खाऊच्या गोष्टी -‘टोस्टी’कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

दोन वेळा भाजलेला ब्रेड साधारणपणे टोस्ट म्हणून ओळखला जातो. या टोस्टची जन्मकथा ब्रेडशी जोडली गेली आहे. पिठापासून ब्रेड बनवता येतो हे माणसाला कळलं आणि त्याच्या भटक्या जीवनात स्थैर्य आलं. त्यानंतर इजिप्शियन मंडळींच्या हे सर्वप्रथम लक्षात आलं की, ब्रेड व्यवस्थित भाजून ठेवला तर तो दीर्घकाळ वापरता येतो. वाळवंटी ­­­­­भागात हा ब्रेड उष्णतेने कडक होई, पण तो खाण्यासाठी त्रासदायक ठरे. त्यामुळे किती तापमानावर किती वेळ ब्रेड भाजला की, तो कुरकुरीत राहू शकतो याचा शोध या मंडळींनी घेतला. लॅटिन शब्द ‘टोस्टम’ म्हणजे भाजणे यावरून ‘टोस्ट’ शब्द वापरात येणं अगदी सहज आहे.

हा भाजलेला ब्रेड अर्थात टोस्ट हळूहळू रोजच्या खाण्यात समाविष्ट होत गेला. युनायटेड किंगडममध्ये टोस्ट हा पारंपरिक नाश्त्याचा भाग असल्याने दीडशे वर्षे साहेबाच्या सत्तेत राहणाऱ्या हिंदुस्थानींच्या नाश्त्यात या टोस्टचा समावेश स्वाभाविक होता.

 या टोस्टशी जोडलेल्या काही गमतीशीर पद्धती म्हणजे पाश्चिमात्य देशांत लहान बाळाचे दात येताना आणि बाळासाठी दात शिवशिवत असताना या टोस्टचा ‘टिथर’सारखा वापर केला जातो.

याहीपेक्षा सगळय़ात लोकप्रिय पद्धत म्हणजे विशिष्ट प्रसंग साजरा करताना, पेयपान करताना ग्लासाला ग्लास भिडवून दिला जाणारा टोस्ट. त्या टोस्टचा या टोस्टशी काही संबंध आहे का? असा प्रश्न पडतो, तर निश्चितच हे नातं आहे. पूर्वीच्या काळात रोमन मंडळी पेयपान करताना, विशेषतः वाईन पिताना ग्लासात टोस्टचा तुकडा टाकत आणि नंतर वाईन पित. त्यामुळे चवीत फरक पडतो आणि वाईन प्यायल्याने शरीरात तयार होणारे पित्त शोषून घ्यायला मदत होते अशी त्यांची समजूत होती. त्यामुळे पेयपानाआधी ग्लास उंचावून अभिवादन करण्याला ‘टोस्टिंग’ किंवा ‘टोस्ट करणे’ म्हटले गेले. असा हा टोस्ट विविध स्वादांसह चहाचा साथीदार म्हणून रुळला आहे. त्याचं अस्तित्व न्याहारीपुरतंच मर्यादित आहे. इतर वेळी भूक लागली म्हणून बिस्किटांसारखे आवडीने टोस्ट खाणारे विरळाच, पण तरीही ब्रेडपेक्षा खुसखुशीत, टिकाऊ आणि बिस्किटापेक्षा मजबूत असं मस्त समीकरण जुळवणारा टोस्ट म्हणजे खुसखुशीत न्याहारीची टेस्टी, किंबहुना ‘टोस्टी’ ग्वाहीच!

जगभरात रस्क किंवा टोस्ट खाण्याच्या पद्धती भन्नाट आहेत. श्रीलंकेत करी सूप किंवा पुदिना चहासोबत टोस्ट खाल्ले जातात. दुसऱ्या महायुद्धानंतर तांदूळ टंचाईच्या काळात जपानमधील शाळांमध्ये मुलांना टोस्ट खायला दिले गेले आणि त्यानंतर तिथे तो पदार्थ रुजला. अर्जेंटिनात त्यांना ‘टेबल टोस्ट’ म्हटलं जातं.

फिनलंडमध्ये याच टोस्टला कोरप्पू म्हटलं जातं. हा टोस्ट कॉफीत बुडवून खातात. इराणमध्ये हा टोस्ट ‘नान–ए–सोखरी’ होतो.

टोस्ट हिंदीत ‘खस्ता’, तामीळमध्ये ‘पोराई’, बंगालीत ‘काठी बिस्कीट’ म्हणून प्रसिद्ध आहे.