मंथन – कोरोना वादळाचा ‘संदेश’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलांबरी जोशी

कोरोनाचा आणि लॉक डाऊनचा प्रत्येकाच्या मनाला बसलेला धक्का तीव्र स्वरूपाचा आहे. कोरोनानंतरचं जग आधीच्या जगासारखं नसेल हे मनाला पक्कं बजावलं तरी अनलॉकनंतर ते जग परत शोधण्याचा प्रयत्न होणारच. हा भावनांचा कल्लोळ न टाळता येण्याजोगा असेल. अशावेळी आपलं आणि इतरांचं मानसिक आरोग्य सांभाळणं गरजेचंच आहे. पद्मा गोळे यांच्या कवितेतला एक संदेश आपण अंगिकारायला हवा. तो म्हणजे, वादळे यासाठीच वापरायची असतात, आपण काय आहोत, ते तपासण्यासाठी नव्हे, काय होऊ शकतो, हे अजमावण्यासाठी.

आपल्या वस्तीत तो फिरत फिरत पोहोचतो. त्याचं स्वतःचं म्हणजे न्हाव्याचं दुकान उघडतो. आत खूप जळमटं दिसतात. त्याला आश्चर्य वाटतं. पण तो ते दुकान साफ करतो. एवढय़ात काही सैनिक येऊन दुकानाची तोडफोड करतात. ते एका ज्यू माणसाचं दुकान असल्याची खूण दुकानावर रंगवतात. त्याचं त्याला भयंकरच आश्चर्य वाटतं! या आश्चर्याचं कारण म्हणजे सगळं काही जिथल्या तिथे असेल अशी त्याची अपेक्षा असते. पण विस्मृतीच्या आजारामुळे आयुष्यातून निघून गेलेली 20 वर्षं त्याला आठवत नसतात. चार्ली चॅप्लीनच्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ या चित्रपटातला हा प्रसंग. या चित्रपटात चार्लीनं रंगवलेला न्हाव्याच्या व्यवसायात असताना युद्धात भरती झालेला सैनिक युद्धकाळात एका विमानातून पडतो. तो वाचतो, पण डोक्याला मार लागल्यानं इस्पितळात दाखल होतो. त्याला आपण कोण आहोत हे आठवायला लागल्यावर 20 वर्षांनी तो आपल्या वस्तीत गेलेला असतो. आजूबाजूचं सगळंच बदललेलं असतं.

कोरोना लॉक डाऊननंतरच्या अनलॉकच्या काळात आपली अवस्था या ट्रंपसारखी झाली आहे. आपल्याला विस्मरणाचा आजार झालेला नाही. पण कोरोना विषाणूच्या साथीच्या आधीचं जग आपण अनलॉकनंतर परत एकदा शोधायचा प्रयत्न करतोय. सगळंच बदलेलं असल्यामुळे आपल्याला मनात सतत आश्चर्य वाटतंय. अर्थात मनातल्या भावनांचा कल्लोळ हा केवळ आश्चर्य या एकाच भावनेपुरता मर्यादित नाही.

जगातले सुमारे 260 कोटी लोक कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊनमध्ये होते किंवा अजून अडकलेले आहेत. त्यापैकी सुमारे निम्मे म्हणजे हिंदुस्थानातले 130 कोटी लोक लॉक डाऊनमध्ये होते. जवळच्या माणसांना भेटता न येणं, आपलं स्वातंत्र्य संपल्याची भावना, कोरोनाच्या उद्रेकाची अनिश्चितता याचं प्रत्येकाच्या मनात सतत थैमान होतं.

कोरोनाच्या क्वारंटाईनच्या काळात ज्यांना घरात मुलं किंवा वृद्ध माणसं यांच्याबरोबर राहावं लागलं होतं त्यांना पीटीएसडीची लक्षणं (नकारात्मक भावना) जाणवू शकतात. तसंच लॉक डाऊनच्या काळात पोलीस, आरोग्यसेवेतले सर्वजण, हॉस्पिटलमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, नर्सेस, स्टाफ, तसंच इतर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी यांना पुढची काही वर्षं ताणतणाव, नैराश्य यांना तोंड द्यावं लागेल. संसर्गाच्या भीतीनं लोकांना टाळणं – अव्हॉइडन्स हा मनोविकार जाणवल्यानं त्यांच्यातल्या काहीजणांमध्ये गैरहजर राहण्याचं प्रमाण वाढू शकेल.

