बाब झाली आहे. गेल्या महिनाभरात जवळपास चार ते पाच हजार मंगोलांना चिनी अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांचा पत्ता कोणालाही लागला नाही. दुसरीकडे इनर मंगोलियातील स्थानिक प्रशासन व राज्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि सरकारी अधिकाऱयांना चिनी कम्युनिस्ट पक्षावरील आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी मंगोलांचा विरोध मोडून काढण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मंगोलांचा विरोध दडपण्यासाठी आता इथे लोकांना नोकरीवरून काढून टाकणे, सामाजिक योजनांचा लाभ घेणाऱयांना निलंबित करणे, कर्जापासून वंचित ठेवणे, धनसंपत्ती जप्त करणे, विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रापासून वंचित ठेवणे असे प्रकारही केले जात आहेत, जेणेकरून स्थानिकांवर नियंत्रण ठेवता येईल.

हिंदुस्थान आणि मंगोलिया यांच्यात संबध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगोलिया भेटीनंतर हिंदुस्थान आणि मंगोलिया यांच्यातील नव्या मैत्री पर्वाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये आध्यात्मिक संबंध व संरक्षण विषयावरदेखील महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ऊर्जा, सूचना व प्रसारण, हवामानशास्त्र्, पायाभूत सुविधा आणि सेवा अशा वेगवेगळ्या विषयांच्या करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या.

दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि सुविधांचे आदानप्रदान होण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. बौद्ध धम्म हा दोन्ही देशांच्या मैत्रीमधला एक अत्यंत महत्त्वाचा धागा आहे. बौद्ध धर्माचा उगम हिंदुस्थानी भूमीत झाला. त्यानंतर तो जगभर पसरला. मंगोलियामध्येदेखील बौद्ध धर्माला अत्यंत महत्त्वाचे आणि आदराचे स्थान मिळाले आहे. त्यामुळेच हिंदुस्थान आणि मंगोलिया यांच्यात सांकृतिक संबंधदेखील जोडले गेले आहेत.

चीन हिंदुस्थानच्या शेजारी राष्ट्रांमध्ये नेहमीच ढवळाढवळ करत असतो. चीनच्या जमिनी सीमासुद्धा 18 राष्ट्रांना लागलेल्या आहेत. म्हणून आपणसुद्धा चीनच्या सीमेला लागलेल्या राष्ट्रांशी मैत्री करून जर कधी गरज पडली तर चीनला त्यांच्यामार्फत शह देऊ शकतो. म्हणूनच हिंदुस्थानने मंगोलियाशी आपली मैत्री अजून जास्त वाढवण्याची गरज आहे.

इनर मंगोलियामध्ये चीनकडून होणाऱया मानवाधिकार भंगांना हिंदुस्थानने युनायटेड नेशन्स हय़ुमन राइट्स कमिशनमध्ये उठवणे गरजेचे आहे. इनर मंगोलियामधील अत्याचारांची परिणती कितपत मोठय़ा व प्रदीर्घ संघर्षात होते हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र, जो देश स्वतःच्या नागरिकांवर इतके अत्याचार करतो, तो अन्य देशांबाबत काय काय करू शकेल याची कल्पनाही करवत नाही. फक्त ही बाब नेपाळ किंवा चीनच्या इतर शेजारी देशांनी समजून घ्यावी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या