
>> भावेश ब्राह्मणकर, [email protected]
आशिया खंडातील पिटुकला देश असलेल्या मालदीवमधील शाहिना अली या महिलेला प्रतिष्ठीत रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. तिचं कार्य नक्की काय, मालदीव किंवा जगाला त्याचा काय फायदा होत आहे हे जाणून घेऊ या…
भारतापासून जवळच असलेले आणि हिंदी महासागरात वसलेले मालदीव हे बेट 26 प्रवाळ टेकडय़ा आणि जवळ जवळ 1,200 प्रवाळ बेटांनी बनलेले आहे. पर्यटनासाठी जगविख्यात असलेल्या या बेटाला भेट देण्याची अनेकांची इच्छा असते. मालदीवची संस्कृती समुद्राशी खोलवर जोडलेली आहे.
निसर्गसंपन्न अशा मालदीवला मात्र नजर लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खास करून प्लास्टिकने घातलेला अजगरी विळखा संपूर्ण बेटाला, तेथील समुद्रकिनारे आणि समुद्राच्या पाण्यालाही अनन्वित प्रदूषित करीत आहे. त्यामुळे सागरी परिसंस्था, अर्थव्यवस्था आणि मालदीवकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा धोका जमीन आणि समुद्र दोन्हीवर आहे. या साऱ्या स्थितीने अत्यंत अस्वस्थ झाली ती शाहिना अली ही तरुणी. यासंदर्भात ठोस काही तरी करायला हवे असा चंग तिनं बांधला. लहान मुले आणि शाळा येथे जाऊन तिने प्रबोधनाला सुरुवात केली. प्लास्टिकमुळे आपल्या भोवती काय घडत आहे हे सारे ती सांगू लागली. लहानग्यांपासून मोठय़ांपर्यंत साऱ्यांनाच प्लास्टिकचे धोके कळाले. मात्र पुढे काय? असा प्रश्न शाहिनासमोर निर्माण झाला. केवळ जनजागृती करून फार काही होणार नाही. त्यास योग्य अशा कृतीची जोड द्यावी लागेल, हे एव्हाना तिला कळून चुकले होते. म्हणूनच तिने पार्ली या आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता मोहीम आरंभली.
शाहिना म्हणते, “प्लास्टिक हे मालदीवसारख्या माझ्या निसर्ग खजिन्यासाठी एक दुःस्वप्न बनून आले आहे. योग्य कचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे शेकडो टन कचरा निर्माण होत आहे. मी स्वत एक फोटो जर्नलिस्ट आणि डायव्हिंग प्रशिक्षक आहे. समुद्राच्या पाण्यात तरंगणारा कचरा, कचऱ्याने भरलेल्या लाटा किनाऱ्यांवर धडकणे आणि मृत मासे तसेच मृत कोरल पाहून जीव कोंडतो. हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.”
शाहिनाने 2015 मध्ये `पार्ली फॉर द ओशन्स’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. समुद्री आणि वापरायोग्य पाण्याचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी तसेच प्लास्टिक कचरा लोकांसाठी उपयुक्त स्रोतात रूपांतर करण्यासाठी एक व्यापक कार्पाम तिने आखला. त्यावर व्यापक पद्धतीने काम सुरू केले. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा उपाम आता चळवळ बनला आहे. जनजागृती मोहीम, स्वाक्षरी उपाम राबविल्यानंतर प्लास्टिक गोळा करणे हासुद्धा कार्पाम घेण्यात आला. `चांगल्या वातावरणासाठी प्लास्टिक टाळा, त्यास रोखा आणि त्याचा पुनर्वापर करा,’ असे ब्रिद त्यांनी तयार केले आणि आता ते मालदीवमध्ये सर्वदूर पोहोचले आहे.
स्वयंसेवक, स्थानिक व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था, शाळा आदी या चळवळीत जोडले गेले आहेत. मोठय़ा प्रमाणात स्वच्छता, शैक्षणिक कार्पाम आणि पुनर्वापर उपाम राबविले जात आहेत. बेटावरील सत्तरहून अधिक शाळा या प्लास्टिक संकलन केंद्र बनल्या आहेत. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यावरही भर दिला जात आहे. या सर्वांचे परिणामही दिसून येत आहेत. शाहिनाला जाणीव आहे की, तिच्या देशाचे स्वच्छ आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी पाण्यात व बाहेर दोन्ही ठिकाणी बरेच काही करावे लागेल. गेल्या दहा वर्षांतील कार्याची तपश्चर्या फळास येत आहे. प्लास्टिकविषयी प्रचंड जनजागृती मालदीवमध्ये झाली आहे आणि होत आहे. शाहिना सांगते की, “आपण फक्त एका समस्येचे निराकरण करू शकत नाही. आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कारण सर्वकाही समुद्राशी जोडलेले आहे. आपला देश फक्त 1 टक्के जमिनीने बनलेला आहे. उर्वरित 99 टक्के समुद्राने व्यापलेला आहे. हवामान बदलामुळे अनेक संकटे येणार आहेत. आपण त्यासाठी तयार रहायला हवे. सुरुवात आपण स्वतपासूनच करायला हवी.” तिच्या बोलण्याने मालदीववासीय भारावून जातात. त्यामुळेच तिला दिवसागणिक प्रतिसाद वाढतो आहे. तिच्या या कार्याची दखल रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीने घेतली आहे.
शाहिनाने अनेक संकटे आणि अडथळ्यांना तोंड दिले आहे. काहींचे टोमणे ऐकले, काहींचे वाईट वर्तन, तर काहींच्या शिव्या. मात्र ती डगमगली नाही. कुणी हेटाळणी केली तरी तिचा संयम ढळला नाही. शांतपणे तिने आपले कार्य चालू ठेवले. त्यामुळेच आज हजारो नागरिकांमध्ये प्लास्टिकबाबत जनजागृती करण्याचे यश तिला पाहता आले आहे. संयुक्त राष्ट्राने 2025 हे वर्ष समुद्री प्लास्टिक प्रदूषण यासंदर्भात जनजागृतीसाठी साजरे करण्याचे ठरविले आहे. त्यानुषंगाने जगभरात असंख्य कार्पाम, स्पर्धा होत आहेत. मॅगसेसे पुरस्कार समितीने याचाही विचार शाहिनाची निवड केली आहे. आशिया खंडातील नोबेल समजला जाणारा हा पुरस्कार तिला जाहीर झाल्याने जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र “हा पुरस्कार माझा नाही, तर माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्वांचा आहे. आशियातील सर्वात लहान देश कदाचित सर्वात मोठा प्रदूषणविरोधी चॅम्पियन बनेल,” असा आशावाद ती व्यक्त करीत आहे.
(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)