कमलाकर नाडकर्णी

> प्रशांत गौतम

कमलाकर नाडकर्णी हे नाटक समृद्ध करणारे समीक्षक होते. गेली पन्नासेक वर्षे ते या क्षेत्राशी निगडित होते. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी शेकडो नाटकांवर विपुल प्रमाणात लिहिले. ठोकून काढणारे, डोक्यावर घेणारे आणि प्रशंसा करणारे जसे लिहिले तसेच परखड मत व्यक्त करणारेही लिहिले. एका काळात साहित्य, कला क्षेत्राला ज्ञानेश्वर नाडकर्णी परिचित होते आणि नाटक क्षेत्राला कमलाकर नाडकर्णी. दोन्ही नाडकर्णींनी आपापल्या लेखन प्रांतात वैचारिक दबदबा कायम ठेवला. या अवखळ, खेळकर आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वामागेही एक गंभीर नाटय़ भूमिका लपली होती.

विविध वृत्तपत्रांतून सुमारे 55 ते 60 वर्षे सातत्याने त्यांनी नाटय़ समीक्षा केली. नाटककार, नाटय़कर्मी, नेपथ्य, नाटय़ कलावंत नि नाटय़ प्रेक्षक घडवण्याचे काम त्यांच्या नाटय़ समीक्षेतून केले. अनेक मराठी नियतकालिकांत त्यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या नाटय़ समीक्षेमुळेच नाटक पाहण्याची, वाचण्याची गोडी लागली. राज्य नाटय़ स्पर्धा तसेच अन्य नाटय़ आणि एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले होते. त्यांचे नाटय़ परीक्षण अतिशय मुद्देसूद नि नेमकेपणाने केलेले असे. त्यामुळे नाटय़ लेखकांबरोबरच कलावंत, प्रेक्षकांनाही नाटक समजून घेण्यास मदत होई. नाटय़ समीक्षा करताना त्यांनी नाटय़ क्षेत्रातील जवळच्या मित्रांनाही झुकते माप दिले नाही. ‘‘वर्तमानपत्री नाटय़ परीक्षण ही खरी नाटय़ समीक्षा नव्हे’’ असे ते म्हणत असत. बालनाटय़ांतून रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या आणि पुढे राज्य नाटय़ स्पर्धा आणि मुख्य धारेतील रंगभूमीवर नट तसेच अनुवादक म्हणून सक्रिय योगदान देणाऱ्या कमलाकर नाडकर्णी यांनी नंतर आपला मोहरा नाटय़ समीक्षेकडे वळवला. रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड आवड आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला. अलीकडेपर्यंत त्यांनी प्रकृती साथ देत नसतानासुद्धा नाटक पाहणे सोडलेले नव्हते. नाडकर्णी यांनी वृत्तपत्रीय समीक्षेला प्रतिष्ठा आणि दर्जा प्राप्त करून दिला. वृत्तपत्रीय कामाच्या धबडग्यातही नाटकाचे परीक्षण लिहिताना संहितेचे वाचन, नाटय़ विषयाशी संबंधित अधिकची माहिती मिळवणे, त्याबद्दलचं चिंतन-मनन या गोष्टी नाडकर्णी आवर्जून करीत असत. यातून त्यांच्या समीक्षेला खोली प्राप्त झाली होती. गांभीर्यपूर्वक वृत्तपत्रीय समीक्षेचा त्यांचा हा वारसा पुढच्या काळात प्रशांत दळवी, जयंत पवार यांनी समर्थपणे पुढे नेला, असे म्हणतात. प्रायोगिक नाटकांकडे मात्र ते काहीसे सहानुभूतीने पाहत. त्यांच्या तलवारबाज समीक्षेपायी त्यांच्यावर प्रसंगी आरोपही केले गेले; पण प्रसंगी त्यांनी आपल्या जवळच्या मित्राचाही मुलाहिजा ठेवला नाही. ‘जाणता राजा’ या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महानाटय़ामागे एक विचार होता. मात्र, कमलाकर रावांनी समीक्षेच्या फुटपट्टय़ा लावून समीक्षा लेखनात खरपूस समाचार घेतला. या कार्यक्रमावर ‘द ग्रेट बाबासाहेब सर्कस’ या मथळय़ाखाली त्यांनी घनघोर झोड उठवली होती.

‘ऑल द बेस्ट’ या नाटकांवर त्यांनी जे अद्वितीय लिहून ठेवले, त्या समीक्षा लेखनाने मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडून गेला. चंद्रलेखाच्या ‘स्वामी’ नाटकाचे त्यांनी ‘शनिवारवाडय़ाचा स्वामी’ आणि ‘राजवाडय़ाचा स्वामी’ अशा दोन भागांत सविस्तर परीक्षण लिहिले होते हे नाटय़ रसिकांना आठवत असेलच. नाडकर्णी शनिवार-रविवारी बाहेरगावी जाऊन तिथे होणारे ‘नाटय़ प्रयोग’ आवर्जून पाहत असत. रंगभूमीवरील चर्चा, परिसंवादांतून हजेरी लावत असत. काही काळ त्यांनी चित्रपट समीक्षाही केली. त्यांच्या लेखणीने अनेक जण दुखावले असल्याने नाटय़ कर्तृत्व असूनही नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मात्र त्यांच्या नावाला कायम विरोध होत राहिला. या पार्श्वभूमीवर नाटय़ परिषदेने त्यांच्या नाटय़ क्षेत्रातील योगदानाचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करणे हा त्यांच्यातल्या नाटकाच्या ‘पॅशन’चाच गौरव होता.

‘महानगरीचे नाटक’, ‘राजा छत्रपती’ (बालनाटय़), ‘नाटकी नाटक’ यांसारखी त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. क्रीडा समीक्षक वि. वि. करमरकर यांच्यापाठोपाठ आणखी एका ज्येष्ठ नाटय़ समीक्षक पत्रकाराचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या निधनाने आपण नाटक समृद्ध करणारा समीक्षक गमावला आहे.