स्वर्गमंडपाचे वैभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

खिद्रापूरचं मंदिर हे कोपेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर मानलं जातं, पण ते एकटय़ा शंकराचं आहे का? त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. मी पाहिलेलं हे एक अपवादात्मक असं मंदिर आहे, जिथे मुख्य गाभाऱयात दोन देवांचं अस्तित्व आहे- शंकर आणि विष्णू. विष्णू म्हणजे धोपेश्वर. त्यामुळे हे मंदिर तसं कोपेश्वर आणि धोपेश्वराचं आहे. तुम्ही गाभाऱयात प्रवेश केला की, एका छोट्या दगडी उभट शिळेवर लक्ष जातं. त्या शिळेवर चक्क जानवं कोरलंय. तो आहे धोपेश्वर आणि शंकराची पिंडीसुद्धा आहे.

असं काही एखाद्या मंदिरात दिसलं की, त्यातून दंतकथा निर्माण होतात. दंतकथा पसरवणाऱया लेखकाच्या कल्पनेच्या भराऱया मला नेहमीच आवडतात. तर ऐका हे कल्पनेचं उड्डाण.
शंकर हा वर देण्याच्या बाबतीत तसा भोळा आणि उदार देव होता. त्याच्यावर प्रेम करणाऱयांना, खर तरं त्याची भक्ती करणाऱयांना तो चांगले वर देत असे. त्याच्या उदार वराचे दुष्परिणाम वाढले की, मग विष्णूला ते सर्व निस्तरावं लागे. शिवभक्त रावणाने शंकराकडून वर घेतला आणि मग विष्णूला राम होऊन रामायण घडवावं लागलं. इथे त्या मानाने विष्णूचं काम सोपं होतं. शंकराने आपल्या भक्तांना जाहीर केलं की, शंखनाथ (संकेश्वर), बकनाथ (रायबाग) आणि कोपनाथ (खिद्रापूर) या तीन ठिकाणाच्या शिवलिंगांचं दर्शन जो भक्त एका दिवसात करील त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल. अर्थात ज्या काळात ही योजना जाहीर केली, त्या काळात सायकल, गाडी, ट्रेन वगैरे वाहनं उपलब्ध नव्हती. प्रवास जिकरीचा होता, पण स्वर्ग मिळणार यासाठी अनेकांनी हा अट्टहास केला. त्याचा परिणाम असा झाला की, स्वर्गाची लोकसंख्या वाढायला लागली. त्यामुळे स्वर्गातले जे मूळचे रहिवासी देव, ते वैतागले. शंकराचे भक्त झाले म्हणून काय झालं? किती ‘उपरे’ सहन करायचे?

शंकराच्या सीएएविरोधात प्रतिसीएएवाल्यांनी निदर्शनं केली. त्यामुळे मूळ रहिवासी विष्णूला शरण गेले. विष्णूने काय केले असेल? तो कोपनाथात आला आणि राहिला. त्याने कोपेश्वराच्या मंदिरात आपलं अस्तित्व शिवलिंगापेक्षा अंमळ जास्त असेल असं पाहिलं. त्यामुळे देवळात शिरल्यावर पहिली नजर विष्णूकडे जाते आणि मग शंकराकडे. त्यामुळे वर भंग होतो. स्वर्गात येणारे ‘उपरे’ थांबले.