कोरोना विषाणूच्या लॉक डाऊनच्या काळातून अनलॉकमध्ये बाहेर पडताना आपल्याला कोरोनाचा संसर्ग होईल ही भीती, पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याची भीती, कोरोनाबद्दल योग्य त्या माहितीचा अभाव आणि कोरोनाग्रस्तांबद्दल स्टिग्मा अशा अनेक भावना सगळ्यांच्याच मनात आहेत. वैताग, कंटाळा, राग, चिंता, चिडचिड, अस्वस्थता, उलघाल होणं, ताण, नकारात्मक भावना, निद्रानाश, नैराश्य, जेवणाच्या वेळांचं बदललेलं चक्र जागेवर न येणं, नोकरीबाबत अनिश्चितता, बेरोजगारी अशा समस्या जवळपास प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यात बेरोजगारी, उत्पन्न खालावणं हा आर्थिक फटका मानसिक आरोग्यावर जास्त प्रमाणात घाला घालणार हे नक्की. हिंदुस्थानात 5 मे 2020 पर्यंत 27.11 टक्के लोक बेरोजगार झाले होते. तसंच 20 ते 30 वर्षं या वयातल्या 2.7 कोटी तरुणांच्या नोकऱया एप्रिल 2020 मध्ये गेल्या असं ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या कंपनीनं जाहीर केलं आहे. बेरोजगारीचा दर जगभरच वाढत चालला आहे.

एकूण कोरोनाचा आणि लॉक डाऊनचा प्रत्येकाच्या मनाला बसलेला धक्का तीव्र स्वरूपाचा आहे. मुळात नक्की या सगळ्याला कसं तोंड द्यावं याबद्दल मनात गोंधळ आहे. तो अजूनच त्रास देतोय. या सगळ्याचे – दारूसारखी व्यसनं वाढणं, लोकांनी डॉक्टरांकडे न जाता स्वतःच्याच मनानं आाwषधोपचार घेणं, संसर्गाच्या भीतीनं इतर लोकांना टाळणं, एकटेपणाची भावना पराकोटीला पोचणं, संशयग्रस्तता वाढणं हे परिणाम जाणवायला लागले आहेतच. यावर उपाय म्हणजे मुळात मूड चांगला नसणं आणि प्रत्येक गोष्टीत चिडचिड होणं, भावनांचा उद्रेक होणं हे सगळं आपल्याला होणार हे मान्य करायला हवं. आपल्या भावना जाणून घेऊन त्यावर उपाय करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत लागेल हेही मान्य करायला हवं.

कोरोनानंतरचं जग कोरोनाआधीच्या जगासारखं नसेल, ते वेगळं आहे हे आपण प्रत्येक क्षणी मनाला पक्कं बजावून पुढे जायला हवं. हिंदुस्थानात 130 कोटी लोकांमागे 9000 मनोविकारतज्ञ, 1000 मानसोपचारतज्ञ आहेत. आपली गरज मात्र 30,000 मनोविकारतज्ञ आणि 38000 मानसोपचारतज्ञ इतकी आहे. हे लक्षात घेऊन आपण आपलं मानसिक आरोग्य सांभाळायला हवं. इतकंच नव्हे तर इतरांच्या भावभावना जाणून त्यांना मदत करता येईल इतकं स्वतःला समर्थ बनवायला हवं. पद्मा गोळे यांच्या कवितेतला एक संदेश आपण अंगिकारायला हवा. तो म्हणजे,

वादळे यासाठीच वापरायची असतात,
आपण काय आहोत,
ते तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो, हे अजमावण्यासाठी.

  • ‘लॅन्सेट’सारख्या जगप्रसिद्ध मासिकानंही लॉक डाऊन काळात लोकांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाले त्याचा लेखाजोगा प्रसिद्ध केला आहे. हिंदुस्थानात एप्रिल 2020 मध्ये ताण आणि पॅनिक होणं हे प्रकार 35 ते 40 टक्के वाढले असं समुपदेशनाचं काम करणाऱया संस्थांचं म्हणणं आहे. खरं तर जगातल्या प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ताण जाणवणार आहे. पण ज्यांना कोरोनाची लागण झाली होती किंवा ज्यांना काही कारणानं क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. त्यांना पोस्ट ट्रामॅटिक स्ट्रेस डिसआा@र्डर (पीटीएसडी) हा मनोविकार सतावू शकतो. बलात्कार, अपहरण अशा प्रसंगात सापडलेल्या अनेक जणांना, भीषण युद्धातून परतलेल्या सैनिकांना आणि भूकंप, त्सुनामी अशा नैसर्गिक संकटात काही काळ अडकलेल्या लोकांना त्या प्रसंगाचा धक्का बसतो. नंतरच्या काळात त्यांना चिंतेपासून नैराश्यापर्यंत अनेक नकारात्मक भावना त्रास देतात. या प्रकाराला मानसशास्त्र्ााच्या भाषेत पीटीएसडी म्हटलं जातं.