खाऊच्या गोष्टी – गारेगार आईस्क्रीम

>> रश्मी वारंग

उन्हाळा वाढत जातो आणि आपला त्रागाही. या उन्हाच्या कहराला रोखण्याचे सामर्थ्य असणारा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. जगभरात सर्वत्र लोकप्रिय अशा आईस्क्रीमची ही कहाणी.

लोकप्रिय पदार्थाचा उगम आपल्या देशात झाला हे सांगायला उत्सुक अनेक जण असतात. तसाच दावा आईस्क्रीमबाबत होतो. चीनमध्ये फार पूर्वी भात व दूध यांच्या मिश्रणातून आईस्क्रीमसदृश पदार्थ तयार केला जात असे. प्रसिद्ध खलाशी मार्कोपोलो अतिपूर्वेच्या देशांचा प्रवास करून इटलीत परतला तेव्हा त्या प्रदेशातील काही खास पदार्थ त्याने सोबत आणले. यातच आईस्क्रीमच्या पाककृतीचाही समावेश होता. आज ज्या पदार्थाला आपण आईस्क्रीम म्हणतो ते त्या काळात मात्र ‘क्रीम आईस’ होते. उन्हाळय़ाच्या काळात स्वीटक्रीम किंवा कस्टर्ड थंड करण्यासाठी बर्फाचा वापर केला जायचा. तेच हे क्रीम आईस. एका दाव्यानुसार चीनच्या शांग राजवंशाचा राजा तंग याने 618 इसवी मध्ये आईस्क्रीम बनविण्यासाठी खास 94 आचारी ठेवले होते. ते बर्फ फोडून त्यात विविध पदार्थ घालून आईस्क्रीम बनवीत असत.

मार्कोपोलोमुळे इटलीत आईस्क्रीमबद्दल उत्सुकता निर्माण झाली. इटालियन राजपुत्री कॅथरिनमेडीसीचा विवाह फ्रान्सचा राजपुत्र हेन्री दुसरा याच्याशी झाला. ती लग्नानंतर काही इटालियन शेफ आपल्या सोबत घेऊन गेली होती. इटलीकडून फ्रान्सकडे आणि मग पुढे जगभर आईस्क्रीमची लोकप्रियता पसरतच गेली. मात्र या सगळय़ात मोठा अडथळा होता बर्फाचा. आज बर्फ तयार करण्याचं तंत्र जितकं सहज अवगत झालंय ते पूर्वीच्या काळी नव्हतं. रोमनसम्राट नीरोने पर्वतातून बर्फ आणून आईस्क्रीम तयार करण्यासाठी खास माणसं ठेवली होती. इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याच्या जेवणानंतरच्या डेझर्ट डिशमध्ये आईस्क्रीमचा समावेश हमखास असायचा, पण आपल्या पोतडीतील ‘फ्रोजन स्नो’ची माहिती कुणाला कळू नये म्हणून तो इतका दक्ष होता की, त्यासाठी त्याने आपल्या शेफला ही पाककृती लपवून ठेवण्याकरिता आयुष्यभर पेन्शनची सोय केली होती. म्हणजे सुरुवातीला आईस्क्रीम ही फक्त राजेरजवाडय़ांना परवडणारी गोष्ट होती. नंतर बर्फाचं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन सुरू झालं आणि आईस्क्रीम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला लागलं.

कपातून मिळणाऱ्या आईस्क्रीमचं कौतुक वाढवायला कारणीभूत ठरला आईस्क्रीम कोन. या आईस्क्रीम कोनचा शोध कसा लागला याची गोष्टही गंमतीशीर आहे.  पहिल्या कोनचे पेटंट 1903 मध्ये इटालो मार्कीओनी याने घेतले, पण 1904 मध्ये प्रसिद्ध सेंट लुईस जत्रेत अर्नेस्ट हेम्वी नावाचा सिरीयन मिठाईवाला कुरकुरीत वॅफल विकत होता. एके दिवशी त्याच्या बाजूला असणाऱ्या आईस्क्रीम विक्रेत्याच्या आईस्क्रीमचा एवढा प्रचंड खप झाला की, त्याच्याकडचे कप, डिश संपून गेले. हेम्वीने त्याला मदत करण्यासाठी आपले वॅफल कोनच्या रूपात बनवून दिले. तात्पुरती सोय म्हणून झालेला हा प्रयोग लोकांना आवडला आणि कोनमधून आईस्क्रीम खाणं प्रसिद्ध झालं.

तसेतर आईस्क्रीमचे अगणित फ्लेव्हर्स, स्वाद जगभरात आवडीने खाल्ले जातात. नवनवे स्वाद शोधले जातात, पण गंमत म्हणजे जगातील सर्वाधिक लोकप्रिय आईस्क्रीम स्वाद व्हॅनिला आहे. व्हॅनिला आईस्क्रीम तसं पाहायला गेलं तर अगदीच साधं, पण सर्वात जास्त खाल्ला जाणारा स्वाद म्हणून व्हॅनिलाचा नंबर लागतो.

गरमीने हाल बेहाल असो किंवा कडाक्याची थंडी, कप किंवा कोनातून आईस्क्रीम समोर आल्यावर केवळ दर्शनाने मनावर गारवा पसरतो. आईस्क्रीमचा चमचा मुखात विसावल्यावर येणाऱ्या थंट लाटेत आपण कधी त्या आईस्क्रीमसारखे विरघळतो कळतच नाही.

आईस्क्रीम हे जगातील सर्वात लोकप्रिय डेझर्ट आहे. आईस्क्रीम खाल्ल्याने तुमची मनोवृत्ती आनंदी होते असे काही संशोधने सांगतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांना आलेलं नैराश्य घालवण्यासाठी त्यांना आईस्क्रीम खाऊ घातलं गेल्याचा संदर्भ मिळतो. त्यासोबतच आईस्क्रीम म्हणजे सेलिब्रेशन. कोणताही प्रसंग साजरा करण्यासाठी आईस्क्रीम कामी येतं. हिंदुस्थानी लग्नसोहळा आणि आईस्क्रीम यांचं अतूट नातं आहे, पण जगात सर्वाधिक आईस्क्रीम खाणारा देश म्हणून न्यूझीलंडचा क्रमांक लागतो.