या मंदिराची अनेक वैशिष्टय़े आहेत. त्यात आहे तिथला स्वर्गमंडप. मी स्वर्गमंडप ही कन्सेप्ट असलेली देवळं फारशी पाहिलेली नाहीत. सर्वसाधारणपणे देवळात गाभारा असतो. त्याला लागून सभामंडप असतो. इथे सभामंडपाला लागून स्वर्गमंडप आहे. हा स्वर्गमंडप अठ्ठेचाळीस खांबांवर उभा आहे आणि चार दिशांना चार प्रवेशद्वार आहेत. त्यातली विस्मयकारक गोष्ट म्हणजे छताला चक्क तेरा फूट व्यासाचं गवाक्ष आहे. गवाक्ष म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर भोक. त्यातून थेट वरचं निळं आकाश दिसतं आणि बरोबर त्याच्या खाली 13 फूट व्यासाची गुळगुळीत मशीनने पॉलिश केलीय असं वाटावी अशी शिळा आहे. तिचा व्यासही बरोब्बर 13 फूट! मोठय़ा पांढऱया कागदावर एक तेरा फुटांचं वर्तुळ काढून ते बरोबर कापून तेरा फुटांचं वर्तुळ बाहेर काढणं मला कदाचित जड जाईल. इथे काताळात वर्तुळ कापलंय. एखाद्या भाविक माणसाला ते वर्तुळ कापणारे हात दैवी वाटले तर आश्चर्य वाटू नये. त्या गोल शिळेभोवती बारा गोलाकार खांब आहेत, पण त्याला गोलाकार तरी कसं म्हणायचं? कारण ते खांब कधी अष्टकोनी, कधी षटकोनी, कधी चौकोनी, कधी गोल वाटतात. याच खांबाने थेट आसमंत दाखवणारं गवाक्ष तोललंय. ‘‘खांब नुसता उभा केला तर चाबकाचे फटके मिळतील’’ असं फर्मान पुलकेशीने काढलंय असं वाटावं इतके ते सजवलेले आहेत किंवा उत्कृष्ट सजावटीला सोन्याच्या मोहरांचं बक्षीस असावं इतकं नक्षिकाम कोरीव आहे.

या खांबाच्या खालच्या भागात शिखरांचे विविध प्रकार दाखवले आहेत. वर फुलं, पान, वेली, पक्षी यांचं नक्षीकाम आहे. हे सर्व पाहताना एक गोष्ट सातत्याने डोक्यात ठेवावी की, हे दगडाला पाझर फोडून तयार केलंय, दीड हजार वर्षांपूर्वी. या देवळाच्या गवाक्षाचं आणखी एक विस्मयकारी दर्शन त्रिपुरा पौर्णिमेला होतं असं तिथे भेटलेला आणि अनधिकृत गाईड म्हणून आमच्याबरोबर फिरणारा संदीप सांगत होता. तो पौर्णिमेचा चंद्र थेट त्या शिळेच्या मध्यभागी येतो असं सांगत होता. अशा गोष्टी ‘व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटी’च्या मॅगझिनमध्ये छापून येतात. त्यामुळे त्यावर मी सध्या विश्वास टाकत नाही, पण अरविंद परांजपेंनी (संचालक, नेहरू प्लॅनेटोरियम, नेहरू सेंटर) स्वतः सर्व गणिती आकडेमोड करून त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र त्या गवाक्षाखालच्या शिळेवर विसावतो याचा कयास बांधला आणि आपला कयास किती बरोबर आहे हे त्यांनी स्वतः जाऊन पाहिलं. त्यांच्या गणिती आज्ञेचा मान ठेवून चंद्र त्या शिळेवर क्षणभर विसावला. ज्यावेळी हे मंदिर बांधलं त्यावेळी कुणी हा गणिती उपद्व्याप केला होता का? की हे वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण होतं? की केवळं हे अपघाताने घडलं याचं अचूक उत्तर देणं कठीण असेल, पण कितीतरी अशा विस्मयचकीत करणाऱया गोष्टी आपल्याला प्राचीन हिंदुस्थानात सापडतात. मग हे शास्त्र, ही कला गेली कुठे? ती व्यक्तिगत किंवा सामूहिक प्रॉपर्टी राहिली काय?

या मंदिराचं वैभव स्वर्गमंडपातच संपत नाही. उलट ते तिथून सुरू होतं. पुढचं वैभव हे पुढच्या वेळी.
[email protected]