लव यू जिंदगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंजुल भारद्वाज

खरं तर प्रेक्षक आणि रंगकर्मींमधील संवाद हा थिएटरचा आत्मा; पण सध्या लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना भेटता येत नाही. सुरक्षित अंतर ही आज काळाची गरज आहे. अशावेळी मिळालेला वेळ मी लेखन आणि आत्मचिंतनात घालवतोय. आमच्या ‘द थिएटर ऑफ रेलेवन्स’च्या टीमचं ग्रुमिंग सुरू आहे. काही नव्या संकल्पनांवर काम सुरू आहे. सध्या टीम मेंबर भेटू शकत नसल्याने असा ऑनलाइन धागा जोडायचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं सुरू असताना आजूबाजूच्या घडामोडींवर मी खूप लिहिलंय. तुम्ही बघितलं असेलच अचानक लॉकडाऊन लागला आणि मजूर आपल्या गावाकडे पायी चालत जाऊ लागले. त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. घराच्या ओढीने, सुरक्षिततेच्या शोधात; कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वयंप्रेरणेने चालत गावी निघाले. मजुरांचा हा सत्याग्रह होता. त्यांची संवेदनशीलता मी कलाकाराच्या संवेदनशील मनाने जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यावर माझं लेखन सुरू झालं. याशिवाय ‘लॉकडाऊनचा एकांतवास’ नावाच्या नाटकाचं लेखन केलं. या काळात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्राचं काय झालं, यावर भाष्य करणारं हे नाटक आहे. कोरोनाच्या संकटात व्यक्ती ते युनिव्हर्सपर्यंत सारेच उघडे पडले. संस्कृती, संस्काराच्या नावाखाली कुणी लपू शकत नाहीत. सगळ्यांचे खरे चेहरे दिसत आहेत. मानवी वागणुकीचे विभिन्न नमुने दिसत आहेत. खरं तर ही परिस्थिती कलाकारांना आव्हान देणारी आहे. कलाकाराला आत्मिक विकास करण्याची मोठी संधी त्यात आहे. म्हणूनच या दिवसांकडे मी आत्मचैतन्य समाधी स्वरूपात बघतोय.

कलाकार म्हणजे कोण? काळाला आकार देतो तो कलाकार ही थिएटर ऑफ रेलेवन्सने केलेली कलाकाराची व्याख्या आहे. कला माणसाला माणूस बनवते. त्याला आम्ही सांस्कृतिक सृजनकार म्हणतो. मागच्या पाच वर्षांत ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’च्या माध्यमातून अनहद नाद, राजगति, गर्भ, न्याय के भंवर मे भवरी अशा नाटकांचे प्रयोग आम्ही तुमच्यासमोर केले. त्यातून माणसाशी माणुसकीने वागा, हा संदेश दिला. समाजात सृजनात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनच्या गेल्या तीन – चार महिन्यांत ‘लव्ह यू जिंदगी’ हा संदेश आम्ही वाटतोय. कवितेच्या चार ओळी सांगून शेवट करतो…

चलते चलते जिंदगी
कभी समय से जुड जाती है
कभी काल से ठीठक जाती है
सहम जाती है, मायूस हो जाती है
ऐसे समय में अतीत के
हसीन पलों में जा बैठती है जिंदगी
ले आती है भविष्य में जीने का हौसला
बिलकुल नए ख्वाब की तरह…
लव्ह यू जिंदगी

(लेखक हे रंगचिंतक रंगकर्मी आणि ‘द थिएटर ऑफ रेलेवन्स’चे प्रणेते आहेत)